Sunday, July 18, 2010

खेळांतील गुणवाटप

मागील काही वर्षांपासून दर वेळी नवी ’एज्युकेशन पॉलिसी’ घेऊन आपले राज्य सरकार वादग्रस्त ठरले आहे. शिक्षण म्हणजे आपल्या राज्यासाठी एक गौण दुय्यम बाब आहे, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. त्यामुळे चांगल्या ’एज्युकेशन पॉलिसी’ची अपेक्षा करणे, यापुढे चुकिचे ठरेल.

मागील वर्षी राज्यस्तरीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण विभागाने खेळासाठी २५ गुण विद्यार्थ्यांना ज्यादा देऊ केले होते. या कारणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांत भरघोस वाढ झाली. ती इतकी होती की, डझनभर मुलांना १०० पैकी १०० टक्के गुण प्राप्त झाले! भारताच्याच नव्हे तर पूर्ण जगाच्या इतिहासात एखाद्या मोठ्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी! या निकालाने एक मात्र सिद्ध झाले की, आपले ’स्टेट लेव्हल टॉपर’ विद्यार्थी हे खेळातही निपूण आहेत! ज्यांना १०० टक्के गुण आहेत, त्या सर्वांना खेळाचे पूर्ण गुण ’दान’ करण्यात आले आहेत. या मागचे गौडबंगाल आता हळूहळू काही शाळांनधून उघड होऊ लागल्याचे दिसून येते. अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी हे गुण मुलांना मुक्तहस्ते प्रदान केले होते, अशी माहिती समोर आली आहे. शाळेचा निकाल वाढावा यासाठी जसे शिक्षक २० पैकी २० गुण प्रदान करतात तसेच खेळाचेही २५ पैकी २५ गुण विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. शिवाय बहुतांश जणांनी याकरिता खोटी प्रमाणपत्रे सादर केली होती. ज्यांना हे गुण मिळाले नाहित, त्यांच्याकडूनच आता ही महिती उघड होत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दैनिक गांवकरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांनी पैसे घेऊन खेळाचे गुण प्रदान केले आहेत. एका पालकाच्या माहितीनुसार २५ गुणांसाठी हा दर ३००० रूपये होता! ’गांवकरी’ने ही एकंदरित उलाढाल कोटींच्या घरात गेल्याचे दर्शवून दिले आहे. यावरून एक सिद्ध होत आहे की, आता शिक्षकही ह्या भ्रष्टाचारी व्यवस्थेचे घटक बनू लागले आहेत. सुशिक्षित समाज तयार होण्यासाठी ही बाब पुढील काळात खूपच घातक ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टात ’बेस्ट ऑफ फाईव्ह’चा वाद गेल्याने अकरावीचे प्रवेश महाराष्ट्रात रखडले होते. अखेर त्यावर कोर्टाने तोडगा काढला. आता ’आयसीएसई’च्या विद्यार्थ्यांनाही खेळाचे गुण त्यांच्या शाळेकडून देण्यात येणार आहेत. ’नवेनवे उपक्रम’ कोणत्या नव्यानव्या वाटा तयार करतात, हे त्याचे एक उत्तम उदाहरण होय! दोन बोर्डांच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या खऱ्याखुऱ्या विकासाकडे ध्यान देण्याची सध्या तरी कुणालाच गरज वाटत नाही. वादात आपलीच बाजू भक्कम आहे, याची प्रत्येकाला खात्री वाटू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात माध्यमिक शिक्षणपद्धतीत आपल्याला आणखी काय काय पाहायला मिळणार आहे, कोण जाणे? सुजाणांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या पाल्याकडे व त्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे ध्यान द्यावे, यातच खरे शहाणपण असेल...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com