मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा. हा दिवस का साजरा केला जातो, याविषयी समाजमाध्यमांवर विविध पोस्टच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती प्रसारित होताना दिसते. अनेकांनी याला हिंदू नववर्षाचे नाव देखील दिलेले आहे. खरं पाहिलं तर गुढी उभारण्याची परंपरा फक्त महाराष्ट्राच्या अर्थात मराठी भाषिकांच्या प्रदेशांमध्येच दिसून येते. यासाठी कोणतेही धार्मिक कारण नाही. समाजमाध्यमांवरील विविध पोस्टमध्ये नानाविध भोळीभाबडी कारणे दिसून आली. तेव्हा महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर संशोधन करणाऱ्या काही महत्त्वाच्या संशोधकांच्या पुस्तकांचा मी संदर्भ घेतला. आणि त्यामधील माहितीच प्रमाण मानावी अशी दिसून आली.
सातवाहन राजवंश म्हणजे महाराष्ट्राचा निर्माणकर्ता. त्यांच्या साडेचारशे वर्षांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण झाली. याच राजवंशातील विसावा राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी होय. ज्याने इसवी सन ७८ मध्ये शकांचा पराभव केला. त्याच वर्षापासून शालिवाहन शक सुरू झाला. हे इतिहास संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. अर्थात इतिहास संशोधकांच्या प्रत्येक पुस्तकांमध्ये हीच गोष्ट नमूद केलेली दिसते. गौतमीपुत्र सातकर्णीचा विजयोत्सव आपण मागील १९४७ वर्षे साजरा करत आलेलो आहोत. ९९ टक्के पेक्षा अधिक मराठी लोकांना सातवाहनांच्या या राजाचे नाव देखील कदाचित माहीत नसावे. यानिमित्ताने एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली की, गुढीपाडवा हा मराठी मातीतील खराखुरा मराठमोळा सण आहे.
सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
— तुषार व कुटे.
संदर्भ:
१. मुसलमानपूर्व महाराष्ट्र, लेखक वासुदेव कृष्ण भावे, वरदा प्रकाशन, पान क्रमांक १८
२. महाराष्ट्राची कुळकथा, लेखक डॉ. मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, पान क्रमांक ८५
३. सातवाहनकालीन महाराष्ट्र ,लेखक रा. श्री. मोरवंचीकर, प्रतिमा प्रकाशन, पान क्रमांक ७१
४. जुन्नरच्या परिसरात, लेखक प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पान क्रमांक १९९
५. Junnar Inscriptions, Author: Shobhana Gokhale, Page No. 17