Saturday, January 23, 2010

एक छोटा स्वार्थ...

मी दहावीत असतानाची गोष्ट आहे. मी ’क’ तुकडीमध्ये शिकत होतो. आमच्या शाळेतले दहावीतील गुणांच्या क्रमवारीनुसार येणारे सर्वच पहिले क्रमांक ’अ’ तुकडीतून असायचे. फक्त माझा क्रमांक तिसरा किंवा दुसरा असायचा. अर्थात ’अ’ तुकडीतल्या मुलांना अभ्यासात टक्कर देणारा मीच एकटा ’ब’ व ’क’ तुकडी मिळून होतो.
दहावीच्या शेवटच्या टप्प्यात मला ’अ’ वर्गात बसण्यास परवानगी मिळाली. वर्गात पहिला नंबर सुनील बुरंगे याचा यायचा तर दुसऱ्या क्रमांकासाठी माझ्यात व मिनल आवटे या मुलीत स्पर्धा असायची. सुनीलला प्रथम क्रमांकासाठी फारशी स्पर्धा करावी लागायची नाही. ’अ’ वर्गात बसायला लागल्यापासून मला स्पर्धेची खरी जाणीव झाली. तिन्ही वर्गाला सर्व विषयांचे शिक्षक सारखेच होते. आम्हाला गणित हा विषय बऱ्हाटे सर शिकवायचे. नेहमीप्रमाणे शाळेत पूर्व परीक्षाही घेतली जायची. फेब्रुवारीमध्ये पूर्व परीक्षेचे निकाल आम्हाला पाहायला मिळाले. सर्वच विषयात मला व मिनलला जवळपास सारखेच गुण होते. तर सुनीलही आमच्या जवळपास सात गुणांनी पुढे होता. ७५० पैकी ६७९ गुण मिळवून मी ९० टक्क्यांचा पल्ला पार केला. मिनल केवळ एकाच गुणाने माझ्या मागे होती. तीचे एकुण गुण ६७८ होत होते. जेव्हा मी माझा गणिताचा पेपर पाहिला, तेव्हा माझ्या लक्षात आले की, बऱ्हाटे सरांनी मला एका जादा सोडविलेल्या प्रश्नाचेही २ गुण दिले आहेत. पण, मी जर हे सरांना सांगितले असते तर माझे ते २ गुण कमी होऊन माझा क्रमांकही तिसरा झाला असता. त्यामुळे मी सरांना काहीच सांगितले नाही. माझ्या मनातला एक स्वार्थ जागृत झाला होता. पूर्व परीक्षेला माझा दुसरा क्रमांक तसाच राहिला; पण अंतिम परीक्षेत मी तो राखू शकलो नाही. मला ८५ टक्के, मिनलला ८७ टक्के व सुनीलला ९० टक्के गुण पडले! माझ्या दोन गुणांच्या स्वार्थाची दोन टक्क्यांत शिक्षा मला मिळाली! परीक्षेच्या निकालानंतर माझी सुनील व मिनल दोघांचीही अभिनंदन करण्याची इच्छा होती. पण, त्यानंतर त्यांची कधी भेटही झाली नाही...!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com