शाळेत शिकत असताना विविध ठिकाणी सुविचार लिहिलेले असायचे. त्यातीलच एक म्हणजे ’आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे’. अशा सुविचारांचा मला परिक्षेत खूप चांगला उपयोग व्हायचा. निबंध लिहिताना मी त्यांचा चांगल्या प्रकारे वापर करायचो. तेव्हढी कला माझ्यामध्ये निश्चितच विकसित झाली होती. पण, अशा सुविचारांचा अर्थ निटसा कळलेला नसायचा. त्यातीलच हा एक सुविचार होय.
प्रत्येक वाक्याला काही ना काही तरी अर्थ असतो. ’आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे’ या वाक्याला मात्र खूप अर्थ आहे. आजवर जी अशक्यप्राय कामे अनेक महान व्यक्तींनी केली आहेत, ती फक्त याच आत्मविश्वासाच्या जोरावरच. प्रत्येक व्यक्तीमध्ये आवश्यकच असणारा एक गुण म्हणजे आत्मविश्वासच होय. अगदी शब्दकोशीय अर्थ पाहिला तर, स्वत:वर स्वत:चा असणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास होय. मनुष्य जेव्हा स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम करतो तेव्हा त्याला यशाची सर्वाधिक खात्री वाटत असते. पण, स्वत:वर जर विश्वासच नसेल तर मनात अपयशाची भीती तयार होते. या एकमेव कारणामुळेच आजवर अनेकजण अपयाशाच्या गर्तेत सापडली आहेत. जो ’ऐकावे जनाचे करावे मनाचे’ या उक्तीप्रमाणे वागत नाही, तो बहुतांशी आत्मविश्वास नसणारा माणूस असतो.
विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना मला त्यांच्या आत्मविश्वासातील कमीची बऱ्याच वेळा जाणीव होते. स्वत:च्या ज्ञानाबद्दल अनेक जण साशंक असतात. अर्थात यासाठी केवळ आत्मविश्वासातील कमी एवढेच कारण मी सांगू शकतो. अनेकदा तोंडी परिक्षा घेत असताना मला असा अनुभव आला आहे. व नेहमी येतो. विद्यार्थ्यांने तोंडी परिक्षेला जरी बरोबर उत्तर सांगितले तरी त्याचा डळमळीत आत्मविश्वास ते उत्तर चुकिचे ठरवायला लावते. परंतु, काही जण यास अपवाद आहेत. या मुलांचा आत्मविश्वास खूप मजबूत असतो. परिक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वास जवळ ठेवणे खूप महत्वाचे आहे. मूलत: अनेकजण मला भरपूर प्रश्नांची उत्तरे येतात पण, परिक्षकासमोर मला ती सांगता येतील की नाही, याबाबतच सांशकच असतात. त्यामुळे प्रश्नांची उत्तरेच ते विसरून जातात. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांनाच त्याचा तोटा होत असतो. अनेक परिक्षक विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांचा स्वत:च्या उत्तरावरील विश्वासही तपासत असतात, हे त्यांनी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
वर सांगितल्याप्रमाणे ’आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे’ हे पूर्णत: खरे आहे. आत्मविश्वास जर अंगी असेल तर विद्यार्थी कुठलीही परिक्षा सहज पास करू शकतात. त्यामुळे स्वत:कडच्या ज्ञानासोबतच आत्मविश्वासही तितकाच महत्वाचा आहे.
Great, I like this blog. Totally agree with this.
ReplyDelete