तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आघाडीवर असणाऱ्या चीनने आता प्राथमिक शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. बालवयातच चिनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून एआयचे धडे मिळणार आहेत. हे एक क्रांतिकारी पाऊल मानायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय शिक्षणव्यवस्थांनी देखील यामधून बोध घेणे आवश्यक आहे. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणात हिंदीसारख्या अनावश्यक विषयाची सक्ती करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने ठरविले होते. शिक्षणामध्ये बदल घडवित असताना नक्की कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे, या प्रश्नाचे उत्तर अजूनही आपल्या राज्यकर्त्यांना सापडत नाही, हे दुर्दैव. निवडून आल्यानंतर स्वतःचा राजकीय अजेंडा शिक्षणाच्या माध्यमातून राबविण्यातच आपले राज्यकर्ते मग्न झालेले दिसतात. भारताला तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अधिक वेगाने प्रगती करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? या प्रश्नाचे उत्तर शिक्षण तज्ञांचा सल्ला घेऊन शोधायला हवे. चीनसारखा देश आपल्या विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच तंत्रज्ञानाचे धडे द्यायला सज्ज झालेला आहे. आणि आपण मात्र अनावश्यक विषयांचा बोजा विद्यार्थ्यांवर लादत आहोत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अजूनही आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडविणे गरजेचे वाटते. निदान यासाठी तरी भारतातील नाही किमान बाहेरील शिक्षण तज्ञांची मदत घेतली तरी पुरे.
--- तुषार भ. कुटे
#तंत्रज्ञान #एआय #मराठी #शिक्षण #हिंदी_सक्ती #महाराष्ट्र
विज्ञानेश्वरी
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥
Wednesday, April 23, 2025
प्राथमिक शिक्षण - चीन आणि भारत
Thursday, April 17, 2025
महाराष्ट्रात आता हिंदी सक्ती
महाराष्ट्राच्या सर्व शाळांमध्ये आता पहिलीपासून प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या “हिंदी” या भाषेचा समावेश केला जाणार आहे. अर्थात महाराष्ट्रातील सर्व मुलांना आता हिंदी शिकणे सक्तीचे होणार आहे. याविषयी विविध स्तरातील लोकांकडून नकारात्मक आणि सकारात्मक प्रतिक्रियादेखील ऐकायला मिळाल्या. खरंतर या निर्णयामागची छुपी आणि खरीखुरी पार्श्वभूमी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या ७८ वर्षांमध्ये ९०% पेक्षा अधिक पंतप्रधान हे उत्तर भारतीय राज्यांमधून आलेले आहेत. शिवाय लोकसंख्येचा आधार घेतला तर त्यांचीच भाषा बोलणारी जवळपास ४० टक्के लोकं भारतामध्ये आहेत. याच कारणास्तव त्यांच्या हिंदी भाषेला ‘राष्ट्रभाषा’ म्हणून सातत्याने प्रोत्साहन दिले गेले. घटनेमध्ये आपल्या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. तरीदेखील संघराज्याची राजभाषा म्हणून इंग्रजीबरोबर हिंदी भाषेला देखील स्वीकारले गेले. कालांतराने जवळपास प्रत्येक हिंदीधार्जिण्या सरकारांनी हिंदीला अप्रत्यक्षपणे राष्ट्रभाषा म्हणून पुढे आणले. उत्तरेकडील राज्ये वगळता अन्य राज्यांमध्ये त्रिभाषासुत्रीचा अवलंब केला गेला. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे म्हणून ती सर्वांनी स्वीकारायला हवी, तसेच सर्वांना बोलता देखील यायला हवी असा छुपा अजेंडा घेऊन राज्यकर्ते देशभर हिंदीचा प्रसार करत गेले. आजही महाराष्ट्रातील बहुतांश लोकांमध्ये हाच गैरसमज आहे की, हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा आहे. मागील ७८ वर्षांचे हे फलित आहे, असेच म्हणावे लागेल. दक्षिणेकडच्या राज्यांनी विशेषतः तामिळनाडू आणि केरळ यांनी हिंदीला सरळ सरळ धुडकावून लावले. त्यांनी स्वतःची राज्यभाषा आणि इंग्रजी याच दोन भाषांना प्राधान्य दिले. हिंदी येत नसली तरी त्याचा काहीच परिणाम राज्यांच्या प्रगतीवर झाला नाही. याउलट आज उत्तर भारतातील राज्ये आणि दक्षिण भारतातील राज्ये यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की, दक्षिण भारतीय राज्यांचा भारताच्या प्रगतीमध्ये सर्वाधिक वाटा आहे. ही राज्ये हिंदी बोलत नाहीत, याचा कदाचित मत्सर उत्तर भारतीय राज्यकर्त्यांमध्ये तयार झालेला असावा. महाराष्ट्राने मात्र अतिशय सहजपणे त्रिभाषासूत्रे अवलंबली. इथल्या लोकांना हिंदी शिकायला लावली. आजही बहुतांश मराठे याच गैरसमजात आहेत की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी अजूनही बरेच प्रयत्न करावे लागतील, असे दिसते.
