सकाळी कॉलेजला येताना रोज स्टॉपवर बसची वाट पाहत असायचो. आमच्या इथली मराठी माध्यमाची शाळा भरण्याची हीच वेळ होती. त्यामुळे, रोज सकाळच्या वेळेस शाळेत जाणारी मुले पाहायला मिळायची. परिसरातले कामगार सायकलवर वा चालत त्यांच्या मुलांना शाळेत घालायला येत असत. तर काही मुले-मुली सायकलवर शाळेत जाताना दिसायची. याच कालावधीमध्ये शहरातल्या इंग्रजी माध्यमातल्या ’इंटरनॅशनल स्कूल’च्या गाड्या फिरताना दिसायच्या. त्या तर अगदी हाय-फाय. त्यांचे यूनिफॉर्म तर एखाद्या कॉलेजच्याही वर होते. या मुलांना सोडायला आलेल्या आई-वडिलांवरून त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज़ यायचा. याउलट मराठी माध्यमातल्या शाळांतील मुलांची परिस्थिती होती. त्यांच्या यूनिफॉर्म (गणवेश) मधील रंगातील विविधतेवरूनच सर्व काही समजून जायचे...! काहीचा गणवेश तर फाटलेला दिसायचा. तरीही ती मुले उत्साहाने शाळेत जात होती.
रोज मला एका सायकलवर मोठी बहिण व तीचा लहान भाऊ मराठी माध्यमाच्या शाळेत जाताना दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र रोज तोच उत्साह दिसायचा. ’इंटरनॅशनल स्कूल’च्या मुलांकडे ही मुले ढूंकूनेही पाहत नसत. स्कूलच्या मुलांच्या नट्ट्यापट्ट्याकडे त्यांच्या आयांचे बारकाईने लक्ष होते. कारण, स्टॉपवर येईपर्यंत त्या आपल्या मुलांच्या केसांवरूनच हात फिरवत असायच्या. पण, शाळेतील मुली मात्र विस्कटलेल्या केसांनीच ज्ञान मिळविण्यासाठी शाळेत जात होत्या. अशावेळी मनात निरनिराळ्या विचारांची गर्दी व्हायची. व मराठी आणि इंग्रजी माध्यमातील फरक समोर दिसून यायचा.
आजकाल पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी भयंकर ’जागरूक’ झालेले आहेत. म्हणूनच ते आपल्या पाल्याच्या ’उज्ज्वल’ भवितव्यासाठी त्याला हाय-फाय इंटरनॅशनल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. कारण, आपला मुलगा-मुलगी तिथे शिकून मोठ्ठा व्हावा ही त्यांची अपेक्षा असते. एका अर्थाने मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून कुणाचे भले होत नाही, याची आज सर्वांना खात्री झाली आहे. कारण, या शाळेत शिकून त्यांनी स्वत:नीच कोणते दिवे लावलेले नसतात. आज मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये गरिब व श्रीमंत हा एक मोठा फरक बनू लागला आहे.
मराठी माध्यमांच्या शाळांबद्दल आपल्या समाजात जो मोठा गैरसमज आहे, तो दूर होणे गरजेचे आहे. मातृभाषेचे शिक्षण हे केव्हाही उत्तमच असे डॉ. कलाम व जयंत नारळीकर यांनीही म्हटले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊनच मनुष्य खऱ्या अर्थाने ’ज्ञान’ मिळवू शकतो. स्वभाषेतून शिकलेल्या व परभाषेतून शिकलेल्यांमधील ज्ञानातला फरक लगेच समजून येतो. पण, ह्या गोष्टी समजून घेतील ते आजचे पालक कसले...!
इंग्रजीचे कोणाला वावडे नसावे. ती जरूर शिकावी पण प्राथमिक शिक्षणात ज्ञानभाषा म्हणून नव्हे. प्राथमिक ज्ञानभाषा ही मातृभाषाच असायला हवी. आपले सरकार कितीही मोठा आव आणत असले तरी त्यांनी मातृभाषेला शिक्षणातून बाजुला सारण्याचाच प्रयत्न चालवला आहे. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत, याची त्यांना बिल्कुल चिंता नाही. ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून रट्टा मारणारी रद्दी बाहेर पडते, अशा शाळांना मोठ्या प्रमाणात मान्यता मिळत आहेत कारण तिथे त्यांना अनुदान द्यावे लागत नाही. अगदी ग्रामीण भागातही या शाळा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. या मुलांना स्वत:चे नाव इंग्रजीत व्यवस्थित लिहिता येत नाही, ती इंग्रजी काय बोलणार. आमच्या खेड्याच्या भागातही इंग्रजीचे लोण पसरले आहे. चौथीपर्यंत मुलांना आपण आजवर काय शिकलो तेच समजत नाही. ’जॉनी जॉनी एस पप्पा..’ च्या पुढे ते काय म्हणतं हे त्याचे त्यालाच समजत नाही. पप्पा मात्र मोठ्या कौतुकाने आपल्या मुलाचे कौतिक मित्रांना सांगत असतो. उलट आमच्या मराठी माध्यमाची मुले छान बडबडगीते म्हणून दाखवितात. त्यात त्यांना निदान कळते तरी की आपण काय म्हणतोय ते...
बघा विचार करा.........
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com