गूगल म्हणजे इंटरनेट विश्वाचा बादशहाच मानला जातो. इंटरनेटवरील विविध प्रकारची अप्लिकेशन्स ही गूगलच्या नाविन्यपूर्ण संशोधनाचा उत्तम नमूनाच आहे. संगणक क्षेत्राला नवनव्या तंत्रज्ञानाशी ओळख करुन देण्यात गूगलचा हात कोणीच धरू शकत नाही. संगणक तंत्रज्ञानाला गूगलचा परिशस्पर्श झाल्यावर त्याचे सोने नक्कीच होते, हे त्यांनी आजवर सिद्ध करून दाखविले आहे.
येत्या १५ जूनला गूगल कंपनी संगणक विश्वातील नवा आविष्कार अर्थात ’क्रोमबुक’ घेऊन येत आहे. काही वर्षांपूर्वी गूगलने स्वत:चा "गूगल क्रोम" नावाचा इंटरनेट ब्राऊजर बाजारात आणला होता. त्याची लोकप्रियता वाढीस लागल्यावर त्यांनी ’क्रोम’ नावाच्या नव्या संगणक प्रणालीची अर्थात ऑपरेटिंग सिस्टीमची घोषणा केली होती. तीच घोषणा आज सत्यात उतरत आहे. दोन वर्षांपूर्वी संगणकाला आणखी दर्जेदार करण्यासाठी गूगलने पाऊल उचलले होते. त्याची फलनिष्पत्ती क्रोमबुकच्या रूपाने होत आहे.
सॅमसंग व एसर ह्या कंपन्यांच्या सहयोगाने गूगलने स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम बनविली व नवा नोटबुक लॅपटॉप संगणक तयार केला आहे. संगणक क्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या ’क्लाऊड कॉम्युटिंग’ तंत्राद्वारे तयार केलेला हा पहिलाच संगणक होय. संगणकातील इंटरनेट तंत्रज्ञानाला पूर्णपणे गृहित धरूनच बनविलेला हा संगणक आहे. गूगलने त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर नमूद केल्याप्रमाणे ह्या नव्या संगणकाला बूट होण्यासाठी अर्थात चालू होण्यासाठी केवळ आठ सेकंदांचा कालावधी पुरेशा ठरणार आहे. इतक्या अल्प वेळात बूट होणारी ही पहिलीच ऑपरेटिंग सिस्टीम होय. शिवाय केवळ काही सेकंदांच्या कालावधीत आपले ई-मेल वाचणे ग्राहकाला शक्य होईल. संगणकावरील सर्व सॉफ्टवेयर्स ही ओपन सोर्स व फ्रीवेयर असून ती आपोआप अपडेट केली जातील. त्याकरिता दररोज ती तपासत बसण्याची गरज नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे या संगणकात केला गेलेला ’क्लाऊड कॉम्युटिंग’ तंत्रज्ञानाचा वापर होय. ह्यात संगणकामधील सर्व माहिती गूगल आपल्या एका सेंट्रल सर्वरवर साठवून ठेवेल, जेणेकरून याकरिता संगणकाला वेगळ्या हार्ड डिस्कची गरजच भासणार नाही. म्हणजेच ’क्रोमबुकच्या’ मालकाला आपल्या माहितीसाठ्याविषयी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. ती काळजी आता गूगलने घ्यायचे ठरविले आहे. याद्वारे संगणक वापरकर्ता आपली माहिती कोणत्याही क्रोमबुकवरून वापरू शकतो. त्याकरिता पोर्टेबल हार्ड डिस्क वा पेन ड्राईव्हची गरज नाही. हेच तंत्रज्ञान क्रोमबुकला लोकप्रिय करण्यासाठी पुरेशे ठरेल.
आज वापरात असलेल्या सर्व लॅपटॉपची बॅटरी साधारण तीन-चार तास पुरते व त्यानंतर ते पुन्हा चार्ज करावे लागतात. परंतु, क्रोमबुकला पूर्ण दिवसाचा विद्युत पुरवठा त्याच्या डीसी बॅटरीद्वारे आता मिळणार आहे. म्हणजेच एकदा बॅटरी चार्ज केली की ती दिवसातून पुन्हा चार्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही, इतकी काळजी क्रोमबुकच्या बॅटरीने केलेली आहे. थ्रीजी व वाय-फाय सारख्या इंटरनेटसाठी लागणाऱ्या सुविधा क्रोमबुकमध्ये ’इन-बिल्ट’ अर्थात आधीपासूनच असणार आहेत. या तंत्राने संगणकावरून फोन लावण्याची सुविधा आता ग्राहकाला मिळेल. आपल्या माहितीच्या सुरक्षेसाठी गूगलने विशिष्ट ’मेनी लेयर सेक्युरेटी’चा योग्य वापर क्रोमबुकमध्ये केलेला आहे.
अनेक प्रकारच्या ओपन स्टॅण्डर्डसचा वापर केल्याने क्रोम या गूगलच्या मुख्य वेब ब्राऊजरला सर्व सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. गूगलची सर्व ऍप्लिकेशन्स क्रोमद्वारे सहजच वापरता येऊ शकतील. जून १५, २०११ पासून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलॅण्ड्स, ईटली या देशांत क्रोमबुक उपलब्ध केले जाणार आहे. शिवाय आगामी काळात इतर देशांतही ते लवकरच उपलब्ध होईल. बिज़नेस (व्यापार) व शिक्षण क्षेत्रात वेगळे तंत्रज्ञान वापरलेले क्रोमबुक गूगलद्वारे लवकरच उपलब्ध होतील. आज गूगल क्रोम ब्राऊजरचे १६ कोटी वापरकर्ते आहेत. त्या सर्वांना एकाच छत्राखाली जोडण्याचे गूगलचे उद्दीष्टही क्रोमबुकद्वारे साध्य केले जाईल.
आपल्या लॅपटॉपला ’रीप्लेसमेंट’ म्हणून गूगलच्या क्रोमबुककडे आज पाहिले जात आहे...