Tuesday, March 8, 2011

संगणक क्षेत्रातील महिला संशोधक

अभियांत्रिकीच्या संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांपासून महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. करियरसाठी या क्षेत्रांना महिला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देताना दिसत आहेत. संगणक इतिहासात डोकावले तर संगणक शास्त्र विषयांत संशोधन करताना अत्यल्प महिलांचे योगदान दिसून येते. असे असले तरी ज्या महिलांनी संगणकशास्त्रात योगदान दिले आहे, ते अत्यंत महत्वाचे ठरते. संगणक हार्डवेयर मध्ये तर महिलांचे योगदान शून्य टक्क्यांच्या जवळपास असले तरी सॉफ्टवेयर क्षेत्रामध्ये दोन महत्वाच्या संकल्पनांची मुहूर्तमेढ ही महिला संशोधकांनी रोवल्याचे दिसून येते...

या दोघी आहेत, ऑगस्टा अडा व ग्रेस हॉपर. जगातील पहिला कॉम्प्युटर प्रोग्राम हा ’ऑगस्टा अडा लेडी लव्हलेस’ यांनी लिहिला होता! संगणकाचे जनक म्हणून चार्लस बाबेज यांना ओळखले जाते. त्यांनी बनविलेला संगणक या यांत्रिकी संगणक या प्रकारातला होता. असे असले तरी हा संगणक चालविण्याकरिता कॉम्प्युटर प्रोग्रामची गरज पडली. त्यांनी बनविलेल्या ’ऍनालिटिकल इंजिन’ या संगणकासाठी प्रोग्राम लिहिण्याचे कार्य ऑगस्टा अडा यांनी पार पाडले. ’स्टोअर्ड प्रोग्राम’ प्रकारतला हा संगणक गणला जातो. त्यात सूचना आधीपासूनच लिहिल्या जात असत. त्यानुसारच संगणक कार्य करे. याच सूचनांचा संच संगणकीय भाषेत अडा यांनी लिहिला. ऑगस्टा अडा यांच्याबद्दल अधिक सांगायचे तर त्या प्रसिद्ध इंग्लिश कवि लॉर्ड बायरॉन यांच्या कन्या होत. १८१५ मध्ये जन्मलेल्या अडा यांना केवळ ३६ वर्षांचे आयुष्य लाभले. खरं तर लॉर्ड बायरॉनला मुलगा हवा होता, परंतु त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने बायरॉनने तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. अर्थात अडाचे पालनपोषण हे त्यांच्या आईनेच केले. लहानपणापासूनच विविध आजारांनी ग्रासल्याने अडा आपल्य शालेय अभ्यासात फारश्या चमक दाखवू शकल्या नाहीत. १८२५ मध्ये त्यांचा विवाह विल्यम किंग यांच्यासोबत झाला. अभ्यासात गति प्राप्त करण्यासाठी ऑगस्टा अडा यांना आईची मात्र मोठी मदत झाली. आईमुळेच त्या विविध व्याधींवर मात करू शकल्या. वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांनी गणितात विशेष रूची वाटू लागली. त्यानंतर पूर्ण वेळ त्या गणितातच रमल्या. चार्लस बाबेज यांच्याशी त्यांची ओळख झाल्यावर अडाच्या गणिती कौशल्यावर तो भलताच खूष झाला होता. त्यांच्या या कौशल्याचा वापर बाबेज यांनी प्रभावेपणे करून घेतला. ’ऍनालिटिकल इंजिन’ या संगणकासाठी प्रोग्राम लिहिण्याचे काम अडा यांनी नंतर पार पाडले. पण, त्याचे श्रेय त्यांना मिळण्याकरिता १९५३ हे वर्ष उजाडावे लागले! अमेरिकेच्या संरक्षण विभागाने तयार केलेल्या एका संगणकीय भाषेला ऑगस्टा अडा यांच्या सन्मानार्थ ’अडा’ असे नाव दिले गेले होते.

