Thursday, January 28, 2010
उर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का?
उर्दू भाषा लिहिता, बोलता व वाचता येते म्हटल्यावर अनेकजण माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतात. याचा अनुभव मला बऱ्याचदा आला आहे. कारण, उर्दू ही केवळ मुस्लिम जनतेचीच भाषा आहे, असे आजही भारतीय समाजात मानले जाते. शंभर टक्के भारतीय भाषा असूनही भारतीय प्रजासत्ताकाच्या गेल्या ६० वर्षांमध्ये या भाषेला प्रगतीची वेगवान वाट गवसलेली नाही. अशी वाट जवळपास सर्वच प्रमुख भारतीय भाषांना सापडलेली आहे.
भारताची १९४७ साली झालेली फाळणी ही, उर्दूला मुख्य भारतीय समाजापासून दुरावण्यास कारणीभूत ठरली होती. कारण, पाकिस्तान भारतापासून वेगळे झाल्यावर पाकिस्तानची उर्दू ही राष्ट्रभाषा ठरविण्यात आली. या काळात पाकिस्तानात उर्दू भाषा बोलणारे लोक अन्य भाषांपेक्षा निश्चितच कमी होते. आजही ती परिस्थिती फारशी बदललेली नाही. आजही पाकिस्तानात पंजाबी, सिंधी व पुश्तू मातृभाषिक अधिक आहेत. त्यापेक्षा उर्दू मातृभाषिकांची संख्या ही कमीच दिसून येते. याउलट भारतात उर्दू बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. फाळणीनंतर उर्दू ही ’इस्लामिक प्रजासत्ताक’ असणाऱ्या पाकिस्तानची झाल्याने भारतातही ती मुस्लिमांची भाषा म्हणून गणली जाऊ लागली. फाळणीपूर्व भारतात उर्दूला योगदान देणाऱ्या लेखकांमध्ये हिंदू व मुस्लिमांची संख्या जवळपास सारखीच होती. उर्दूमध्ये दमदार कथा लिहिणारे धनपत राय उर्फ मुन्शी प्रेमचंद व आधुनिक गजलेचे जनक मानले जाणारे साहीर लुधियानवी हे हिंदूच होते. त्यांच्याशिवाय अनेक शीख लेखकांनीही उर्दू साहित्याला मोठे योगदान दिले आहे. आणखी एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की, पाकिस्तानचे पहिले राष्ट्रगीत लिहिणारे कवीही हिंदूच होते. पण, त्यांचे गीत हे पाकिस्तानी संसदेने स्वीकारले नाही. अर्थात, फाळणीपूर्व भारतात उर्दू भाषिक असणारे लोक सर्वच धर्माचे होते, हे मात्र निश्चित. पण, स्वातंत्र्योत्तर काळ हा उर्दूला तीचे जन्मस्थान असणाऱ्या भारतात खूपच कठीण गेला. विशेष म्हणजे उर्दू भाषा ही मातृभाषा नसणाऱ्या मुस्लिम जनतेनेही ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. कदाचित, त्यांनाही असे सिद्ध करायचे होते की, उर्दूच आमची मातृभाषा आहे!
पाकिस्तानची राष्ट्रभाषा असली तरी भारतीय घटनेने तीला प्रमुख १५ राष्ट्रीय भाषांमध्ये स्थान दिले होते. पण, ती केवळ घटनेतच ’राष्ट्रीय भाषा’ बनून राहिली. कोणत्याही राज्याची मुख्य राजभाषा नसल्याने तीला मानचे स्थान मिळाले नाही. काश्मीर, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ती द्वितीय भाषा म्हणून स्वीकारली गेली. भारतीय प्रशासकांनी उर्दूची प्रगती व्हावी याकरीता प्रयत्न केले. परंतू, त्याचा म्हणावा तसा लाभ भाषा प्रगतीसाठी झाला नाही. आजही उर्दूची मुस्लिम भाषा ही प्रतिमा बदलू शकलेली नाही.
२४ फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो. बांगलादेश व बंगाली भाषेमुळे ’संयुक्त राष्ट्रसंघा’ला तो जाहीर करावा लागला होता. उर्दू ही राष्ट्रभाषा जाहीर झाल्याने पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) वर अन्याय झाल्याची भावना तेथील जनतेत होती. उर्दू सोबत बंगालीही राष्ट्रभाषा जाहीर करावी अशी मागणी पूर्व पाकिस्तानचे लोकप्रतिनिधी करीत होते. त्याविरूद्ध याभागातील जनतेने मोठे आंदोलन केले होते. त्याचेच स्मरण म्हणून ’जागतिक राष्ट्रभाषा दिवस’ साजरा केला जातो. पाकिस्तानची पुन्हा फाळणी होण्यामागे व बांगलादेशची निर्मिती होण्यामागे उर्दूचा अस्वीकार हेही मोठे कारण होते. अर्थात, बांगलादेश हा मुस्लिमबहुल देश आहे व एकेकाळी तो भारताचाच भाग होता. त्यांना जर उर्दू अन्यायी वाटत असेल, तर ती केवळ मुस्लिम जनतेचीच भाषा आहे, असे म्हणणे पूर्णत: चूकिचे आहे. दक्षिण भारतातही विशेषत: केरळ व तमिळनाडूत मल्याळम व तमिळ ह्याच मुस्लिमांच्याही मातृभाषा आहेत. त्यांना उर्दूचा गंधही नाही.
उर्दूसारख्या ’अदब’ असणाऱ्या भाषेचा प्रसार करायचा असल्यास तीची प्रतिमा बदलने सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी मुस्लिम व हिंदू या दोहोंचाही हातभार असणे महत्वाचे ठरते.
ِاس بلاگ: tushar.kute@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com