बारावीची परिक्षा मराठी माध्यमातून देण्याची सोय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. खरं तर ही सवलत यापूर्वीही करून देण्यात आली होती परंतू, त्याबाबत सध्या पुण्याची समर्थ मराठी संस्था व मराठी दैनिक लोकसत्ता अधिक माहिती उपलब्ध करून देत आहे. मराठी माध्यमातून बारावीची परिक्षा देण्यासाठी सध्या काही संस्थाही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहेत. या संस्थांचे कार्य निश्चितच चांगले आहे. परंतु, भाषाप्रेमापोटी आपण आपल्याच विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
मी स्वत: मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आहे व त्याचा मला पूर्ण अभिमान आहे. स्वभाषेतून शिक्षण घेताना माझ्यावर जे संस्कार झाले, त्याच अनुभवातून मी सांगतो की, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घ्यायला हवे. परंतु, या प्रकारच्या शिक्षणातही काही मर्यादा माझ्या ध्यानात आल्या. प्राथमिक शिक्षण अवघड वाटू नये याकरिता ते मातृभाषेतूनच असायला हवे, याविषयी मी पूर्ण सहमत आहे. पण, दहावीनंतरचे शिक्षण हे इंग्रजी भाषेतून व्हायला हवे, असे मला वाटते. जर पुढील शिक्षणही जर मातृभाषेतून करायचे असेल तर आपल्याला आपली शिक्षण पद्धतीच बदलावी लागेल, असे चित्र सध्या दिसते. बारावीनंतर वैद्यकिय व तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतूनच त्या परिक्षा द्याव्या लागतात. अशा वेळी जर विद्यार्थ्याने मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेतले असेल तर पुढील शिक्षण त्याला अतिशय कठीण जाते. केवळ माझाच नाही तर बहुतांश सर्वच जणांचा हा दृष्टीकोण असेल. आपला देश जगात सर्वात जास्त इंग्रजी जाणनारा देश आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेचे प्रस्थ इथे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. याच कारणामुळे इंग्रजीला भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात महत्व दिले जाते. तंत्रशिक्षण घेताना जर इंग्रजी समजण्यास व बोलण्यास अडचणी येत असतील तर आपल्याच विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. पुढे रोजगार मिळविण्यासही त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागेल. यावर प्रा. अनिल गोरे (अध्यक्ष, समर्थ मराठी संस्था) यांनीच एक उपाय सुचविल्याचे मी एका लेखात वाचले होते. तो म्हणजे तंत्रशिक्षणही मराठी भाषेत देण्याचा. परंतु, सद्य परिस्थितीत आपले सरकार मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देत असताना तंत्रशिक्षणाचे मराठीकरण करण्याचा विचार तरी करील का? हा महत्वाचा प्रश्न आहे. जरी तंत्रशिक्षणाचे मराठीकरण झाले तरी अशा संस्थांमधून पदवी घेवून बाहेर पडलेल्या पदवीधरांना कितपत नोकरीत प्राधान्य मिळेल, त्यातही शंकाच आहे. या सर्व बाबी अडचणी म्हणून पुढे येत असताना बारावीची परिक्षा मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांना द्यायला लावणे चुकिचे आहे, असे मला वाटते. असे करून आपण आपल्याच विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहोत.
महाराष्ट्र सरकार मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळाच बंद पाडायच्या मागे लागले आहे. शिवाय जनतेचाही त्याला मूक पाठिंबा आहे, यासंबंधी मराठीप्रेमी संस्थांनी विचारविनिमय करणे गरजेचे आहे. मराठी माध्यमाचा पायाच ढिसाळ होत असेल तर पुढे इमारती रचण्याचा प्रयत्न करणेही चुकीचे आहे.
प्रत्येक गोष्टीचे नुसतेच मराठीकरण करण्यापेक्षा मराठी विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कसा प्रगती करेल, याचा व्यवहारिक विचार आता करायला हवा.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com