Saturday, February 27, 2010

मराठियांचा दिनू….


मराठीच्या मुद्द्याला राजकिय पटावर मोठे यश मिळू लागल्यावर सध्या सर्वत्र मराठी-मराठी म्हणूनच बोलबाला चालू आहे. २७ फेब्रुबारीला आंतरराष्ट्रीय मराठी दिन साजरा झाला. या दिवशी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी विविध ’उपक्रमांनी’ आपणच मराठीचे कैवारी आहोत या थाटात कुसुमाग्रजांचा जन्मदिवस साजरा केला. लोकांच्या भावनेला हात घालण्याचे काम आजकालचे राजकीय पक्ष खूपच उत्कृष्टपणे करतात. त्यातल्या त्यात मातृभाषा म्हणजे अखिल जनांच्या अस्मितेचा विषय असतो. ज्यांना कुसुमाग्रजांचे मूळ नावही माहित नसेल, त्यांनी या दिवशी आपले प्रखर मातृभाषाप्रेम दाखवून दिले. आपल्या नाशिकमध्ये तर ’कुसूमाग्रज’ जयंतीनिमित्त खास ’वकृत्व’ स्पर्धा आयोजित केली होती. यातूनच आपल्या मराठी भाषेचे भवितव्य फारच उज्ज्वल आहे हेच दिसून येते!
गेल्या काही महिन्यांपासून मराठी भाषेचा मुद्दा खूपच प्रखरतेने राजकीय पक्षांनी मांडला. त्यात त्यांची चढाओढच चालू होती, यात वाद नाही. पण, त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणसाची प्रतिमा राष्ट्र पातळीवर खराब होत होती, याचे कोणाला घेणे देणे नव्हते. सर्वसमावेशक म्हणून ओळखला जाणारा मराठी माणूस आज संकुचित वृत्तीचा ’महाराष्ट्रीयन’ म्हणून ओळखला जाऊ लागलाय, याचे एक मराठी म्हणून मला दु:ख वाटते. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असावा, यात गैर काहीच नाही. पण, तो इतकाही ज्वलंत नसावा की, त्याने स्वभाषिकांची प्रतिमाच बदलून जावी. आज जे लोक नुसते मराठीच्या नावाने गळे काढतायेत त्यांनी आपल्या मराठीसाठी काय केले, याचे सर्वप्रथम उत्तर द्यावे. मराठी माणूस मराठीच्या प्रगतीसाठी फारसा हातभार लावत नाही, हे आजवर सिद्ध झालेले आहे. त्यामुळे, नुसता मातृभाषेचा अभिमान बाळगण्यात अर्थ नाही. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान असणे महत्वाचे आहे.
कोणत्याही भाषेचे महत्व त्या भाषेत असणाऱ्या कला, साहित्य व संस्कृतीने अधोरेखित होत असते. त्यासाठी मी थोडक्यात आकडेवारी इथे देत आहे. आपली मराठी ही मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार भारतात चौथ्या क्रमांकाची व जगात १७ व्या क्रमांकाची भाषा आहे. ही निश्चितच अखिल मराठियांसाठी अभिमानाची बाब आहे. देशात लोकसंख्येनुसार हिंदी, बंगाली, तेलुगू, मराठी, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओरिया, पंजाबी, आसामी, मैथिली, भिल्ली, संथाली, काश्मीरी, गोंडी, सिंधी व कोंकणी असा क्रम येतो. जवळपास आठ कोटी भारतीयांची मातृभाषा ही मराठी आहे. मराठी भाषेतील साहित्यनिर्मीतीचा विचार केल्यास दक्षिण व पूर्व भारतीय भाषा सोडाच पाच कोटी लोकसंख्या असणाऱ्या गुजरातीपेक्षाही कमी पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित होतात!
ज्ञानपीठ हा भारतीय साहित्यविश्वातला सर्वोच्च सन्मान आहे. एखाद्या भाषेतील सर्वोत्तम कलाकृतीला व सहित्यिकाला हा दरवर्षी पुरस्कार दिला जातो. मराठी भाषेला हा पुरस्कार १९६५ पासून आजपर्यंत केवळ तीन वेळा मिळाला आहे! याउलट हिंदी व कन्नड भाषेत हा पुरस्कार प्रत्येकी सात वेळा, बंगालीला पाच वेळा, मल्याळम चार वेळा तर ओरिया व गुजरातीला तो तीन वेळा मिळालेला आहे.
विविध कलांचा संगम म्हणून चित्रपटांकडे पाहिले जाते. भारत सरकारद्वारे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार हा चित्रपटांचा देशातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. १९५४ पासून हा पुरस्कार दिला जातो. या प्रदीर्घ काळात केवळ दोनच मराठी चित्रपटांना पुरस्कार मिळाला आहे! परंतु, राष्ट्रीय पुरस्कार मिळणाऱ्या बंगाली चित्रपटांची संख्या आहे... तब्बल २२! तसेच १० हिंदी, ९ मल्याळम व सहा कन्नड चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. केवळ काही हजारात लोकसंख्या असणाऱ्या संस्कृत