साने गुरूजी हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील एक महापुरुष होते. ’श्यामची आई’ या पुस्तकावरून व चित्रपटावरून आपण त्यांना ओळखतो. परंतु, त्यांनीच स्वातंत्रपुर्व काळात मांडलेली एक संकल्पना मला इथे मांडावीशी वाटते.
आंतरभारती ही ती संकल्पना होय. आज भारतामध्ये कितीतरी भाषा बोलल्या जातात. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी आपल्या देशाबद्दल म्हटले होते की ’हा देश निरनिराळ्या वर्णाच्या, रंगाच्या, वंशाच्या, धर्माच्या, जातीच्या, व भाषेच्या लोकांचे अजायबघर आहे..!’ या देशात अशी एकही भाषा नाही की, ज्यातुन कमीत कमी ५० टक्के लोक एकमेकांशी सहज संवाद साधु शकतात. विश्व संस्कृतीकडे एक नजर टाकली तर लक्षात येते की, जगातील कितीतरी देशांनी आपल्या भाषा परकीय आक्रमणामुळे गमावल्या आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कॅरेबियन बेटे, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटीना, (लॅटीन अमेरिकेतले सर्वच देश), तसेच आफ़्रिकेतील साऊथ आफ़्रिका व अन्य लहान देश यांच्या मूळ भाषा कोणत्या, हे त्यांनाच सांगता येणार नाही. ब्रिटिश, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ़्रेंच, यांच्या आक्रमण व वास्तव्यामुळे या देशांच्या भाषाच बदलुन गेल्या. परंतु, भारताचे तसे झाले नाही. भारताने बहुभाषीय संस्कृती आजही जोपासली आहे. अशा देशाला एकच राष्ट्रभाषा असु शकत नाही!
आज अनेक भारतीय भारतात बहुसंख्येने बोलल्या जाणाऱ्या हिंदीतुन संवाद साधताना दिसतात. हिंदी भाषकांची संख्या अधिक असल्याने तीला राष्ट्रभाषा म्हणुन ठसवण्याचा प्रयत्न केला जातोय. काही वर्षांपूर्वी तमिळांनी या विरूद्ध आवाज उठवला होता, आज महाराष्ट्रातही असा आवाज ऐकु येतोय. भारतीय राज्यघटनेने २३ भाषांना राष्ट्रभाषा म्हणुन दर्जा दिला आहे. त्यामुळे एकाच भाषेला राष्ट्रभाषा मानु नये, असे माझे मत आहे.
साने गुरूजींनी आंतरभारतीची जी संकल्पना सांगीतली होती, त्यात त्यांची अपेक्षा होती की, प्रत्येक भारतीयाने किमान दोन भारतीय भाषा शिकायला हव्यात. एकमेकांशी संवाद साधताना आपली मातृभाषा वापरली तर फारच उत्तम. नवी भाषा शिकल्याने ज्ञानाचे भांडार खुले होते. जवळपास सर्वच भारतीय भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य उपलब्ध आहे, त्याचा आस्वादही आपल्याला घेता येईल. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो आणि असावाही.... परंतु, दुसरी भाषा जर आपल्या समोर आपल्या भाषेला तुछ्च समजत असेल, तर त्याचा निषेधही करणे गरजेचे आहे.
बहुभाषिक संस्कृतीच्या बाबतीत आपल्याला राजा राम मोहन रॉय तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांचा आदर्श घेता येईल.
मला आणखी एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते की, स्वातंत्र्योत्तर काळापासुन हिंदी या भाषेला ती आपली राष्ट्रभाषा नसताना देखील तसे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला. या बाबतील बहुसंख्य असणाऱ्या हिंदी भाषकांची स्वार्थी वृत्ती दिसुन येते. भारताच्या काश्मिरी, पंजाबी, उर्दु, मराठी, गुजराथी, सिंधी, कोकणी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, ओरीया, आसामी, संस्कृत, बोडो, नेपाली, मैथिली या सर्वच राष्ट्रभाषा असताना केवळ हिंदीलाच राष्ट्रभाषा म्हणुन ठसविले गेले. त्यामुळे, हिंदी ही अभ्यासक्रमातील एक भाषा म्हणुन आपल्याला शिकावी लागतेय. राष्ट्रभाषा म्हणुन सर्वच भारतीय भाषांना हा दर्जा मिळायला हवा. भारतीयांनी केवळ हिंदीलाच राष्ट्रभाषा न मानता सर्व भारतीय भाषांना राष्ट्रभाषा मानयले हवे. तरच आंतरभारतीची संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येऊ शकेल.......
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com