
झेंडा या चित्रपटाबद्दलचा वाद शमतो न शमतो तोच ’शिक्षणाच्या आयचा घो...’ या नव्या मराठी चित्रपटाविषयी पुन्हा वाद निर्माण केला जाऊ लागला आहे. ’स्वाभिमानी संघटना’ नावाच्या एका कॉंग्रेस पक्षाच्या समांतर संघटनेने ’झेंडा’चे प्रदर्शन बंद पाडायला लावले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ’अखिल भारतीय मराठा महासंघाने’ ’शिक्षणाच्या आयचा घो...’ या चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली. खरं तर चित्रपटाचे हे नाव सुमारे एका महिन्यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते, तरीही आत्ताच आक्षेप घेण्यात आला, यातूनच सारे काही समजून येते...
स्वाभिमानी संघटनेने आपले अस्तित्व दाखवायला सुरूवात केल्यावर अन्य संघटनाही मागे पडू लागल्या होत्या. त्यातूनच चित्रपटाच्या नावाचा मुद्दा पुढे आला आहे. ’आयचा घो’ बद्दल सांगायचे झाले तर निर्माता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिलेले स्पष्टीकरण पूर्णत: योग्य वाटले. दुसरी गोष्ट अशी की, दोन वर्षापूर्वी महेश कोठारेच्या ’जबरदस्त’ या चित्रपटात ’आयचा घो’ नावाचे पूर्ण गाणे होते. या गाण्यात गायक कितीतरी वेळा ’आयचा घो’ म्हणतो. विशेष म्हणजे, हे गाणे त्यावेळी खूप गाजलेही होते. पण, त्याला आत्ताच्या चित्रपटाच्या इतकी प्रसिद्धी नव्हती. हेच गाणे ’झी मराठी’ वरच्या ’सा रे ग म प लिटिल चॅंम्प मध्ये रोहित राऊत याने गाऊन वाहवाही मिळवली होती! त्यावेळी मात्र कोणीच आक्षेप घेतला नाही. मग आत्ताच या सर्व संघटनांना का स्वत:चे अस्तित्व दाखवायचे आहे? हा प्रश्न उभा राहतो.
मराठी चित्रपट सध्या वेगळी उंची गाठत असताना त्यात खोडा घालायचे काम विविध संघटना करत आहेत. आज महेश मांजरेकरांनी ’शिक्षणाच्या आयचा घो...’ हे चित्रपटाचे नाव बदलले तर उद्या कोणती तरी गल्लीतल्या पोरांची संघटना आमच्या मराठीच्या ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाच्या नावालाही आक्षेप घेईल. प्रसिद्धीसाठी कोणी काहीही करू शकते. त्यामुळे राजकीय सेंन्सॉरशिपवरही विचार व्हायला हवे. अखेर सध्याच्या परिस्थितीतून असेच सिद्ध होते की, मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खाली खेचतो व तोच आपल्या भाषेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणार आहे. राज ठाकरेंनी त्यांची बदनामी होत असूनही ’झेंडा’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला त्यांनी परवानगी दिली. त्यांच्यापासून अन्य ’मराठ्यांनी’ नक्कीच काहीतरी शिकण्यासारखे आहे.....
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com