Wednesday, April 14, 2010

सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक

आयपीएल च्या मॅच बघताना प्रत्येकाला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू सापडत असतो. मग तो फलंदाज असो, गोलंदाज असो, क्षेत्ररक्षक असो वा यष्टीरक्षक. यष्टीरक्षणाच्या बाबतीत यावेळी बरीच विविधता दिसून आली. जवळपास प्रत्येक संघाचे यष्टीरक्षक हे कसलेले होते. व राजस्थान आणि डेक्कन वगळता बाकी सर्वांनी एकापेक्षा अधिक यष्टीरक्षक खेळवले होते. त्यात मुंबईच्या आदित्य तारे, अंबाती रायुडू व चंदन मदन, कोलकत्याच्या वृद्धिमान साहा व ब्रेंडन मॅकलम, चेन्नईच्या धोनी व पार्थिव पटेल, बेंगलोरच्या उथप्पा व बाऊचर, डेक्कनच्या गिलख्रिस्ट, राजस्थानच्या नमन ओझा, दिल्लीच्या दिनेश कार्थिक व तिलकरत्ने दिल्शान, पंजाबच्या संघक्कारा व मनविंदर बिस्ला यांचा समावेश होतो. दोघे-तिघे वगळता बहुतेक सर्वांनीच यष्टीरक्षण केले होते. तीन यष्टीरक्षक तर आपापल्या संघाचे कप्तान आहेत. त्यामुळे त्यांच्या यष्टीरक्षणाबद्दल वेगळे सांगायला नको.

या सर्वांमधून क्रमांक एकची पसंदी द्यायला सांगितली तर मी दिनेश कार्तिकचे नाव घेईल. आजवर सर्वच संघांचे १२ सामने पूर्ण झाले आहेत. त्या सर्वांमध्ये दिनेश कार्तिकच सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून दिसून आला. ज्यांनी दिल्लीच्या सर्व मॅचेस पाहिल्या असतील, ते माझ्या मताची सहमती दाखवतील. एका यष्टीरक्षकाकडे असणारे सर्व गुण मैदानावर त्याच्या अंगी दिसून आले. त्याच्या हातून एखादा झेल किंवा यष्टीचीत सुटल्याचे दिसून आले नाही. याउलट धोनी व गिलख्रिस्ट सारख्या कसलेल्या यष्टीरक्षकांकडून मात्र चूका झालेल्या दिसल्या. शिवाय बहुतांश रनआऊट ही त्याने खूप चपळाईने केले आहेत. काही वेळा फलंदाज अगदी काही मिलिमीटरच्या फरकाने बाद झाल्याचे दिसले. त्यास कार्तिकचे कसलेले यष्टीरक्षणच कारणीभूत होते. यष्टीरक्षकाची जबाबदारी त्याने खूप समर्थपणे पेललेली आहे. धोनीसोबत त्याला भारतीय संघात स्थान मिळण्यास हरकत नव्हती...!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com