मराठी लोकांना हिंदी बोलता आणि समजता येत असल्याने शिवाय प्रगतीच्या दृष्टीने भारतातील पहिले राज्य असल्याने बहुतांश उत्तर भारतीयांचा कामासाठी आणि शिक्षणासाठी प्राधान्यक्रम नेहमीच महाराष्ट्राला राहिलेला आहे. मराठी माणूस सहजपणे हिंदीत बोलतो. आपल्या भाषेला तो कधीच प्राथमिकता देत नाही. या अनुभवावरून हळूहळू उत्तर भारतीय लोक मराठ्यांना दुय्यम दर्जाचे वागवू लागले. आज त्यांची संख्या महाराष्ट्रात १० टक्क्यांपेक्षा अधिक झालेली आहे. महाराष्ट्रात मराठी महत्त्वाची नाही तर हिंदीच महत्वाची आहे असं हळूहळू उत्तर भारतीयांनी मराठी लोकांच्या मनात ठसवायला सुरुवात केली. परंतु सुदैवाने का होईना मराठी लोक शहाणे व्हायला लागलेले आहेत. मागच्या वर्षा दोन वर्षांमधील आपल्या शहरांमधील काही घटनांचा आढावा घेतला तर लक्षात येईल की बहुतांश ठिकाणी बाहेरून विशेषत: उत्तर भारतातून आलेले उपरे लोक मराठी बोलायला सरळ नकार देत आहेत आणि इथल्या स्थानिकांवर हिंदी बोलण्यासाठी सक्ती करत आहेत. विशेष म्हणजे यावर महाराष्ट्रातील एखादा पक्ष वगळला तर कोणीही प्रतिक्रिया देत नाही. अर्थात यामागे सहजपणे वाकणारा मराठी माणूस आणि दहा टक्क्यांची बिगर मराठी मते आहेत, हे वेगळे सांगायला नको. उत्तर भारतीयांच्या अरेरावीला मराठी माणूस देखील आता प्रतिकार करू लागलेला आहे. समाजमाध्यमांद्वारे अशा घटना वेगाने संपूर्ण मराठी प्रदेशात समजतात. यातून एक प्रकारची जनजागृती देखील होते. अर्थात याच कारणास्तव हिंदीला राष्ट्रभाषा करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसल्याची दिसते. कदाचित यामुळेच गोबरपट्ट्यातील या भाषेचा जर थेट अभ्यासक्रमातच प्रवेश केला तर येणाऱ्या पिढीकडून होणारा विरोध मावळू शकेल, असे राज्यकर्त्यांना वाटत असावे. इंग्रजी माध्यमाच्या म्हणून नावारूपास आलेल्या आणि हिंदीतून शिकवणाऱ्या सीबीएसई शाळांमधील मराठीसक्ती डावलून आता मराठी शाळांमध्ये हिंदीसक्तीची प्रक्रिया का सुरू केलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर सद्सद्विवेकबुद्धीने शोधणे महत्वाचे आहे.
