Tuesday, June 29, 2010

आयटी कंपन्या व कॅम्पस प्लेसमेंट

गेल्या दोन-तीन वर्षांत कमी झालेली आयटी बूम यावर्षी पुन्हा बहरात येत असताना दिसत आहे. आयटीचे ग्लॅमर जरी कमी झाले असले तरी आयटी कंपन्या मागील वर्षी पुन्हा कॅम्पसमध्ये येताना दिसल्या. ’बिझनेस टूडे’ मॅगझीनने आपल्या मागच्या अंकात मागील वर्षी अर्थात २००९-२०१० या काळामध्ये भारतातील आयआयटी, एनआयटी व अन्य टॉप इंजिनियरिंग कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट साठी येऊन गेलेल्या काही मोठ्या आयटी कंपन्यांची यादी प्रसिद्ध केली होती. प्रत्येक आयटी इंजिनियरच्या ह्या ’ड्रीम कंपन्या’च म्हणता येतील. यावर्षीही आयटीची प्रगती वेगाने चालू राहणार असे ’बिझनेस टूडे’ ने म्हटले आहे.

1. मायक्रोसॉफ्ट

सॉफ्टवेयर क्षेत्रातील बादशहा मानली जाणारी ही कंपनी मागील वर्षी आयआयटी सह काही निवडक कॉलेजेस मध्ये आली होती. मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटर ने केवळ २५ इंजिनियरिंग कॉलेजेसला कॅम्पससाठी भेट दिली व त्यातून जवळपास ७५ जणांनी निवड केली होती. यावर्षी हा आकडा १०० वर जाण्याची अपेक्षा आहे.

2. विप्रो

भारतातील एक मोठी सॉफ्टवेयर कंपनी म्हणून अझीम प्रेमजींची विप्रो ओळखली जाते. मागील वर्षी या कंपनीने २,५०० जणांची निवड केली. व अन्य १३०० जणांची ’विप्रो ऍकॅडमी ऑफ सॉफ्टवेयर’ एक्सलेंस साठी निवड झाली होती. विप्रोने हे आकडे यावर्षी मोठ्या संख्येने वाढवायचे ठरविले आहे. विप्रोच्या अधिकृत माहितीनुसार यावर्षी कंपनी ११,००० ते १२,००० नवे कर्मचारी भरती करणार आहे. इंजिनियरिंग व्यतिरिक्त अन्य विज्ञान शाखेचे विद्यार्थीही विप्रोमध्ये निवडले जाण्याची शक्यताही कंपनीने व्यक्त केली आहे. त्यामुळे २००९ व २०१० च्या विज्ञान
पदवीधारकांनाही नवी संधी उपलब्ध होणार आहे.

3. कॉग्निझंट सोल्युशन्स

अत्यंत निवडक भरती करण्यावर भर देणारी कंपनी म्हणजे ’कॉग्निझंट सोल्युशन्स’ होय. मागील वर्षी त्यांच्या टेक्नॉलॉजी सोल्युशन्स बिझनेससाठी त्यांनी ७५ कॉलेजेसला भेट दिली होती. मागील वर्षीच्या कॅम्पस प्लेसमेंटचा निश्चित आकडा कंपनीने जरी अधिकृत जाहिर केला नसला तरी त्यांच्या एकुण २१,८०० कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्के कर्मचारी हे इंजिनियरिंग व विज्ञान शाखेचे फ्रेशर विद्यार्थी असल्याचे समजते. अमेरिकास्थित या कंपनीने यावर्षी आपल्या रेव्हेन्यु मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे ठरविले आहे.

4. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. मागील शैक्षणिक वर्षात त्यांनी भारतातील ३७१ इंजिनियरिंग कॉलेजेसेला भेट दिली व त्यातून जवळपास २०,०५० नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. या २०,०५० पैकी ७२ टक्के भरती ही जानेवारी ते मार्च या तीनच महिन्यात झाली आहे. मे २०१० पर्यंत कंपनीने भारतातल्या टॉप टेन इंजिनियरिंग कॉलेजेस मधून ४३८ विद्यार्थ्यांची निवड केली होती. आज कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या ही १ लाख ६०,४२९ झाली आहे. यावर्षी कंपनीने आपल्या ग्लोबल कॅम्पस प्लेसमेंट मधून ३०,००० नव्या कर्मचाऱ्यांची निवड करण्याचे ठरविले आहे. त्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक फ्रेशर व ३० टक्क्यांपेक्षा जास्त अनुभवी कर्मचारी असणार आहेत.

