काही वर्षांपूर्वी मी एक कथा वाचली होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान सारख्या लहान देशाने रशियन सैन्याला पराभवाचे पाणी चाखवले होते. त्यामुळेच जपान अमेरिकेसारख्या देशावर आक्रमण करण्यास धजावला. जगाचा नकाशा जर पाहिला तर तुम्हाला ध्यानात येईल की, जपान व रशिया या दोन देशांमध्ये किती फरक आहे ते! या विजयामागचे कारण मी वाचले होते. ज्यावेळी जपानी सैन्य रशियनांच्या समोर युद्धासाठी उभे ठाकले होते तेव्हा रशियाशी युद्धाची कल्पनाच त्यांना करवत नव्हती. जवळपास सर्वच जण आता मरणालाच सामोरे जाणार, या स्थितीत युद्धाची तयारी करत होते. जपानी लष्करप्रमुखाला याची माहिती होतीच. तो अतिशय हुशार होता. त्याने सैन्यासमोर जपानी देवतेचा कौल आजमावयाचा ठरवला. छापा-काटा पद्धतीचा तो कौल होता. छापा पडला तर जपानी जिंकणार व काटा पडला तर ते हरणार असा कौल ठरला. लष्करप्रमुखाने जेव्हा कौल आजमावला तेव्हा तो जपानी सैन्याच्या बाजूने लागला. अर्थात, छापा पडून जपानी देवतेने त्यांचेच सैन्य जिंकणार अशी सूचना दिली होती. आपली देवताच आपल्या बरोबर आहे म्हटल्यावर जपानी सैन्याचे मनोधैर्य कमालीचे उंचावले वे विजिगिषु भावनेने लढल्याने त्यांनी रशियनांना पराभवाचे पाणी चाखविले. प्रत्यक्षात, ज्या नाण्याने कौल लावला होता त्याच्या दोन्ही बाजुंस छापाच होता, हे केवळ जपानी लष्करप्रमुखास ठावूक होते. परंतु, कौल आपल्या बाजुने लागल्याचे पाहून जपानी सैन्य लढले व ते विजयी ठरले. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव अशाच पराभूत मनोवृत्तीतून झाला होता.
किंबहुना अशाच प्रकारची परिस्थिती कालच्या सामन्यातून मला दिसून आली. दक्षिण आफ्रिकेत झालेला यंदाचा फिफा विश्वचषक स्पेनने पटकावला. नेदरलॅन्डस संघ अखेर केवळ अंतिम सामन्यात पराभूत झाला. यावेळेसच्या विश्वचषकात विविध संघांच्या स्टार खेळाडूंपेक्षा एका साधारण ’ऑक्टोपस’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अंतिम सामन्यात विजयाचा कौल त्याने स्पेनच्या बाजुने दिला व अखेर तसेच झाले. स्पेन विजयी ठरला. खरं तर स्पेनचा संघ पहिलाच सामना स्वित्झर्लंड विरूद्ध पराभूत झाला होता व दुसरीकडे नेदरलॅण्ड्सचा संघ अंतिम सामन्यापर्यंत अपराजित होता. त्यामुळे त्यांचेच मनोधैर्य स्पेनपेक्षा वाढलेले असायला हवे होते परंतु, एका ऑक्टोपसने त्यांचे मनोधर्य खच्ची करण्यास मदत केली. परंतु, याने स्पेनचे वर्चस्व निश्चित नाकारता येत नाही. त्यांचा खेळ हा अंतिम सामन्यापर्यंत अप्रतिम होता परंतु, त्यांच्या बाजुने मिळालेला कौल त्यांना विजयी करण्यास निश्चित मदतगार ठरला, यात वाद नाही.
बर्लिनमधल्या या ऑक्टोपसला ’फेमस’ करण्यात जर्मन संघाचा मोठा वाटा होता. कारण, अंतिम सामन्यापूर्वी केवळ त्यांच्याच संघाच्या सामन्यासाठी ऑक्टोपसकडे कौल मागला जायचा. उपांत्य सामन्यात त्याने जर्मनीच्या पराभवाचा कौल दिल्याने जर्मनवासिय चिडले व त्यातूनच त्याला प्रसिद्धी मिळाली. आज काहीजण म्हणतायेत की, यंदाचा वर्ल्डकप हा या ऑक्टोपसने हॅंण्डल केला होता!
मी ज्यावेळेस माझ्या ब्लॉगवर वर्ल्डकपसाठी ’पोल’ तयार केला होता. तेव्हा त्यात सर्व प्रमुख देशांसह स्पेनचे नाव समाविष्ट होते. परंतु, नेदरलॅण्ड्सचे नाव द्यायचे राहून गेले. या पोलवर दुसऱ्याच दिवशी स्पेनच्या नावाने एकच मत पडले. ते माझा मित्र अर्जुन साबळेने दिले होते. त्यानंतरच्या काही काळात केवळ ब्राझील व अर्जेंटिनाचीच मते वाढत गेली. स्पेनची मते तितक्याश्या वेगाने वाढली नाहित. परंतु, अंतिम सामन्यपूर्वी स्पेनची मते इतरांना मागे टाकून पुढे निघून गेली. कदाचित, ऑक्टोपसच्या भविष्यवाणीचा हा परिणाम असावा. अंतिम सामन्यापूर्वी या ’ऑक्टोपस’कडे केवळ दोनच संघांमधून एक विजयी संघ निवडायचा होता. परंतु, महिन्याभरापूर्वी आमच्या अर्जुनने ३२ संघांमधून स्पेनची विजेता म्हणून निवड केली होती. इतकी अचूक शक्यता ’नॉन-स्पॅनिश’ असणाऱ्या खूपच कमी व्यक्तींनी व्यक्त केली असावी. त्याबद्दल अर्जुनचे अभिनंदन व आभार. पुढच्या क्रिकेट विश्वचषकासाठी मला तुझ्या मताची प्रतिक्षा राहिल...!
यंदा स्पेनच्या रूपाने फुटबॉलला नवा विश्वविजेता मिळाला. आपल्या आशियायी देशांनी फारशी करामत दाखविली नाही. आशा करूया की, पुढच्या वर्षीच्या क्रिकेट विश्वचषकात आपला देश काहितरी चांगले करेल.
Always welcome Sir.. Nice blog as well as example of Japan & Russia...
ReplyDelete