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या आणि विशेषतः सीबीएसई बोर्डाच्या शाळा वाढलेल्या दिसतात. या सर्व शाळांमध्ये ‘राष्ट्रभाषा’ म्हणून हिंदीचा प्रचार आणि प्रसार केला जातो. इंग्रजीपेक्षा हिंदी बोलण्यामध्ये येथे शिकणारी मुले वाकबगार असतात. त्यांना मराठी भाषेचे विशेष काही वाटत नाही. एका अर्थाने आपल्या मायभाषेला ते दुय्यम दर्जा देतात. ९९ टक्के पेक्षा अधिक मुलांना मराठीपेक्षा हिंदी भाषाच जवळची वाटते. अर्थात यातून एक गोष्ट लक्षात येते की अभ्यासक्रमात हिंदी भाषा असेल तर येणारी पिढी ती लवकर आत्मसात करते. स्थानिक भाषेला देखील दुय्यम दर्जा प्राप्त होतो. आणि आपली भाषा इतरांवर लादण्याचा मार्ग देखील मोकळा होतो. हाच मार्ग सध्या सरकारने अवलंबलेला दिसतो. यात दुमत असण्याचे कारण नाही. नवीन शैक्षणिक धोरणाचे नाव पुढे करून पहिलीपासून त्रिभाषासुत्री सुरू करण्याचे सांगितले गेले. याच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्याची योजना होती परंतु याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करण्यात आले. म्हणजेच आपल्या सोयीनुसार दुटप्पी भूमिका घेण्याचे धोरण राज्यकर्त्यांचे आहे, असेच दिसून येते .
महाराष्ट्रातील लोकांना हिंदी येवो अथवा ना येवो याने काहीही फरक पडत नाही. परंतु इंग्रजी मात्र महत्त्वाची आहे, यात दुमत नाही. तरीदेखील हिंदीची सक्ती का? हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. उत्तर भारतातील ४०% लोकांना महाराष्ट्र व इतर दक्षिण भारतीय राज्यांमध्ये सहजपणे फिरता यावे, रोजगार उपलब्ध व्हावा अर्थात एक प्रकारे त्यांना लुबाडता यावे, म्हणून ही सक्ती केली जात नाही ना? हाही प्रश्न पडतो. हिंदी सारखा अनावश्यक विषय अभ्यासक्रमामध्ये घालून मुलांच्या मेंदूवरील ओझे वाढविण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आधुनिक काळात आवश्यक असलेले संगणक ज्ञान किंवा संगणकीय भाषा जर मुलांना शिकवली तर निदान त्याचा उपयोग ते आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून करू शकतील. हिंदी शिकल्यानंतर कोणता मराठी मुलगा पटना, लखनौ, कानपुर, भोपाळ, रांची सारख्या “अतिप्रगत” शहरांमध्ये नोकरी शोधत वणवण फिरणार आहे?
ज्यांची पैदास जास्त त्यांची राष्ट्रभाषा, हे जर सूत्र वापरले तर कोंबडीला राष्ट्रीय पक्षी आणि कुत्र्याला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा लगेचच देऊन टाकायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदीचा आणि हिंदुत्वाचा देखील काहीही संबंध नाही. भारत देशातील एकूण हिंदूंपैकी जवळपास ३० टक्के हिंदूंची मातृभाषा हिंदी आहे. अर्थात ७० टक्के लोक बिगरहिंदी भाषा बोलतात!
एकंदरीत स्वतःचा छुपा अजेंडा पसरवण्यासाठी दख्खन परिसरातील संस्कृती नष्ट करण्यासाठी उत्तरेतील राज्यकर्त्यांचा कुटील डाव सातत्याने मराठी माणसांवर टाकला जात आहे. तो मराठ्यांनी योग्य वेळी समजून घ्यायला हवा. अन्यथा आपली पुढची पिढी मराठी भाषा विसरून ‘हमरे को तुमरे को’ त्या भाषेमध्ये संवाद साधताना दिसेल, यात शंका नाही.
— तुषार भ. कुटे.
Monday, April 14, 2025
व्हॉयेजर-१
सध्या पृथ्वीवरून व्हॉयेजर-१ या यानापर्यंत पर्यंत सिग्नल पोहोचायला २३ तास आणि ९ मिनिटे लागतात — आणि तितकाच वेळ परत सिग्नल यायला लागतो. इतक्या लांब हे यान पोहोचले आहे!
जानेवारी २०२७ पर्यंत व्हॉयेजर-१ सूर्यापासून एक प्रकाश दिवस अंतरावर असेल — म्हणजे सुमारे २५.९ अब्ज किलोमीटर! त्या दिवशी हे यान प्रक्षेपित करून ५० वर्षे पूर्ण होतील!
व्हॉयेजर-१ अजूनही कार्यरत राहू शकते, पण त्याचे उर्जास्रोत हळूहळू कमी होत असल्यामुळे काही उपकरणं बंद देखील करावी लागू शकतात.
थोडक्यात सांगायचं झालं तर...
