पहिल्या राऊंड रॉबिन फेरीचा आढावा घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की, कोणत्याही संघाने यंदा निर्भेळ यश मिळविले नाही. १९९२ च्या विश्वचषकात अंतिम विजेत्या पाकिस्तानने बरेच सामने गमावूनही विजेतेपद मिळवले होते. त्यानंतरच्या प्रत्येक विश्वचषकात विजेता हा त्या विश्वचषकातला प्रत्येक सामना जिंकत आला आहे. यंदा मात्र तसे झाले नाही. प्रत्येक सहभागी संघाला एकदा तरी पराभवास सामोरे जावे लागले आहे. १९९९ पासून अपराजित असलेल्या कांगारूंना पाकने पराभवाचे पाणी चाखवले. त्यांच्याशीच भारताचा उप उपांत्यफेरीतील सामना होत आहे. भारतालाही पहिल्या फेरीत १०० टक्के यश मिळेल अशी भारतीय क्रिकेटरसिकांची अपेक्षा होती, परंतु तिही पूर्ण झाली नाही. या फेरीत आफ्रिकेने भारतास पराभूत केले. भारतीय संघ अजुनही आपल्या पूर्ण ताकदीनीशी खेळत आहे, असे दिसून आलेले नाही. पहिल्या फेरीतील सामन्यांची संख्या जास्त होती, अन्यथा २००७ च्या विश्वचषकासारखे चित्र भारतास पाहायला मिळाले असते. अजुनही भारतीय गोलंदाजी ही कमकुवत आहे. उप उपांत्यपूर्व फेरीत आलेल्या संघांपैकी इंग्लंडची गोलंदाजी ही सर्वात कमकुवत मानता येईल. व त्यानंतर बहुधा आपलाच क्रमांक लागावा, अशीच परिस्थिती सध्या दिसते. पुढची भारताची गाठ गतविजेत्या कांगारूंशी पडणार आहे. व त्यांना भारताच्या कमजोर गोलंदाजीचा ’जोर’ नक्कीच माहित असणार, यात शंका नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसात भारताला आपल्या गोलंदाजीवर अधिक मेहनत, घ्यावी लागणार आहे.
क्वार्टर फायनल्समध्ये सर्वात जास्त मेहनत करून दाखल झालेला संघ म्हणजे इंग्लंड होय. एकाही सामन्यात त्यांना सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सामना जिंकण्याची खात्री नव्हती. आयर्लंड व बांग्लादेशसारख्या संघांकडून त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला असला तरी अ गटातील सर्वोत्तम संघाविरुद्ध अर्थात आफ्रिकेविरुद्ध इंग्लिश संघाने विजय मिळवला होता, हे विसरता येणार नाही. सध्या तरी उप उपांत्यापूर्व फेरीतील सर्वात कमकुवत संघ म्हणून इंग्लिश संघाकडे पाहता येईल. पण, त्यांनी आजवर अनुभवलेली लढाऊ वृत्ती पाहता. शनिवारी कोलंबोमध्ये त्यांच्यादिरुद्ध खेळताना लंकेला अवघड जाणार असेच दिसते.
पहिल्या चार सामन्यांमध्ये जवळपास एकतर्फी विजय मिळविलेले कांगारू यावर्षी नेहमीच्या फॉर्ममध्ये खेळताना दिसले नाहीत. तरीही त्यांची कामगिरी दुर्लक्षून चालणार नाही. न्युझीलंडविरुद्ध त्यांनी अगदी सहजच विजय मिळवला होता. कॅनडा त्यांना थोडेसे जड गेले. त्यांच्या खेळाची ऑसीजने प्रशंसा केली, हेच खूप झाले. आता त्यांचा सामना यजमान भारताविरूद्ध गुरूवारी होत आहे. हा सामना भारतात होत असल्याने त्यांच्यावर दडपण असणार, हे निश्चित. पण, भारतापेक्षा कांगारूंनी दडपणाचा अधिक यशस्वीरित्या सामना केला आहे, हेही तितकेच सत्य आहे. म्हणजे भारताचीच खरी कसोटी लागणार असे दिसते. शिवाय सहजासहजी हार न मानणारा हा संघ पाककडून पराभूत होऊन येत आहे. त्यामुळे, विजयश्री प्राप्त करण्यासाठी ते निकराचे प्रयत्न करणार, हे निश्चित.
