Sunday, August 8, 2010

लंकाविजय आणि लक्ष्मण

परवाच्या सामन्यात व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने भारताच्या विजयाची नौका तीरावर पोहोचवून ठेवली लंकादहन साकार करून दाखविले. कसोटीमध्ये कशा प्रकारची खेळी करायची असते, हे लक्ष्मणसोबतच राहुल द्रविडनेही अनेकदा दाखवून दिले आहे. आजही या दोन महान खेळाडूंना युवा पर्याय सापडत नाहियेत.
अझरूद्दीन कर्णधार असताना हैद्राबादच्या लक्ष्मणचे भारतीय संघात प्रदार्पण झाले. दोघेही हैद्राबादी असल्याचा फायदा लक्ष्मणला झाला असावा. पण, संघात प्रवेश झाल्यानंतर त्याने आपल्या खेळीने संघातील स्थान पक्के केले होते. आपल्या नजाकदार खेळीने टिपिकल हैद्राबादी फलंदाजी त्याच्यात दिसून यायची. सुरूवातीच्या काळात तर त्याच्या फलंदाजीवर अझरूद्दीनच्या फलंदाजीची छाप दिसून येत होती. त्यावेळी त्याच्या फलंदाजीत दिसलेले अफलातून टायमिंग मला आजही दिसून येते. कसोटी संघातील स्थान पक्के होत असताना मात्र त्याला एकदिवशीय संघात स्थान टिकवता आले नाही. राहुल द्रविडही खऱ्या कसोटी टाईप खेळाडू असला तरी त्याने एकदिवशीय संघात स्थान पक्के केले होते परंतु, लक्ष्मणला मात्र तसे जमले नाही. सन २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या दौऱ्यावर असताना कोलकत्याला झालेली ती ऐतिहासिक कसोटी मला अजुनही आठवते आहे. लक्ष्मणने राहुल द्रविडच्या सोबतीने फॉलोऑनवरून भारताचा ऐतिहासिक विजय साकारला होता. त्या कसोटीनंतर खऱ्या अर्थाने लक्ष्मणचा कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा तयार झाला. नंतरच्या काळात राहुल द्रविडसोबतच्या त्याच्या भागीदाऱ्यांनी भारताला विजय प्राप्त करून दिले होते. द्रविड-लक्ष्मण खेळले भारत हरला, असे कधीच झाले नाही.
लक्ष्मणने आजवर १६ शतके केली आहेत. त्यांपैकी केवळ दोन सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. हे दोन्ही सामने भारताने सिडनी क्रिकेट स्टेडियमवर गमावले आहेत. गेली अनेक वर्षे लक्ष्मण हा राहुल द्रविडच्या सोबतीने मि. डिपेंडेबल बनून राहिला आहे. सचिन-राहुलच्या जमान्यातही त्याने स्वत:च्या फलंदाजीचे वेगळेपण जपले आहे. या दोघांपेक्षाही लक्ष्मण हा टायमिंगच्या बाबतीत उजवाच आहे, हे आवर्जुन नमूद करावेसे वाटते. परवा कसोटीच्या शेवटच्या दिवशी सचिन बाद झाल्यावरही अगदी थंड डोक्याने फलंदाजी करून त्याने भारताचा विजय साकारला. कसोटी क्रिकेटला असणारे वलय आता कमी झाल्याने तो आजच्या तरूणांचा आयकॉन बनू शकत नाही, यामुळे त्याचे महत्व कमी होत नाही. टी-२० च्या जमान्यातील युवकांना कसोटी क्रिकेट खेळताना किती संयम एकाग्रता लागते, हे काय कळणार? त्यामुळे त्यांना द्रविड लक्ष्मण सारखे खेळाडू हे संघावर बोझच वाटत राहणार आहेत. ऑनलाईन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कमेंट्समुळे ही बाब मला प्रकर्षाने समजून आली.
सध्या तरी युवा खेळाडूंमध्ये राहुल द्रविड व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला पर्याय ठरणारे खेळाडू दिसून येत नाहीत. कसोटी क्रिकेट लयाला जाणार असे गृहित धरूनच सध्याच्या क्रिकेटचीप्रगतीचालू आहे. भारताला क्रमवारीत आपले स्थान अग्र ठेवायचे असेल तर लक्ष्मणसारख्या खेळाडूंची खऱ्या अर्थाने गरज आहे...

2 comments:

  1. बरोबर बोलताय तुम्ही...खेळाडूंचा फोकस बदलल्याने असे होण्याची शक्यता निर्माण झाले आहे.

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com