आपल्यापासून सूर्यानंतरचा सर्वात जवळचा तारा 'प्रॉक्सिमो सेंचुरी' हा त्याच्या अजूनही ४.२४ प्रकाशवर्ष दूर आहे! व्हॉयेजर-१ च्या सध्याच्या वेगाने तिथे पोहोचायला सुमारे ७४,००० वर्षं लागतील!
हे केवळ अविश्वसनीय आहे! १९७७ मध्ये सोडलं गेलेलं हे छोटं यान अजूनही इतिहास घडवत आहे. ✨
#Voyager1 #NASA #SpaceExploration #DeepSpace #Milestones #Interstellar
Sunday, April 6, 2025
पॉइंट नीमो
पॅसिफिक महासागरातील "पॉइंट नीमो" हे पृथ्वीवरील सर्वात दुर्गम स्थळ आहे — जे अंटार्क्टिकाहून २,६८७ किमी अंतरावर स्थित आहे. १९९२ मध्ये शोधले गेलेले हे स्थळ इतकं दुर्गम आहे की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेले अंतराळवीर, जे पृथ्वीपासून ४१७ किमी उंचीवर कक्षेत फिरत असतात... ते येथे असलेले सर्वात जवळचे शेजारी असतात!
"अंतराळयान स्मशानभूमी" म्हणून ओळखले जाणारे हे स्थान आहे. इथे निरुपयोगी उपग्रह आणि अंतराळ कचरा सुरक्षितपणे महासागरात फेकला जातो. १९९७ मध्ये शोधलेल्या गूढ "ब्लूप" ध्वनीसाठी देखील हे प्रसिद्ध आहे. ह्या ध्वनीला समुद्राखालील हिमनगांच्या हालचालींशी जोडले गेले आहे.
सारांश... आपली पृथ्वी किती विशाल आणि गूढ आहे. 🌍💙
असुर
समाजमाध्यमांवर विविध पानांवर असुर या वेबसिरीजबद्दल माहिती ऐकली होती. त्यातूनच जिओ सिनेमावर ही वेब सिरीज पाहायला सुरुवात केली.
प्राचीन काळापासून आजतागायत सामाजिक परिस्थिती बदलत आली. परंतु अध्यात्म आणि देव ही संकल्पना अजूनही तशीच आहे. अजूनही आपल्याकडे कल्की जन्माला येईल, असे अनेकांना वाटते. किंबहुना मी स्वतःच कल्की आहे, असे देखील काहीजण सांगू लागलेले आहेत. यातीलच एकाची गोष्ट असुरमध्ये पाहायला मिळते.
तंत्रज्ञान बदलतय परंतु त्याचा जर गैरवापर केला गेला तर काय होऊ शकतं? याची प्रचिती असुर पाहिल्यानंतर येते. फॉरेन्सिक विभागामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांची ही गोष्ट आहे. त्यांना एका सिरीयल किलरला शोधायचे आहे. त्यासाठीचे पुरावे ते गोळा करतात. परंतु मारेकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण तो सातत्याने त्यांच्या अनेक पावले पुढे चालतो…. भविष्याचा विचार करतो… काळालाही त्याने मागे टाकले आहे. अशा गुन्हेगाराला पकडताना पूर्ण यंत्रणेचीच भयंकर दमछाक होते. या वेबसिरीजचा पहिला सीजन एका निराशाजनक शेवटाने संपतो.
दुसऱ्या सीझनमध्ये देखील तीच निराशा कायम चालू राहते. काळाच्या पुढे पळणारा गुन्हेगार तंत्रज्ञानाचा अतिशय हुशारीने वापर करत जात असतो. त्याला पकडताना अनेकांचे जीवही जातात. त्याने पोलीस यंत्रणेतीलच अनेकांना फितवले देखील असते. यातूनच निरनिराळी सत्ये, विश्वास बाहेर येतात. आणि शेवटी जाताना गेली कित्येक भागांमध्ये असलेली निराशा आशेच्या दिशेने प्रवास करायला लागते. परंतु आज विकसित होणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान जर चुकीच्या पद्धतीने वापरायचे ठरवले तर काय होऊ शकते? हे या वेबसिरीज मधून प्रकर्षाने जाणवते!
— तुषार भ. कुटे
#मराठी #वेबसिरीज
Friday, April 4, 2025
मशीन इंटेलिजन्सच्या दिशेने
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे स्तरानुसार अर्थात क्षमतापातळीनुसार तीन प्रकार पडतात. आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स!
