सानियाने पाकिस्तानच्या शोएब मलिकशी विवाह केल्याची बातमी प्रसिद्धीमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात चघळली. ती इतके दिवस चघळत होते की दुसरी कोणतीही अन्य बातमी प्रसिद्धी माध्यमांना द्यावी वाटत नसावी. सानिया मिर्झावरच्या बातम्यांना मोठा टीआरपी मिळत असावा म्हणून प्रसिद्धी माध्यमांना अशी अक्कल सुचली. ही बातमी शिळी होऊ लागताच एक नवी बातमी प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागली. ती म्हणजे सानियाच्या विवाहावर आता ’हैद्राबादी दामाद’ नावाचा चित्रपट दक्षिणेत तयार होतोय. त्यामुळे सानिया जबरदस्त भडकलीय. कदाचित, तिला आता सेलिब्रेटी होत असल्याचा पस्तावा होत असावा.
या चित्रपटाच्या निमित्ताने भारतात व विशेषत: दक्षिण भारतात (आंध्र प्रदेशात) असणाऱ्या हैद्राबादी हिंदी विषयी मला थोडंसं लिहावसं वाटतंय. ’हैद्राबादी दामाद’ हा चित्रपट मुंबईच्या बॉलिवूड मध्ये तयार होत नसून हैद्राबादच्या टॉलिवूड मध्ये तयार होतोय. (तिकडे दक्षिणेत तेलुगू फिल्म इंडस्ट्रीला टॉलिवूड म्हणतात!). या टॉलिवूडमध्ये मुख्यत: तेलुगू चित्रपटच तयार होतात. पण, त्यातल्या त्यात हिंदी चित्रपटही इथे तयार होतात याची माहिती बहुतेक फार कमी जणांना असेल. हैद्राबाद हे नवांबांचे शहर असल्याने इथे उर्दू-हिंदीचा बऱ्यापैकी बोलबाला आहे. शिवाय जगातील एक मोठी फिल्म इंडस्ट्री अर्थात रामोजी फिल्मसिटी ही हैद्राबादला असल्याने तिथे हिंदी चित्रपट तयार होण्यासही वाव मिळाला आहे.
हैद्राबादला तयार झालेला हिंदी चित्रपट हा त्याच्या बोलीवरून व मांडणीवरून लगेच ध्यानात येतो. इंटरनेटवर सर्च केल्यावर मला प्रामुख्याने चार प्रकारच्या हिंदी भाषा आपल्या भारतात असल्याच्या दिसल्या. त्यातील पहिली भाषा ही खरीबोली हिंदी जी मूळ हिंदी मानली जाते, दुसरी बिहारी हिंदी जिची खरी ओळख माननीय लालू यादवांनी करून दिलीच आहे. तिसरी आहे ती बंबईया हिंदी जी प्रामुख्याने मुंबईत बोलली जाते व ती टपोरी या ’गटात’ मोडते. विकिपीडियावर ’बंबईया हिंदी’च्या नावाचा वेगळा लेख आहे. तो अधिक माहितीसाठी पाहता येईल. चौथी हिंदी म्हणजे हैद्राबादी हिंदी होय. या हैद्राबादी हिंदीबद्दल सांगायचं तर मुस्लिमबहुल भागात तीचा ’विकास’ झाल्याने ती उर्दूमिश्रित आहे! शिवाय कधी-कधी तीच्यात मराठी शब्द असल्याचे दिसून येते.
हैद्राबादी हिंदीत बनविलेले सर्वच चित्रपट हे विनोदी आहेत. ’हैद्राबादी दामाद’ हाही याच पठडीतला चित्रपट आहे. हैद्राबादी हिंदीत मी पाहिलेला पहिलेला पहिला चित्रपट म्हणजे ’फन एण्ड मस्ती’ हा होय. नावावरूनच तो विनोदी असल्याचे दिसून येते. यानंतर ’हंगामा इन दुबई (हैद्राबादी बकरा)’, ’हाफ फ्राय’ व ’हैद्राबादी नवाब’ हे चित्रपट पाहायला मिळाले. सर्वच चित्रपटांमध्ये चांगल्या तऱ्हेने कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. खरं तर हैद्राबादी हिंदीचा लहेजाच आपल्याला हसण्यासाठी मजबूर करतो. वरच्या सर्वही चार चित्रपटांत कलाकार हे सारखेच दिसून आले. एक कलाकार कमीत कमी दोन चित्रपटांत होता. यावरून इथले कलाकारही विशिष्ट प्रकारचे परंतू प्रोफेशनल असल्याचे दिसून येते. इशान खान, मस्त अली, गुल्लू दादा, अज़िज़ नासर हे कलाकार बहुतेक चित्रपटांत होते. केवळ एक कॉमेडी म्हणून या चित्रपटांना बघण्यास हरकत नाही.
आता हैद्राबादी चित्रपटांतील काही वाक्ये मी इथे लिहित आहे. त्यावरून या भाषेचा लहेजा कसा आहे ते ध्यानात येईल...
१. अरे तू मज़ाक नको करू रे भाई, मज़ाक तो मेरे गली का रज़ाक करता.
२. छोटा था, आंखियां निकाल ते आंटे खेलता था. जरा बडा हुआ तो आंखियां निकाल के गोटियां खेलता हू, और जरा बडा हुआ तो आंखियां निकाल के छर्रे खेलता हूं. बचपन से आंटे, गोटियां छर्रे सभी खेलते रे आपन. साले तुम्हारी हालत देखो, तुमको मारे तो इन लोगोन हस्ते मेरे पे.
३. अरे तुमको नई मालूम आपन दुनिया के पप्पा है, गलियां मे घुसने नही देतुं पाहाडान बताये तो.
४. तू लाल वाली मरसिडीज भिजवा नको रे बाबा, सफेद वाली बिजवा रे मेरे कु कामान (कामे) है, बहुत कामान है.
५. पच्चीस साल से चारमिनार पे बैठा हुआ हूं, अपनी भी इज़्ज़त है यारों लोगन सलाम ठोकके जाते, ये अंग्रेजान हाथ लगाते रे मेरे को.
कशी वाटली...?
Very nice. We were unaware about the Hyderabadi Hindi.
ReplyDelete1 Number Sirrrrr
ReplyDelete