
दादासाहेब फाळकेंच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्याचे कार्य केवळ एक मराठी दिग्दर्शकच करू शकतो. परेश मोकाशीने ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ बनवून ही गोष्ट सिध्द करून दाखविली. भारतातला पहिला चित्रपट हा एका मराठी माणसाने बनविला होता, ही बाब आजही बऱ्याच मराठी जनांना माहित नाही. धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रसृष्टिचे जनक कसे बनले, याची रंजक कहाणी म्हणजे, ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ होय. परेश मोकाशीचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी त्याने तो खूपच सुंदर दिग्दर्शित केला आहे.
कधी कधी हा चित्रपट ’डॉक्युमेंटरी’ वाटतो. परंतु, त्यास विनोदी बाज दिल्याने चित्रपट म्हणून त्याची रंजकता वाढली आहे. परेशने अभ्यासल्या प्रमाणे दादासाहेबांचे व्यक्तिमत्व हे विनोदी होते. चित्रपट पाहिल्यावर त्याची प्रचिती निश्चितच येते. १९ व्या शतकाच्या सुरूवातीचा कालखंड उभारण्यात दिग्दर्शक पूर्णत: यशस्वी झाला आहे. प्रेक्षक खरोखर चित्रपट पाहताना त्या कालखंडात गेल्याचे दिसतात! दादासाहेबांची भूमिका करणाऱ्या नंदू माधव यांचा अभिनय तर उत्कृष्टच! खरोखरचे दादासाहेब वाटतात. ज्यांना फाळकेंबद्दल माहिती नाही, त्यांच्या डोळ्यासमोर फाळके म्हणजे नंदू माधव हीच प्रतिमा उभी राहिली तर नवल वाटायला नको. त्याच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या विभावरी देशपांडेचाही अभिनय छान झालाय. पतीला पाठिंबा देणारी सरस्वती त्यांनी छान साकारलीय. भारताकडून ऑस्करसाठी उत्तम चित्रपट पाठविण्यात आला होता. पण, अमेरिकनांच्या डोक्यात भारतीय चित्रपट जातील तर नवलच!
चित्रपटात एका दृश्यामध्ये परेश मोकाशीने स्वत: काम केले आहे. दादासाहेबांची मोशन पिक्चर्सची चित्रे पाहून तो पळून जातो, असे ते दृश्य होते. चित्रपटाला वेग चांगला असल्याने तो जराही कंटाळवाणा वाटत नाही. केवळ १०० मिनिटांमध्ये भारतीय चित्रपटांची जन्मकथा संपते. हा चित्रपट मराठी चित्रसृष्टीत एक मैलाचा दगड ठरणार आहे, हे मात्र नक्की. प्रत्येक मराठी माणसाने ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पायरेटेड सीडीवर न पाहता चित्रपटगृहात जाऊन पाहावा हीच अपेक्षा...!
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com