Thursday, May 27, 2010

गूढ व अद्भूत

आजचा दैनिक गांवकरी वाचता वाचता एका विचित्र बातमीवर नजर गेली. अशा प्रकारच्या बातम्या मी नेहमी दैनिक संध्यानंद मध्ये वाचत असायचो. शिवाय आजच्या दैनिक लोकमतमध्येही ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे.

गेल्या दहा वर्षात प्रत्येकाच्या मृत्युला कारणीभूत ठरत असलेला ०८८८८८८८८८ हा मोबाईल क्रमांक बल्गेरियन मोबाईल कंपनीने बंद केला. हा क्रमांक वापरणाऱ्या शेवटच्या व्यक्तिची हत्या बल्गेरियाची राजधानी असलेल्या सोफिया येथील आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंटच्या बाहेर झाली होती. बल्गेरियन मोबाईल कंपनीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ब्लादिमीर ग्रश्नोव्ह हा या क्रमांकाचा पहिला वापर करणारा होता. त्याचे २००१ मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर बल्गेरियाचा माफिया डॉन केन्स्टाटीन दिमित्रोव्ह याला हा क्रमांक मिळाला. त्याची २००३ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी नेदरलॅंण्ड मध्ये हत्या करण्यात आली. दिमित्रोव्ह हा एका मॉडेलसोबत जेवण करत असताना हा मोबाईल त्याच्या जवळ होता तेव्हा त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, असे वृत्त डेली मेलने प्रसिद्ध केले आहे. हा विशेष क्रमांक नंतर उद्योजक कोन्सान्टीन दिशलीनेव्ह यांच्याकडे आला. त्यांची भारतीय उपग्रहाबाहेर २००५ मध्ये हत्या झाली. ते कोकेन वाहतुकीचे काम करत होते. सध्या हा क्रमांक स्थगित करण्यात आला आहे. हा फोन नेटवर्कच्या बाहेर असल्याचा संदेश मिळतो.

या ब्लॉगला दिलेल्या शीर्षकाप्रमाणेच ही बातमी एक गूढ व अद्भूत घटनेचे दर्शन घडविते. एखाद्या चित्रपटाला व गूढ कादंबरीला साजेशी अशी कथा आहे. जेव्हा आपण असे चित्रपट पाहतो किंवा कादंबरी वाचतो तेव्हा या प्रकारच्या घटना प्रत्यक्ष आयुष्यात घडत असतील, यावर विश्वास बसत नाही. त्याकडे आपण केवळ एक मनोरंजन म्हणून पाहतो. परंतु, अशा सत्य घटना घडल्याचे समजताच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.
साधारणत: दहा-बारा वर्षांपूर्वी मी सोनी टीव्हीवर ’आहट’ नावाची एक भयमालिका पाहयचो. त्यात भूत ही संकल्पना वगळता इतर सर्व प्रकारच्या गूढ कथा चित्रित केलेल्या असत. खरोखर, त्या कथाकाराची मन:पूर्वक प्रशंसा मी करायचो. पंधरा एक वर्षांपूर्वी ’कल्पिताहून अद्भूत सत्यकथा’ या नावाचे पुस्तक वाचनात आले. त्यात अनेक गूढ परंतु सत्य घटना लिहिलेल्या होत्या. अगदी नावानुसार त्या कल्पिताहून अद्भूत ह्या होत्याच. ते पुस्तक मला परत मिळाले नाही. कोणत्याच पुस्तकालयातही मला ते सापडलेले नाही. त्यात नमूद करावीशी वाटणारी अशी वरची कहाणी आहे. अगदीच अशा घटनांमागे कोणती शक्ती असते की हा निव्वळ योगायोग आहे, तेही समजायला मार्ग नाही...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com