पाकिस्तानी संघाचे मात्र कौतुक करावे लागेल. विश्वचषकापूर्वी विविध समस्यांनी घेरलेल्या या संघाने चांगलीच मजल मारली. पाकिस्तानचे सहयजमानपद अतिरेकी कारवायांमुळे काढून घेण्यात आले व त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत हलविण्यात आले, स्पर्धेपूर्वी त्यांचे अनेक खेळाडू सामना निकालनिश्चितीमध्ये गुंतल्याचे आढळून आले होते. तसेच त्यांच्या कप्तानाची घोषणाही उशिरा करण्यात आली. असे असूनही या संघाने विश्वचषकात चांगली कामगिरी करून ’अ’ गटात अव्वल स्थान पटकाविले. कर्णधार आफ्रिदी बॅटपेक्षा बॉलनेच चांगली कामगिरी करतोय. ह्याचा संघाला फायदा होईलच पण त्याने फलंदाजीही जबाबदारीने करावी, अशी पाक क्रिकेटरसिकांची अपेक्षा असणार. भारत व पाक पूर्ण स्पर्धेत केवळ अंतिम सामन्यात आमने-सामने येऊ शकतात, अशीच सध्याची स्थिती आहे. तसे झाल्यास यंदाचा विश्वचषक सोहळा अवघ्या क्रिकेटरसिकांच्या चिरस्मरणात राहिल.
यंदाचा सहयजमान श्रीलंकाही भारताप्रमाणे अपेक्षित कामगिरी करताना दिसत नाही. मायदेशात खेळत असल्याने ते ’अ’ गटात अव्वल राहतील ,अशी अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. पाककडून पराभव झाल्याने व कांगारूंविरुद्धची लढत अनिर्णित राहिल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांची गोलंदाजी व फलंदाजीही बऱ्यापैकीच झाली आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी लंकेला आणखी सुधारणेला वाव आहे. गत-उपविजेत्याला साजेशी कामगिरी त्यांच्याकडून झाली नाही, हे मान्य करावेच लागेल.
दक्षिण आफ्रिका यंदाच्या विश्वचषकासाठी हॉट-फेवरिट आहे. तसा तो नेहमीच असतो. पण, इतकी पसंती लाभूनही त्यांच्या गळ्यात विजयश्री पडलेली नाही. याची खंत बहुधा त्यांना असावी. युरोपप्रमाणे आफ्रिका खंडाचेही तीन संघ यंदाच्या विश्वचषकात सहभागी झाले होते. त्यांपैकी एकच संघ उप-उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. मागच्या विश्वचषकांत प्रत्येक वेळी छोट्याछोट्या कारणांमुळे आफ्रिका संघ अंतिम फेरीतही पोहोचला नाही. यंदाही त्यांचा संघ त्याच जोमाने खेळत आहे. तरीही त्यांनी आपली ’चोकर्स’ ही उपाधी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सार्थ ठरवली व पुढे भारताविरूद्ध ती खोटीही ठरविली. पण, पुढील फेरींत ऐनवेळी चुका केल्या नाहीत तरच आफ्रिका संघाला विजयाची यावेळी संधी आहे. अन्यथा ’ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे त्यांची वाटचाल चालूच राहिल.
एकेकाळी बलाढ्य मानला जाणारा वेस्ट इंडिजचा संघ यंदाही हॉटफेवरिट नाही. फार-फार तर ते उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोतील, एवढीच त्यांची क्षमता दिसून येते. इंग्लंडच्या संघाप्रमाणेच हा संघ आहे. तो दडपणाखाली खेळू शकत नाही. त्यातल्या त्यात उप-उपांत्य फेरीतील पहिलाच सामना त्यांना मीरपूरला पाकिस्तान विरूद्ध खेळायचा आहे. बांग्लादेशचा दणदणीत पराभव ही या संघाची पहिल्या फेरीतील चांगली कामगिरी होती. त्यानंतर ते आता पुन्हा बांग्लादेशात खेळायला जातायेत. बघू त्यांना किती फायदा होतोय ते...!
दक्षिण आफ्रिका व इंग्लंडप्रमाणेच क्षमता असूनही एकही विश्वचषक न जिंकलेला न्युझीलंड हा आणखी संघ होय. त्यांची कामगिरीही सर्वसाधारण दिसून आली. ’ब’ गटात अव्वल ठरलेल्या आफ्रिकेविरूद्ध त्यांना आता खेळायचे आहे. कांगारूंविरूद्ध सहज पराभव पत्करलेल्या न्युझीलंडने नंतर आपला खेळ बराच अंशी उंचावला. पाकविरूद्ध अंतिम पाच षटकांत केलेली फटकेबाजी विक्रम करून गेली. ’अ’ गटातील अव्वल ठरलेल्या पाकिस्तानला त्यांनी पराभूत केले, ही एकमेव त्यांची जमेच्या बाजू होय. फलंदाजीवर हाही संघ अवलंबून आहे. खेळ उत्तम केला तर यंदा प्रथमच विजयश्री त्यांच्या गळ्यात पडू शकते.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com