सिद्धार्थ जाधवचा बहुचर्चित ’हुप्पा...हुय्या’ बघितला. मराठी चित्रपटांतील फॅन्टासी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होय. सिद्धार्थ जाधव प्रथमच चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसून आला.
मराठीत फॅन्टासी प्रकातले चित्रपट बनविण्याची प्रथा महेश कोठारेने केली असावी. महेश व लक्ष्याचा ’थरथराट’ हा चित्रपट याच प्रकारात मोडतो. काही वर्षांपूर्वी केदार शिंदेने त्याचा ’अगं बाई अरेच्चा...’ हा पहिला चित्रपट बनविला. तो चांगलाच चालला होता. याच चित्रपटामुळे संजय नार्वेकर हा एक मराठीतील फॅन्टासी हिरो म्हणून पुढे आला होता. त्याने नंतरच्या काळात ’चष्मेबहाद्दर’, ’नशीबाची ऐशी तैशी’ असे याच प्रकारचे चित्रपट केले. आता सिद्धार्थ जाधवने फॅन्टासी हिरो म्हणून ’हुप्पा...हुय्या’ मधे प्रदार्पन केले आहे. सुपरहिरोची संकल्पना खऱ्या अर्थाने हॉलिवूडची आहे. ती बॉलिवूडमध्ये येऊन गेली. आता मराठी चित्रपसृष्टीतही ती रुजू पाहत आहे.
सिद्धार्थ जाधवचे नेहमीच्या शैलीप्रमाणे काम आहे. बजरंग बलीच्या एका अद्भूत शक्तीने तो ज्या करामती करतो ते या चित्रपटात दाखविले आहे. अनिल सुर्वेचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटात मोहन जोशी व उषा नाडकर्णी यासारखे ज्येष्ठ कलाकारही आहेत. शिवाय डॉ. गिरीश ओक यांची कन्या गिरीजा ओकही मराठीत अभिनेत्री म्हणून उदयास येत आहे. मानिनी व हिंदीतल्या ’तारे जमीन पर’ नंतर ती परत याच चित्रपटात दिसून आली. या चित्रपटाची कथा ही नेहमीच्याच धाटनीतली असली तरी मनोरंजक आहे. शिवाय अजित परबच्या संगीत दिग्दर्शनाखाली स्वप्नील बांदोडकरने गायलेले शीर्षक गीत उत्कृष्टच आहे.
सिद्धार्थ जाधवला मराठी चित्रपटांमध्ये अजुन बरीच मजल मारायची आहे. आता तर त्याची खरी सुरुवात होते आहे. नेहमीच्या साच्यातील भूमिका न करता त्याने नवे प्रयोग करणे गरजेचे वाटते.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com