’आयसीसी वर्ल्ड टी-२०’ मध्ये भारताच्या गटात दक्षिण आफ्रिका असून अफगाणिस्तान हा नवा भिडू दाखल झाला आहे. प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानचे नाव ऐकू येवू लागले आहे. नव्यानेच अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्याने भारताला दूसरी फेरी गाठणे फारसे कठीण जाणार नाही.
आपल्या दक्षिण आशियाविषयी बोलायचे झाले तर क्रिकेट हा येतील बहुतांश देशांचा अघोषित राष्ट्रीय खेळ आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश नंतर त्यात आता अफगाणिस्तानचीही भर पडताना दिसत आहे. दक्षिण आशियातल्या कोणत्याच देशाचा क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ नाही. तरीही तो इथल्या जनतेचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. आशियातून या पूर्वी मलेशिया व यूएई हे देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे आपल्या खंडातील देशांची संख्या आता वाढू लागली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बद्दल सांगायचे झाले तर तालिबानी राजवटीमुळे इथल्या सर्वच खेळांना लगाम बसला होता. तालिबान राजवटीत खेळांवर बंदी घातली होती. त्याचा फटका अफगाणिस्तान क्रिकेटला निश्चितच बसला. त्यामुळे अन्य आशियायी देशांप्रमाणे इथले क्रिकेट बहरू शकले नाही. तालिबानच्या पूर्वी ब्रिटिशकाळात भारताप्रमाणे अफगाणिस्तानमध्येही क्रिकेट खेळले जायचे. काबूल, जलालाबाद व कंदाहर ही शहरे क्रिकेटची अफगाणिस्तान मधील उगमस्थाने मानली जातात. अफगाणिस्तान मध्ये पहिला क्रिकेट सामना १८ फेब्रुवारी १८७९ रोजी ६० रायफल्स वि. सेकंड ब्रिगेड यांच्यात झाला होता. १९९० मध्ये रशियन आक्रमणानंतर अनेक निर्वासित अफगाणिस्तान सोडून पाकिस्तानमध्ये आले. व त्यांना तिथेच क्रिकेटची मोठी गोडी निर्माण झाली. याच काळात पाकिस्तान क्रिकेट त्याच्या उच्च स्थानावर होते. पाकिस्तानने १९९२ चा विश्वचषकही जिंकला होता. त्याचा प्रभाव निश्चितच अफगाणिस्तान क्रिकेटवर पडला. कालांतराने निर्वासित अफगाणिस्तान मध्ये परतल्यावर त्यांनी स्वत:च्या देशाकरिता खेळणे चालू केले. १९९५ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची स्थापना झाली. परंतू, तालिबानी प्रभावाखाली क्रिकेटची कोणतीच प्रगती झाली नाही. असे असले तरी सन २००० मध्ये अफगाणिस्तान हा आयसीसी चा सभासद बनला. याच वर्षी अफगाणिस्तानच्या संघाला पाकिस्तानच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायला निमंत्रित करण्यात आले होते. पाच सामन्याच्या शृंखलेत पाकिस्तानने ३ सामने जिंकून दोन सामने अनिर्णित ठेवले. २००३ मध्ये त्यानी पुन्हा पाकिस्तान दौरा केला होता. २००४ मध्ये अफगाणिस्तान ला आशियायी क्रिकेट परिषदेचे सभासदत्व प्राप्त झाले. व पहिल्याच एसीसी ट्रॉफी मध्ये त्यांना सहावे स्थान प्राप्त झाले होते.
सन २००६ पासून अफगाणिस्तान क्रिकेट संघाची खरी प्रगती चालू झाली. या वर्षी मिडल ईस्ट कप मध्ये द्वितीय स्थानावर राहिले होते. २००६ मध्ये मुंबईत झालेल्या एका सामन्यात त्यांनी एमसीसी च्या संघाला १७१ धावांनी पराभूत केले होते. सन २०१० पर्यंत अफगाणिस्तानने आयसीसी व एसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून दाखविली आहे. झिम्बाब्वे मध्ये झालेल्या इंटरकॉंटिनेंटल कप मध्ये खेळताना मुटारे येथे पहिल्याच आंतरराष्ट्रीय प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी झिम्बाब्वेचा पराभव केला होता. याशिवाय त्यांनी यूएई अर्थात युनायटेड अरब एमिरेट्स संघलाही पराभवाचे पाणी चाखविले आहे. २००९ मध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेमध्ये अफगाणिस्तान ने पाचवे स्थान मिळविले होते.
आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलाच टी-२० चा सामना भारतासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यासोबत होत आहे. शिवाय दुसरा सामना हा दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध होत असल्याचे दडपण अफगाणिस्तान संघावर निश्चितच असणार आहे. परंतू, आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहण्यासाठी त्यांना या दबावावर मात मात्र करावी लागेल.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com