भाषेतही हा पुरस्कार दोनदा मिळाला आहे. सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून हिंदी बरोबर तमिळ चित्रपटांना सर्वाधिकवेळा पुरस्कार मिळालेत. परंतु, यात एकाही मराठी चित्रपटाचा समावेश नाही! भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणाऱ्या चित्रपटांत तब्बल २८ हिंदी व ८ तमिळ चित्रपट होते. मागच्या पाच वर्षांत दोन मराठी चित्रपट ऑस्करची वारी करून आले, नाहीतर मराठीची ही पाटीही कोरीच राहिली होती! सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार म्हणून उपेंद्र लिमयेला मराठी चित्रपटासाठी प्रथमच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तिथेही हिंदी-१५, मल्याळम-११, तमिळ-६ व बंगाली-५ अशी आकडेवारी आहे. स्त्री कलाकारांच्या बाबतीत तर आजही मराठीची पाटी कोरी आहे. या प्रवर्गात हिंदीला १७, बंगाली, तमिळ व मल्याळमला प्रत्येकी पाच व तेलुगू आणि कन्नडला प्रत्येकी तीन पुरस्कार मिळालेत. मराठी भाषक अभिनेत्री पैसा व ग्लॅमर मिळविण्यासाठी केवळ हिंदी चित्रपटांत काम करत आहेत. हिंदीमध्ये अन्य भाषिक अभिनेत्रीही आहेत. परंतु, स्वभाषेची कास त्यांनी सोडलेली नाही. रेखा व श्रीदेवीने अनेक कन्नड, तेलुगु व तमिळ चित्रपटांतून काम केले आहे. रीमी सेन, रायमा सेन, कोंकणा सेन, राणी मुखर्जी, बिपाषा बसु, शर्मिला टागोर, यांचे बंगाली चित्रपटसृष्टीला मोठे योगदान आहे. याउलट आपल्या माधुरी दिक्षित व उर्मिला मातोंडकरचे मराठी चित्रसृष्टीला काय योगदान आहे? याचे उत्तर मराठी भाषकांनी शोधावे. गोवारीकर, भांडारकर सारखे दिग्दर्शक हिंदीत चित्रपट काढून पैसे कमवितात पण त्यांना मराठीत साधा चित्रपट काढता येत नाही! याउलट प्रियदर्शन, मणिरत्नम, हृषिकेष मुखर्जी, अपर्णा सेन, कमल हसन यासारखे दिग्दर्शक स्वभाषेला प्रथम प्राधान्य देत चित्रपट तयार करतात. यातून मराठियांनी काही शिकण्यासारखे नाही का? याचा विचार करायला हवा.
आता थोडे भारतीय वृत्तपत्रांबद्दल पाहूया. मला सर्वात खेदाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते की, सर्वाधिक खप होणाऱ्या देशातील पहिल्या ३० वृत्तपत्रांत केवळ एक वृत्तपत्र हे मराठी आहे! तर या यादीत १२ इंग्रजी, ६ हिंदी, तर गुजराती, तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम भाषांच्या प्रत्येकी दोन वृत्तपत्रांचा समावेश होतो.
वरिल सर्व गोष्टी मराठियांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत. या सर्व भाषिकांनी कधीच स्वत:च्या भाषेच्या नावाने राडा केला नाही, तरीही त्यांच्या भाषांनी विविध उंची गाठल्या आहेत. याउलट, आम्ही मराठी भाषिक नुसता मराठीचा कट्टर अभिमान बाळगतो. पण, आमच्या भाषेच्या प्रगतीसाठी मात्र कधीच हातभार लावत नाही. आमच्या नाशिकमध्ये, हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तोबा गर्दी होते. त्याचवेळी, मराठी चित्रपटाकडे कोणी ढूंकूनही पाहत नाही. आमचे सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे व केदार शिंदे मराठी चित्रपट सोडून लगेच हिंदीतल्या ग्लॅमरकडे आकर्षित होतात, साधना सरगम सारखी मराठमोळी गायिका मराठी सोडून तमिळ भाषेत राष्ट्रीय पुरस्कार घेऊन जाते तर मूळची बंगाली असणारी व मराठीवर नितांत प्रेम असणारी श्रेया घोषाल मराठियांना उत्तम मराठी गाण्यांचा नज़राणा देऊन जाते. मराठी लोकच मराठीचा आदर करत नाहीत तर नुसता मराठी दिन साजरा करून काय उपयोग? आपल्या पोकळ भाषाप्रेमाचे प्रदर्शन करून भाषेची प्रगती कधीच होणार नाही, हे मराठी भाषिकांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
दुसऱ्या भाषेचा धिक्कार करून आपल्या भाषेची प्रगती कधीच होत नसते, उलट तीची नाचक्की होईल. त्यामुळे आपली भाषा कशी पुढे जाईल, याचा विचार मराठी भाषिकांनी करायला हवा, तरच वरती दिलेल्या आकडेवारीत मराठी भाषा मानाच्या स्थानी आपल्याला दिसून येईल...

1 comment:

to: tushar.kute@gmail.com