Wednesday, March 24, 2010

वाढदिवसाच्या शुभेच्छा...!


आपल्या आजोबाच्या वयाच्या असणाऱ्या वडिलधाऱ्यांना जर त्यांचे वय विचारले तरी त्यांना ते बरोबर सांगता येत नाही. कारण, त्या काळामध्ये माणूस जन्माला आला तरी त्याची नोंद कोणी ठेवत नसत. आपल्या पंतप्रधानांना देखील त्यांचे स्वत:चे खरे वय व जन्मतारीख माहित नाही! अर्थात, कालांतराने जन्मतारखेचे व वयाचे महत्व वाढत आले. त्यामुळे आज सर्वांनाच स्वत:ची जन्मतारीख माहित असते. विशेषत: आपल्या महान नेत्यांना तर ती पक्की ठावूक असते. तसेच ज्यांना ती माहित नाही, त्यांनी आपली आवडती तारिखच जन्मतारीख म्हणून लावली असते.
आपल्या राजकारण्यासाठी व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांचा वाढदिवस म्हणजे एक पर्वणीच असते, हे त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहातून दिसून येते. एखाद्या गल्लीतल्या नेत्याचा वाढदिवस असला की, कार्यकर्ते हे एक आठवडा आधीच तयारीला लागतात. त्यात सर्वात महत्वाचे असते ते, वाढदिवसाचे होर्डिंग... ही पद्धत कोणी तयार केली माहित नाही. पण, नेत्यांच्या वाढदिवसाच्या तयारीचा तो एक मोठा भाग असतो. आज त्याने खूप मोठे रूप धारण केले आहे. इतके की, अश्या होर्डिंग्ज मुळे आपल्या शहराचे सौंदर्यच नष्ट होते. नुसत्या नाशिकचेच उदाहरण घेतले तर इथे दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या तरी लाडक्या नेत्याचा वाढदिवस असतो. मग, त्या पूर्ण आठवडाभर त्या नेत्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक शहरात लावले जातात, जणू काही आपल्या देशाच्या पंतप्रधानाचाच वाढदिवस आहे. प्रत्येक फलकावर अनेक कार्यकर्त्यांचे छोटे छोटे फोटो दिसतात. त्यात प्रत्येकाचे भाव निरनिराळॆ...! कोणी, दात दाखवत असतो तर कोणी मख्खपणे पाहत असतो, कोणाच्या चेहऱ्यावरची माशी उठत नाही तर कोणी पहिल्यांदाच फोटोसाठी उभा असल्यासारखा दिसतो. काही ठिकाणी तर मी, थेट शिक्के मारलेले फोटो लावल्याचे पहिले आहे...! प्रत्येक फोटो वेगवेगळ्या कोनातून काढल्याचे दिसते. असे वाटते की, हे सगळे एकमेकांकडेच पाहत आहेत. नेत्यांच्या फोटोची तर वेगळीच तऱ्हा दिसून येते. प्रत्येक फोटोत ते निरनिराळ्या पद्धतीने दात दाखवित असतात. काही, ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या रंगातील छटांतील प्रतिमा दाखविल्या जातात. असे दिसते की, नेत्याच्या भावाचेही फोटो त्याच्या मागे लावले आहेत...!
हा सर्व प्रकार नेते वे कार्यकर्ते केवळ त्यांच्या प्रसिद्दीसाठी करतात यात वाद नाही. दहा ठिकाणी स्वत:चे फलक लावायला नेतेच सर्वच कार्यकर्त्यांना पैसे देतात यातही वाद नाही. पण, या सर्वांमुळे शहराचे सौंदर्य बिघडते, याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. राजकीय नेत्यांकडून आपण तशी अपेक्षाही करणे चूकीचे आहे. महापालिकाही या सर्व बाबींकडे राजकीय कारणांमुळे दुर्लक्ष करते, कारण त्यांचे नेते विनापरवाना शहरभर फलक लावत फिरतात. कधीतरी स्वत:च्या ’रेकॉर्ड’ साठी अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात येते. यामागचे राजकारणही न समजण्याइतपत सामान्य जनता मूर्ख नक्कीच नाही.
मागच्या महिन्यामध्ये नाशिकच्या एका मध्यवर्ती चौकात एका समाजसेवी संस्थेने शहर फलकमुक्त करण्यासाठी आवाहन करणारा फलक लावला होता. त्याला सन्मान देणे दूरच त्याच फलकासमोर नेत्यांनी मोठे होर्डिंग लावून स्वत:ची राजकीय ’ताकत’ दाखवून दिली.
म्हणूनच सूजाण नागरिकांनी वरील एक फलक तयार केला आहे...

1 comment:

to: tushar.kute@gmail.com