Sunday, July 25, 2010

मरिलियर शॉट

सन २००२ मध्ये भारतात झालेली ती तिरंगी एकदिवशीय क्रिकेट मालिका मला अजुनही आठवतेय. झिम्बाब्वेचा संघही या मालिकेत सहभागी झाला होता. खरं तर हाच काळ झिम्बाब्वे क्रिकेटचा सुवर्णकाळ मानायला हवा. याच काळात झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये नील जॉन्सन, मरे गुडविन, ऍण्डी फ्लॉवर, ग्रांट फ्लॉवर, हीथ स्ट्रीक, सारखे खेळाडू खेळत होते. तरीही हा संघ अन्य संघांच्या तुलनेत लिंबू टिंबूच मानला जायचा. २००२ च्या एका सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली होती. त्या मानाने झिम्बाब्वे संघाने धावांचा पाठलाग करताना फारशी चुणूक दाखविली नाही. त्यांचा डाव भारताच्या गोलंदाजीपुढे ढेपाळत गेला. संघाच्या नऊ विकेट पडल्या असताना त्यांना चार-पाच ओव्हर्स मध्ये पन्नासच्या वर धावा हव्या होत्या. एका बाजूने झिम्बाब्वेचा ऑफ स्पिनर फलंदाज डग्लस मरिलियर फलंदाजी करत होता. म्हणजे जवळपास भारताच्या विजयाची फक्त औपचारिकताच बाकी होती, असे म्हणायला हरकत नाही. भारतीय पाठिराखे विजयाचा आनंद व्यक्त करू लागले होते. शिवाय झिम्बाब्वेचे खेळाडूही विजयाची आशा संपवून पॅव्हेलियन सोडून गेलेले दिसले. भारत जिंकणार असे सर्वांनी गृहित धरले असताना डग्लस मरिलियरने आपले रंग दाखवायला सुरूवात केली. हा ऑफ स्पिनर गोलंदाज इतकी छान फलंदाजी करत असेल, याची मला कल्पना नव्हती.

त्या दिवशी तो काय खावून आला होता कोण जाणे. उरलेल्या प्रत्येक चेंडूगणिक त्याने सामना भारताच्या खिशातून काढायला सुरूवात केली. त्यात त्याने एक वेगळ्या प्रकारच्या फटक्याचा (शॉटचा) वापर केला. चेंडू गोलंदाजाने टाकल्यावर थोडं स्टंपच्या पुढे जावून तो चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून तडकविण्याच्या नव्या शॉटचा प्रयोग त्याने करून दाखविला. झहीर खानच्या दोन षटकात त्याने या शॉटवर तीन षटकार ठोकून सामना झिम्बाब्वेच्या बाजूने वळविला. सामना जिंकण्यासाठी त्याचा हाच फटका मदतीस पडला. अगदी नाट्यमयरित्या झिम्बाब्वेने हा सामना जिंकला होता. तोही एक गडी राखून! क्रिकेटच्या इतिहासात अगदी कमी सामने केवळ एक गडी राखून विजयी झाले आहेत. त्यात हा सामना म्हणजे मला अगदीच विशेष वाटला. डग्लस मरिलियरची खरी ओळख मला त्या दिवशी पटली.
खरं तर डग्लस मरिलियरने या नव्या फटक्याचा सर्वप्रथम वापर ऑस्ट्रेलियात झालेल्या एका तिरंगी स्पर्धेत केला होता. ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळताना झिम्बाब्वेला अंतिम षटकात १५ धावा विजयासाठी हव्या होत्या. ग्लेन मॅकग्राथ सारखा गोलंदाज गोलंदाजी करत होता. डग्लस मरिलियरने या अंतिम षटकात दोन वेळा त्याच्या नव्या शॉटचा वापर केला परंतू, त्याला केवळ १३ धावा बनवता आल्या. झिम्बाब्वेचा केवळ एका धावेने पराभव झाला! तेव्हापासून या शॉटलामरिलियर शॉटम्हणून संबोधले जाऊ लागले. क्रिकेटच्या कोणत्याही शब्दकोशात नसणारा हा एक आगळा-वेगळा फटका आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत न्युझीलंडच्या ब्रेंडन मॅकलम श्रीलंकेच्या दिल्शान तिलकरत्नेने या शॉटचा वापर केल्याचा दिसून आला. परंतू, डग्लस मरिलियरच या फटक्याचा खरा जन्मदाता म्हणून परिचित राहिल...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com