महाराष्ट्राच्या प्रत्येक शहराचे स्वत:चे असे काहितरी वैशिष्ट्य असते. तसे आमच्या पुणे शहराची बरीच वैशिष्ट्ये आहेत. त्यातीलच एक म्हणजे पुणेरी पाट्या. पुण्यात राहत असताना बऱ्याच विविध प्रकारच्या पाट्या अनेक ठिकाणी टांगलेल्या दिसायच्या. तसं पाहिलं तर पाट्या ह्या सर्वच शहरांमध्ये असतात पण पुणेरी पाट्यांची तऱ्हाच मात्र नामानिराळी आहे. सर्वसाधारण सूचना मानवजातीला समजत नाहीत, अशी सर्व पुणेकरांची समजूत आहे व ते बहुतांशी खरंही आहे. म्हणूनच पुणेकरांनी पाट्या लिहिण्याची स्वत:ची शैली विकसित केली आहे. याच शैलीने पुणेकर पाट्या लिहितात. या पाट्या बाहेरच्या लोकांना जहाल व विचित्र वाटत असल्या तरी पुणेकर नागरिकांना मात्र याची सवय झाली आहे. पुण्यात पाट्या तयार करायच्या म्हणजे पुणेरी नियमच वापरायचा असा दंडकच आहे. इकडे नाशिकमध्ये राहत असताना कधी मला पुणेरी ’स्टाईल’च्या पाट्या दिसल्या की लगेच पुण्याची आठवण येते. वाटतं, हा पाटी लिहिणारा नक्कीच पुण्यात राहणारा असावा...! पुण्याच्या पाटीचे उदाहरण द्यायचं झालं तर ’नो पार्किंग’ ची सर्वसामान्य पाटी वाचून सहसा कुणी तिथे गाडी लावायला घाबरत नाहीत. आमचे पुणेकर त्या ’नो पार्किंग’ च्या पुढे ’लावल्यास चाकातील हवा काढली जाईल’ असे लिहून टाकतात. यामुळे गाडी लावणारा दहा वेळा विचार करतो, ’खरंच गाडी लाऊ की नको?’ सर्वच मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांनी पुणेरी पाट्यांवर विशेष वृत्तही दिलेले आहे.
पुण्याची आयपीएल टीम येणार हे समजल्यावर त्यावरही पुणेरी पाट्या तयार झाल्या. सध्या हा ’फॉर्वडेड इमेल’ अनेक मेलबॉक्समधून फिरतो आहे. त्यातीलच एक उदाहरण त्यायचे झाले तर ही पाटी वाचा: “सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.”
अशा प्रकारच्या पाट्या ’छोटा डॉन’ नावाच्या मराठी ब्लॉगरने सर्वप्रथम तयार केल्या होत्या. यासर्वच पाट्यांसाठी छोट्या डॉनला धन्यवाद. अस्सल पुणेकर असल्याप्रमाणे त्याने या पाट्या लिहिल्या आहेत. तो बंगळूरू मध्ये ऑटोमोटिव्ह इंजिनियर आहे. खरोखर अश्या लोकांच्या कल्पनाशक्तीला मात्र दाद द्यायला हवी. असो, त्यामुळे आता पुणे शहरी आयपीएल दरम्यान काय करावे व काय करू नये हे मात्र लोकांना समजेल, असे म्हणायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com