Wednesday, December 30, 2009

पुण्यात राहण्याचा पहिला अनुभव

डिप्लोमानंतर पुण्याला जावे लागेल, असे वाटत नव्हते. शिवाय थेट द्वितीय वर्षाचा फ़ॉर्म भरायला गेल्यावर तर सीओईपी सारखे कॉलेज मिळेल याचीही कल्पना नव्हती. अखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. शिवाजीनगरसारख्या पुण्यातल्या मध्यठिकाणी भाड्याने राहणे परवडणारे नव्हते. त्यामुळे एखादी खोली मिळेपर्यंत तात्पुरती व्यवस्था आम्ही सीओईपी तील आमच्या मित्राकडे केली. शिवाजीनगरमध्येही रूम शोधायचा प्रयत्न केली परंतु, बजेटमध्ये बसणारी खोली मिळाली नाही. म्हणून पुणे शहरामध्ये आम्ही गेलो.
पुणे महानगरपालिकेचा पूल ओलांडल्यानंतर ’मुख्य’ पुणे शहर चालू होते. पेठांमध्ये वसलेली ’टिपिकल पुणेरी’ माणसे इथे पाहायला मिळतात. मराठीतल्या ’ण’ ला आवर्जून ’ण’च म्हणणारी माणसे हीच होय...! शोधता शोधता आप्पा बळवंत चौकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी नारायण पेठेत आम्हाला खोली मिळाली. एकच खोली व त्याला गॅलरी होती, तीही बंदिस्त... सकाळी आम्ही निघायचो तेव्हा तिथुन फक्त पाण्याच्या मोटारीचा आवाज यायचा. या खोलीमध्ये टॉयलेट-बाथरूमही अटॅच होते. आणि भाडे होते, अडिच हजार.... सन २००२ मध्ये इतके भाडे निश्चितच जास्त होते. तरिही चौघांनी मिळून ते भरायचे ठरविले. शिवाय डिपॉझिटही तितकेच होते. मालकाचे नाव होते, सॉरी..... मालकिणीचे नाव होते....सौ. रेणुसे. मालकाला तर आम्ही कधी पाहिलेही नसेल....
पहिल्यांदाच पुण्याला राहायला आल्याने मला फारसे करमतही नव्हते. त्यातल्या त्यात मालकिणबाई टिपिकल मराठी किंवा हिंदी चित्रपटात दाखवितात तश्या वागणाऱ्या होत्या. त्याही ’ण’ ला आवर्जून ’ण’च म्हणणाऱ्या कॅटेगरीतल्याच.... नाकातून बोलणारी माणसे या परिसरात विशेषत: सदाशिव पेठेत बहुसंख्येने आढळुन येतील. मालकिणबाई रोज दार ठोठवायला यायच्या. रोज नविन कारण असायचे.... पुणेरी लोकांचा असा अनुभव पहिल्यादाच येत असल्याने मीही वैतागुन गेलो. त्यामुळे करमतच नव्हते. एक दिवस मी एकटा असताना त्या आल्या व डोकं खात बसल्या. त्यांच्या बोलण्याने डोळ्यात पाणी आले होते (हे अश्रू फ्रस्ट्रेशनचे होते...) तेव्हाच रूम सोडायचा निर्णय घेतला. तसेही मला इथुन सीओईपी पर्यंत चालत जायला जवळपास ४० मिनिट लागायचे. पुढे काय करायचे याचा निर्णय न घेताच मी मात्र ती रूम सोडली. त्यानंतर कधीच पुणे मुख्य शहरात राहण्याचा प्रसंग आला नाही.

2 comments:

  1. अश्रू फ्रस्ट्रेशनचे होते....
    एक दिवस मी एकटा असताना त्या आल्या व डोकं खात बसल्या. त्यांच्या बोलण्याने डोळ्यात पाणी आले होते (हे अश्रू फ्रस्ट्रेशनचे होते...) तेव्हाच रूम सोडायचा निर्णय घेतला. तसेही मला इथुन सीओईपी पर्यंत चालत जायला जवळपास ४० मिनिट लागायचे.

    Nice....

    ReplyDelete
  2. Nice one..टिपिकल पुणेकर डाऊन २ अर्थ कधी होणार देव जाणे..

    असोत...आदरणीय माणिक सरकार यांच्या बरोबरच्या होस्टेल वरच्या गमती जमती ऐकायला नक्की आवडतील ...

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com