आज आपण पहिल्याच पातळीमध्ये आहोत. ज्यामध्ये मशीन लर्निंगचा वापर करून विविध एआयआधारित उत्पादने तयार केली जातात. ज्यामध्ये आधीच्या माहितीचा वापर करून अल्गोरिदमला प्रशिक्षित केले जाते आणि मानवी कार्य करून घेतली जातात. अर्थात याद्वारे हुबेहूब मानवी क्षमता असलेल्या संगणक अजूनही बनवता आलेला नाही.
‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ ही एआयची दुसरी पातळी. ज्यामध्ये बनवलेल्या संगणक हुबेहूब मानवी कामे करू शकेल. खरंतर इथपर्यंत आपण अजूनही पोहोचलेलो नाही. परंतु याकरिता मशीन लर्निंगचा पुढचा स्तर अर्थात मशीन इंटेलिजन्स तयार होणे गरजेचे आहे.
तिसऱ्या स्तराला ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’ म्हणतात. ज्यामध्ये संगणकीय अल्गोरिदम मानवी क्षमतेपेक्षा वरचढ कामगिरी करू शकतील. किंबहुना मानवाच्या प्रत्येक कामाला पर्याय उभा करू शकतील. अनेक विज्ञान-रंजन चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे रोबोट्स आपल्याला पाहता येतात. परंतु इथवर पोहोचण्यासाठी अजूनही काही दशकांचा कालावधी आहे!
आज वापरण्यात येणारे सर्वात मोठे एआय उत्पादन म्हणजे चॅटजीपीटी होय. जगभरातील करोडो लोकांकडून याचा वापर केला जातो. ओपन एआय या कंपनीने बनवलेले हे चॅट एप्लीकेशन जगभरात सर्वांकडून वापरले जाते. सध्या त्याची चौथी आवृत्ती वापरण्याकरता उपलब्ध आहे. एआय जगतामध्ये आलेल्या वृत्तानुसार ओपन एआयची ४.५ ही आवृत्ती प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे चॅटजीपीटीच्या या नवीन आवृत्तीने उच्च पातळीवर ट्युरिंग टेस्टदेखील उत्तीर्ण केल्याचे समजते. सुमारे ८० वर्षांपूर्वी एआयचा जनक अॅलन ट्युरींग याने या चाचणीची निर्मिती केली होती. याद्वारे संगणक आपण संगणकाशी संभाषण करत आहोत की मानवाशी? हे ओळखून दाखवतो. कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासामध्ये चॅटजीपीटी ४.५ ने तब्बल ७३ टक्के वेळा ट्युरिंग टेस्ट उत्तीर्ण केल्याची समजते! म्हणजे चॅटजीपीटीने केलेले संभाषण हे मानवानेच केलेले संभाषण आहे, असं दाखवलेलं दिसतं! अर्थात या उत्पादनाद्वारे आपण हळूहळू मशीन लर्निंगला मागे टाकत ‘मशीन इंटेलिजन्स’च्या दिशेने चाललो असल्याचे दिसते. अर्थात आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स आता आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सकडे जाताना दिसत आहे. खरंतर हा प्रवास वेगाने होताना दिसतो. आज जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढत आहे. खरोखर मानवच करू शकतो, अशी कामे देखील एआयद्वारे होत आहेत. मानवाची क्षमता आजही त्याच जागेवर आहे, परंतु मशीन मात्र उत्क्रांत होताना दिसते आहे! हे प्रगतीचे लक्षण की धोक्याची घंटा? या प्रश्नाचे उत्तर मात्र शोधावे लागेल.
---- तुषार भ. कुटे
Sunday, March 30, 2025
गौतमीपुत्राचा विजयोत्सव
मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा. हा दिवस का साजरा केला जातो, याविषयी समाजमाध्यमांवर विविध पोस्टच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती प्रसारित होताना दिसते. अनेकांनी याला हिंदू नववर्षाचे नाव देखील दिलेले आहे. खरं पाहिलं तर गुढी उभारण्याची परंपरा फक्त महाराष्ट्राच्या अर्थात मराठी भाषिकांच्या प्रदेशांमध्येच दिसून येते. यासाठी कोणतेही धार्मिक कारण नाही. समाजमाध्यमांवरील विविध पोस्टमध्ये नानाविध भोळीभाबडी कारणे दिसून आली. तेव्हा महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर संशोधन करणाऱ्या काही महत्त्वाच्या संशोधकांच्या पुस्तकांचा मी संदर्भ घेतला. आणि त्यामधील माहितीच प्रमाण मानावी अशी दिसून आली.
