एखादा संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही न पोहोचता त्या संघातील खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार प्राप्त झाल्याचे कधी पाहिले आहे का? अशी घटना केवळ एकदाच क्रिकेटच्या इतिहासात घडली आहे जेव्हा १९९९ साली दक्षिण आफ़्रिकेच्या लान्स क्लुसनरला सामनावीराचा बहुमान प्राप्त झाला होता. हा लान्स क्लुसनर ’झुलू’ या नावाने ओळखला जातो.
मी पाहिलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांपैकी झुलू हा सर्वोत्तम खेळाडू आहे, असे मला वाटते. काही वर्षांपूर्वी त्याची दक्षिण आफ्रिकेच्या संघातून हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर त्याचे नाव क्रिकेट विश्वातून पुन्हा ऐकायला मिळालेले नाही. १९९६ मध्ये जेव्हा भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता तेव्हा मी क्लुसनरची फलंदाजी पहिल्यांदा पाहिली. खरं तर तो एक अष्टपैलू खेळाडू होता. डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी करायचा. फलंदाजी व गोलंदाजीची त्याची स्वत:ची एक शैली होती. दक्षिण आफ्रिकेचे बहुतेक फलंदाज फलंदाजी करताना बॅट जमिनीवर टेकवत नाहीत. ती अधांतरीच असते. आजच्या गिब्ज, कॅलिस, ड्युमिनी यांची फलंदाजी या प्रकारची आहे. तीची सुरूवात मला लान्स क्लुसनरच्या बॅटिंगपासून दिसून आली. बेसबॉलमध्ये बेसमन ज्या प्रकारे बेस घेऊन उभे राहतात. तसेच क्लुसनर बॅट घेऊन उभा रहायचा. सुरूवातीला अशी फलंदाजी थोडी विचित्र वाटत असायची. वाटे, की तो हातात हातोडाच घेऊन उभा आहे. व खरोखरच त्याची बॅट म्हणजे हातोडा म्हणून चालू लागे. फलंदाजीच्या क्रमवारीत त्याने क्रमांक ७ वर नेहमी फलंदाजी केली आहे. तरी त्याचा फलंदाजीचा रेकॉर्ड हा खूप लाजवाब दिसून येतो. कोणत्याही फलंदाजापुढे त्याने कधीच गुडघे टेकवले नव्हते. त्याचा हातोडा बऱ्याच फलंदाजांवर चालला. फलंदाजीच्या क्रमवारीत त्याच्याबाबतीत तरी कधी बदल झाल्याचे मला आठवत नाही.
दक्षिण आफ्रिकेला जरी १० च्या रनरेटने धावा करायच्या असल्या व एकच विकेट बाकी असली आणि क्लुसनर जर मैदानावर असेल तर प्रतिस्पर्ध्यांना कधीच स्वत:च्या विजयाची खात्री वाटत नव्हती. अशी हुकूमत याने प्रस्थापित केली होती. सामना जर खूपच अतितटीचा झाला तर क्लुसनरच आफ्रिकेचा तारणहार बनून येत असे. अनेक सामने त्याने एकहाती खेचून आणले होते. खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येत असला तरी त्याच्या नावावर दोन नाबाद शतकांची नोंद आहे.
क्लुसनर मूळचा वेगवान गोलंदाज होता. दक्षिण आफ्रिकेत झुलू मुलांसोबत तो क्रिकेट खेळत असे. त्याचे प्रदार्पणच भन्नाट झाले होते. पहिल्याच सामन्यात त्याने आठ बळी घेऊन गोलंदाजीतील कमाल दाखवून दिली होती. हातोडा म्हटल्याप्रमाणेच त्याची जड बॅट होती. त्या काळात क्लुसनर सर्वात जड बॅट वापरत असे. त्याच्या गोलंदाजीबाबत एक किस्सा सांगायचा झाला तर महंमद अझरूद्दीनने जेव्हा वेगवान शतक दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झळकाविले होते तेव्हा त्याने क्लुसनरच्या गोलंदाजीवर सलग पाच चौकार लगाविल्याचे मला आठवते. त्याच मालिकेमध्ये एकदिवशीय सामन्यात अझहरचा त्रिफळा काढून व स्टंप मोडून त्याची परतफेड केली होती...!
१९९९ चा विश्वचषक हा त्याच्यासाठी सर्वात संस्मरणीय व दुख:दही ठरला. बहुतांश सामने त्याने एकहाती दक्षिण आफ्रिकेला जिंकून दिले होते. याच कारणामुळॆ त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. पण, ऐनवेळी संघाला अंतिम सामन्यात पोहोचविण्यात तो अपयशी ठरला. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया विरूद्ध ६ चेंडूत ९ धावा लागत असताना त्याने दोन सणसणीत चौकार लगाविले व पुढच्या चेंडूवर धावबाद झाला. ती दक्षिण आफ्रिकेची शेवटची विकेट होती. यावेळी दोष क्लुसनरलाच देण्यात आला होता.
राष्ट्रीय संघातून गच्छंती झाल्यावर त्याने ’आयसीएल’ ची वाट धरली. आज आयपीएल जगत पुन्हा लान्स क्लुसनरची वाट पाहत आहे...!
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com