Monday, January 4, 2010

लेऊनी स्त्रीरूप भूलवी.... नटरंग... नटरंग... नटरंग...


२०१० या नव्या वर्षाची सुरुवातच ’नटरंग’ सारख्या दमदार चित्रपटाने झाली. पहिल्याच दिवशी अर्थात १ जानेवारीलाच हा चित्रपट मला पाहायचा होता. परंतु, वेळ मिळाला नाही. त्यामुळे ’सेकंड डे फर्स्ट शो’ ला जावे लागले. साधारण एक वर्षापूर्वीच या चित्रपटाबद्दल मी ऐकले होते. शिवाय झी टॉकीजचा चित्रपट असल्याने अपेक्षा होत्याच. त्या सर्व अपेक्षांची पूर्तता आज झाली. रविंद्र जाधव यांचा पहिलाच चित्रपट असल्याचे बिल्कुल वाटले नाही. कथा ही आनंद यादव यांच्या ’नटरंग’ या कादंबरीवर आधारलेली होती, परंतु ही कादंबरी मी वाचलेली नाही.
आनंद यादव यांची दमदार कथा, रविंद्र जाधव यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन, अतुल कुलकर्णीचा सकस अभिनय, गुरू ठाकूर यांची अर्थपूर्ण, प्रासंगिक गीते व सर्वात महत्वाचे म्हणजे अजय-अतुल यांचे श्रवणीय संगीत ही या चित्रपटाची वैशिष्टे मानावी लागतील. यामुळेच चित्रपट खूप सुंदर जमून आलाय. फार वर्षांनी तमाशावर आधारीत मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर दिसला. त्यानेही आपल्या अपेक्षा पूर्ण करून दाखविल्या. दिग्दर्शकाने या चित्रपटाची वेग खूप छान ठेवलाय. त्यामुळे तो कुठेही संथ वाटत नाही. रविंद्र जाधव पूर्वी जाहिराती दिग्दर्शित करायचा. जाहीरातीमध्ये कमी वेळामध्ये बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात. त्या दिग्दर्शकाला जमून आल्यात. नायकाच्या प्रवासाचे चित्रण उत्तमरित्या चित्रित झाले आहे. (विशेषकरून अतुल कुलकर्णीने ’गुणा’च्या भूमिकेला घेतलेली मेहनत दिसुन आली.) त्यास अजय-अतुलच्या संगीताची साथही तितकीच मोलाची वाटली. त्यांची सर्व प्रासंगिक गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. २०१० या वर्षाची सुरूवात तर मराठी चित्रपट सृष्टीसाठी चांगली झाली. आशा करूया की पूर्ण वर्षच या तऱ्हेने पार पडेल...

रसिक होऊ दे रंग चढू दे, रंग असा खेळाला,
साताजन्माची आज पुण्याई, लागू दे आज पणाला,
हात जोडतो आज आम्हाला, प्राण तुझा दे संग.....
नटरंग उभा.... ललकारी नभा....

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला, थोर उपकार.....
तुज चरणी लागली, मरणी कशी ही करणी करू साकार.....
मांडला नवा संसार, आता घरदार तुझा दरबार.....
पेटला असा अंगार, कलेचा ज्वार चढवितो झिंग.....
नटरंग उभा.... ललकारी नभा.....

’नटरंग’च्या गाण्यांची सीडी मिळवितानाची एक आठवण मला इथे नमूद करावीशी वाटते. मराठीविषय़ी जितकी जाण पुणे, मुंबईतल्या लोकांना आहे, तितकी नाशिकच्या लोकांना असल्याचे मला गेल्या चार वर्षात बिल्कुल वाटले नाही. मला शंका होती की, हा चित्रपट नाशिकमध्ये प्रसारित होतो कि नाही? कारण, दोन आठवड्यापूर्वी मला या चित्रपटाच्या गाण्यांची सीडीच मिळत नव्हती. ज्या दुकानात जावे तिथे एकतर ते मराठी चित्रपटांविषयीच अनभिज्ञ होते; तेव्हा ’नटरंग’बद्दल विचारणे म्हणजे मलाच गुन्हा वाटू लागला. हा कोणी खेडवळ माणुस आहे कि काय, अशा अविर्भावाने ते माझ्याकडे पाहात होते. नाशिकमध्ये मराठी चित्रपट वा गाण्यांची कदर केली जात नाही, असा माझा आजवरचा अनुभव आहे. मराठी चित्रपट पाहण्यासाठीही तुरळक प्रेक्षक असतात. अखेर ’नटरंग’ची सीडी मला ७-८ दुकाने पाहिल्यावर एका रस्त्यावरच्या सीडीच्या हातगाडीवर मिळाली. त्यानेही ती ’विकली एकदाची...!’ अशा अविर्भावात देऊन टाकली. असा अनुभव मला नाशिकमध्ये बऱ्याच वेळा आलेला आहे. यावरून इथे मराठीवादी पक्षांचे लोकप्रतिनिधी असले तरी, नाशिकची जनता मराठीप्रेमी आहे, असे म्हणने पूर्ण चुकिचे आहे.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com