संगणकाला समजत असलेली बायनरी भाषा ही सर्वसाधारण मनुष्यास समजणे फारच अवघड आहे. अर्थात संगणकाला बायनरी भाषेत सूचना देणे, हे अत्यंत अवघड काम असते. यावर उपाय म्हणून ’हाय लेव्हल प्रोग्रामिंग लॅंग्वेजची निर्मिती करण्यात आली. त्यात संगणकीय सूचना या मनुष्यास समजतील अशा भाषेत लिहिल्या जात. मग या सूचनांचा समूह अर्थात ’हाय लेव्हल प्रोग्रामिंग लॅंग्वेजचा प्रोग्राम’ संगणकला समजण्यासाठी तो बायनरी मध्ये रूपांतरीत केला जातो. व त्याकरीता लागणाऱ्या संगणकीय सॉफ्टवेयरला ’कम्पायलर’ असे म्हणतात. आज सर्वच संगणकीय भाषांचा स्वतंत्र कम्पायलर आहे. अशा प्रकारचा कम्पायलर बनविण्याचे काम सर्वप्रथम ग्रेस हॉपर या महिलेने केले होते. डॉ. श्रीमती ग्रेस हॉपर यांनी १९५२ मध्ये ’युनिव्हॅक’ संगणकासाठी, ’ए झिरो’ या संगणकीय भाषेकरिता हा कम्पायलर तयार केला. हा आजच्यासारखा परिपूर्ण कम्पायलर नसला तरी संगणकाचा पहिला कम्पायलर म्हणून त्याला मान्यता मिळाली. ’हॉर्वर्ड मार्क – १’ या संगणकावर पहिला कॉम्प्युटर प्रोग्राम त्यांनीच लिहिला होता. अमेरिकन नौदलात श्रीमती ग्रेस हॉपर काम करत होत्या. १९४९ मध्ये ’एकर्ट मॉकली कॉम्प्युटर कॉर्पोरेशन’मध्ये त्या कार्यरत झाल्या. ’ए झिरो’ या संगणकीय भाषेचे पुढच्या काळात अरिथमॅटिक, फ्लोमॅटिक व मॅथमेटिक अशा विविध सुधारित आवृत्या निघाल्या. नंतरच्या काळात प्रसिद्ध झालेली ’कोबोल’ ही संगणकीय भाषा हॉपर यांच्या फ्लोमॅटिकपासूनच तयार करण्यात आलेली आहे. १९७१ पासून ग्रेस हॉपर यांच्या नावाने दरवर्षी युवा संगणक अभियंत्याला पुरस्कार दिला जातो.

संगणक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांसाठी ऑगस्टा अडा व ग्रेस हॉपर ’माईलस्टोन’ बनून राहिलेल्या आहेत. त्यांचे कार्य महिला संगणक अभियंत्यांना प्रेरणादायी असेच आहे. आजच्या महिलादिनी त्यांना विनम्र अभिवादन...!!!

6 comments:

  1. ह्या उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद...

    ReplyDelete
  2. आज संगणक क्षेत्रातील स्त्रिया फक्त पैसा कमविण्यासाठी काम करतात. त्यांनी संशोधक म्हणूनही हातभार लावावा हीच अपेक्षा.

    ReplyDelete
  3. I have come across such information about women in Computer science for first time. Thanks for it. Keep posting such nice blogs.

    ReplyDelete
  4. चांगले काम करून पैसे मिळवण्यात वाईट काय आहे? संशोधन हे येरागबाळ्याचे काम कधीच नव्हते व नसणार आहे. या क्षेत्रातील पुरुषांमध्येहि मूलभूत संशोधन करणारे फार थोडेच असतात.

    ReplyDelete
  5. HATS OFF TO THE WORLDS FIRST FEMALE PROGRAMMER
    LADY ADA

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com