सातवाहन राजवंश म्हणजे महाराष्ट्राचा निर्माणकर्ता. त्यांच्या साडेचारशे वर्षांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण झाली. याच राजवंशातील विसावा राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी होय. ज्याने इसवी सन ७८ मध्ये शकांचा पराभव केला. त्याच वर्षापासून शालिवाहन शक सुरू झाला. हे इतिहास संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. अर्थात इतिहास संशोधकांच्या प्रत्येक पुस्तकांमध्ये हीच गोष्ट नमूद केलेली दिसते. गौतमीपुत्र सातकर्णीचा विजयोत्सव आपण मागील १९४७ वर्षे साजरा करत आलेलो आहोत. ९९ टक्के पेक्षा अधिक मराठी लोकांना सातवाहनांच्या या राजाचे नाव देखील कदाचित माहीत नसावे. यानिमित्ताने एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली की, गुढीपाडवा हा मराठी मातीतील खराखुरा मराठमोळा सण आहे.
सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
— तुषार व कुटे.
संदर्भ:
१. मुसलमानपूर्व महाराष्ट्र, लेखक वासुदेव कृष्ण भावे, वरदा प्रकाशन, पान क्रमांक १८
२. महाराष्ट्राची कुळकथा, लेखक डॉ. मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, पान क्रमांक ८५
३. सातवाहनकालीन महाराष्ट्र ,लेखक रा. श्री. मोरवंचीकर, प्रतिमा प्रकाशन, पान क्रमांक ७१
४. जुन्नरच्या परिसरात, लेखक प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पान क्रमांक १९९
५. Junnar Inscriptions, Author: Shobhana Gokhale, Page No. 17
Monday, March 17, 2025
देवदारांच्या छायेतील मृत्यू
रस्किन बॉण्ड या भारतीय इंग्रजी साहित्यकाराच्या पुस्तकाचा हा अनुवाद. नावामध्येच रहस्यकथा अथवा मृत्यूकथा दडलेल्या दिसतात. हा कथासंग्रह असला तरी एका वेगळ्या धाटणीतला आहे. सर्व कथांमध्ये कोणाचा आणि कोणाचातरी मृत्यू जवळपास आहेच. हिमाचल प्रदेशातील मसूरीजवळील एकाच हॉटेल रॉयलमध्ये किंवा तिथल्या परिसरात या सर्व कथा घडतात. सर्व एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तरीही ही कादंबरी नाही! म्हणजेच आपण प्रत्येक कथा वेगळी वेगळी वाचू शकतो.
या सर्व कथांमध्ये काही पात्रे समान आहेत. मसूरी जवळच्या हॉटेल रॉयलमधील मिस रिप्ली बीन, हॉटेलचा मालक नंदू, रिप्ली बीनचा तिबेटी टेरिअर कुत्रा फ्लफ, हॉटेलमधील पियानो वादक मिस्टर लोबो हे प्रत्येक कथेमध्ये आपल्याला भेटतात. हिमाचल प्रदेशातील हा भाग देवदार वृक्षांच्या छायेमध्ये दडलेला आहे. आणि सर्व कथा याच ठिकाणी घडतात. खून झालेला पाद्री, विवाहबाह्य संबंध ठेवणार जोडपं, जन्मतः दुष्ट असलेला मुलगा, बॉक्सबेड मधलं प्रेत, टपालातून आलेल्या विषाचं गूढ, कोन्याकमधून केलेला विषप्रयोग, रहस्यमय काळा कुत्रा आणि दर्यागंजचा खूनी लेखक अशा विविध पात्रांना केंद्रस्थानी ठेवून या कथा लिहिलेल्या आहेत. त्या रहस्यकथा, गूढकथा,साहस कथा, भयकथा, सूडकथा आणि मृत्यूकथा अशा विविध प्रकारामध्ये मोडता येतील. छोटा सैतान आणि पत्रातून विषप्रयोग या थोड्याशा वेगळ्या वळणाच्या कथा वाटल्या. बाकी वरील कथाप्रकारामध्ये आवड असणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे एक उत्तम मेजवानी आहे, असेच म्हणावे लागेल.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #पुस्तक #परीक्षण