5. इन्फोसिस टेक्नॉलॉजिस

मागील वर्षी १९,००० नवे कर्मचारी इन्फोसिसमध्ये नव्याने रुजू झाले. नॅस्डॅकच्या आकडेवारीनुसार या कंपनीत काम करणाऱ्यांची संख्या ही १.१३ लाख झाली आहे. त्यात १.०६ लाख सॉफ्टवेयर प्रोफेशनल्स, ८,८८० ट्रेनी व ६,९३२ हा अन्य सपोर्ट स्टाफ आहे. मागील चार महिन्यांत इन्फोसिसमध्ये ९,३१३ नवे कर्मचारी भरती झाले. कंपनीचे मुख्य कार्यकरी अधिकारी क्रिस गोपालकृष्णन यांनी सांगितले की, आयटी पुन्हा भरात आल्याने यावर्षी इन्फोसिस ३०,००० कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करणार आहे.

6. ऍरिसेंट

टेलिकॉम सर्विसेस मध्ये काम करणाऱ्या ऍरिसेंटला ’बिझनेस टूडे’ने सहावे स्थान दिले आहे. मागील वषी त्यांनी १,००० नवे कर्मचारी भरती केले. एप्रिलमध्ये कंपनीने जाहिर केले होते की, यावर्षी कंपनीत नवे ३,००० कर्मचारी घेतले जाणार आहेत. व त्यातील १,००० जण हे भारतातून घेतले जातील. या कंपनीची भारतात चेन्नई, बेंगळूरू व गुरगाव अशी भारतात तीन विकसन केंद्रे आहेत. चेन्नईच्या केंद्रामध्ये लवकरच ३०० कर्मचारी नव्याने रुजू होतील, असे कंपनीने जाहिर केले आहे.

7. ओरॅकल

इंटरप्राईझ सॉफ्टवेयर्स बनविणारी सर्वात मोठी कंपनी म्हणजे ओरॅकल होय. सन २०१० च्या सुरूवातीपासून त्यांनी ७२ नवे कर्मचारी रुजू केले. सन मायक्रोसिस्टिम्सला ७.४ बिलियन डॉलर्सला विकत घेणारी ही कंपनी यावर्षी भारतात २,००० नवे सेल्स व इंजिनियरिंग ग्रॅज्यएट्स रिक्रुट करणार आहे.

8. आयगेट

आयटी सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या आयगेट कंपनीने यावर्षी ३५ फ्रेशर्सची टॉप इंजिनियरिंग कॉलेजेसमधून निवड केली. भारतामध्ये आपला आणखी विस्तार करण्यासाठी आयगेट यावर्षी ५०० नवे कर्मचारी निवड करणार आहे. भारताबरोबरच अमेरिका व मेक्सिकोमधून ही निवड होईल. जानेवारी ते मार्च मध्ये ४४७ नव्या कर्मचाऱ्यांनी आयगेटमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कंपनीची कर्मचारी संख्या ही ७,३५७ झाली आहे.

9. ह्युलेट पॅकार्ड (एचपी)

एचपी ही संगणक तयार करणारी कंपनी आहे. नुकतेच त्यांनी ३५ फ्रेशर्सची कॅम्पस मधून निवड केली होती. यावर्षीही कंपनीच्या सर्व्हिस बिझनेसमध्ये नव्याने भरती होणार आहे.

10. आयबीएम

अमेरिकस्थित आयबीएमने भारतातून यावर्षी १७९ नव्याने फ्रेशर्सला रिक्रुट केले. जानेवारी-मार्च या काळात कंपनीच्या रिव्हेन्युमध्ये १३ टक्क्यांनी वाढ दिसून आली. मार्च मध्ये कंपनीने अमेरिकेतून ५०० कर्मचाऱ्याची सुट्टी केली होती. आयबीएम च्या ३,९९,४०९ कर्मचाऱ्यापैकी हा आकडा म्हणजे अगदीच नगण्य मानला जातो.

2 comments:

to: tushar.kute@gmail.com