
भटकायला तसं मला फारसं आवडत नाही. त्यातल्या त्यात पावसाळ्यात फिरणं म्हणजे मला कंटाळवाणं वाटे. पण, तरिही पावसाळ्यामध्ये माळशेज सारखा घाट पाहणं म्हणजे निसर्गाचे म्हणजे निसर्गाचे आपल्या जवळील खरे सौंदर्य पाहण्यासारखे आहे, असे मला वाटते.
माझ्या गावापासून माळशेज फार-फार चाळिस किलोमीटर असेल. आमच्या घरासमोरून जाणारा राज्यमार्ग हा अणे-माळशेज आहे. अणे आणि माळशेज ही जुन्नर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातीलही दोन टोके होत. काही वर्षांपूर्वी ह्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाची मान्यता मिळाली. तेव्हापासून माळशेजच्या घाटातील नियमित वर्दळ आता वाढलेलीच आहे. फिरण्यासाठी म्हणून माळशेजला मी मात्र केवळ एकदाच भेट दिली आहे. तसं पाहिलं तर या घाटातला प्रवास मला नेहमीचाच होता. ठाण्याला शिकत असताना दर सुट्टीत घरी यायचो तेव्हा माळशेजचे दर्शन हे ठरलेलेच होते. उन्हाळ्यातल्या सुट्टीत माळशेज निरस वाटायचा पण हिवाळ्याच्या अर्थात दिवाळीच्या सुट्टीत त्याचे निखरलेले सौंदर्य दृष्टीस पडायचे. त्याची सुरूवात खऱ्या अर्थाने जूनमधल्या मॉन्सूनच्या आगमनाने होते.
माळशेज घाट हा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरच्या आळेफाटा या गावापासून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारणत: ४५ किमी अंतरावर आहे. पूर्वी हा रस्ता फारसा मोठा नव्हता परंतू, गेल्या काही वर्षात तो अधिक चांगला बनविला आहे. तरीही माळशेज घाटाच्या जवळ असणारा रस्ता अजुनही जुन्याच अवस्थेत असल्याचे दिसून येते. आळेफाट्यानंतर ओतूर गांव सोडले की, सह्याद्रीचे डोंगर दिसू लागतात. प्रसिद्ध हरिश्चंद्रगड याच डोंगररांगांमध्ये आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुके आढळून येते. काही वर्षांपूर्वी या परिसरामध्ये पिंपळगाव जोगे हे मोठे नवे धरण बांधण्यात आले आहे. त्यामुळे मूळ रस्त्यात काही बदल करण्यात आले होते. जुन्नर तालुक्यातले शेवटचे गांव ’मढ’ हे पिंपळगांव जोगे धरणग्रस्तांसाठीच वसवण्यात आले आहे. हे गांव ओलांडल्यावर धरणाचे मोठे पात्र नजरेस पडते. डोगररांगा व धरणाचा परिसर ह्यांचा अप्रतिम संगम इथे अनुभवता येतो.

माळशेजची खरी सुरूवात ’वेळ खिंड’ नावाच्या छोट्या घाटातून होते. ही खिंड ओलांडल्यानंतर समोर धुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा व अनंत वाटणारे धरण दृष्टीस पडते. माळशेजचा प्रवास इथुनच सुरू होतो. माळशेज घाट हा भूसपाटीपासून बऱ्याच उंचीवर आहे. शिवाय तितक्याच उंचीवर आणखी डोंगर आहेत. त्यांची शिखरे ही धुक्यांमुळे नजरेस पडत नाहीत. आधीच्या प्रवासात जरी आपल्याला पाऊस लागला नसेल तरी माळशेज मध्ये पाऊस पडत असतोच. पावसाचे चारही महिने इथे पाऊस असतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. उंचाहून पडणारे धबधबे हे माळशेज घाटातील सर्वात मोठे आकर्षण ठरते. केवळ हौशी पर्यटकच नाही तर एसटीने प्रवास करणारे प्रवासीही त्याचा मनमुराद आनंद लुटतात. घाटाचे रस्तेही अनेक ठिकाणी पाण्याने भरलेले दिसून येतात. माळशेजचे पूर्ण दृष्टीस मावणारे एक-दीड किलोमीटरचे वळण हे धुक्यामध्ये भरून आलेले असते. त्यात वरून पडणारे धबधबे खूपच मोहक दिसून येतात. घाटामध्ये केवळ एकच छोटा बोगदा आहे. तोही काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. शिवाय एक छोटे मंदिरही आहे. पर्यटकांची याठिकाणी मोठी गर्दी असते.
बऱ्याच वर्षांपासून माळशेज रेल्वेचे धोंगडे शासन दरबारी भिजत पडले आहे. त्यास अजुनही मंजूरी मिळाली नाही. पण, माळशेजची रेल्वे तयार झाल्यावर पर्यटकांसाठी ती मोठी पर्वणीच ठरणार आहे. कारण, त्या रेल्वेने मुंबईहून खंडाळ्यासारखाच माळशेजचा प्रवास अगदीच जलद होऊन जाईल.
येत्या पावसाळ्यात माळशेजचे सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलून येईल. त्याच वेळेस तिथला नज़ारा याची देही याची डोळा पाहता येईल.
sundar
ReplyDeleteअप्रतिम संगम..खंडाळ्यासारखाच ...खरे सौंदर्य पाहण्यासारखे आहे...!!!
ReplyDelete