अमेरिकेमध्ये व्योमिंग प्रांतात क्रूक कंट्री येथे ’डेव्हिल्स टॉवर’ नावाची निसर्गनिर्मित वास्तू उभी आहे. दरवर्षी लाखो पर्यटक व गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेणारी ही वास्तू होय. शेजारच्या छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे एका विशिष्ट प्रकारची रचना असणारा हा एक प्रकारचा डोंगरच आहे. परंतू, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्याला मनोरा अर्थात टॉवर म्हटले जाते. जमिनीपासून डेव्हिल्स टॉवर हा ३८६ मीटर्स उंच आहे तर समुद्रसपाटीपासून त्याची उंची तब्बल १५५८ मीटर्स इतकी आहे. २४ सप्टेंबर १९०६ मध्ये राष्ट्रपति रूझवेल्ट यांनी ही वास्तू राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केली होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे चार लाख पर्यटक व गिर्यारोहक डेव्हिल्स टॉवरला भेट देतात व त्यातील जवळपास एक टक्का अर्थात चार हजार गिर्यारोहक हा मनोरा पारंपारिक पद्धतीने चढून पारही करित असतात.
व्योमिंग प्रांतात राहत असलेल्या अदिवासी जमातींना या पहाडाची सर्वप्रथम माहिती होती. युरोपियन अमेरिकेत येण्यापूर्वी अरापाहो, क्रो, चेचेन, कियोवा, लाकोटा, व शोशोन या जमाती या डेव्हिल्स टॉवरशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेल्या होत्या. या जमातीतील लोकांनी या मनोऱ्याला आपाआपली वेगवेगळी नावे ठेवलेली होती. त्यात प्रामुख्याने चेचेन जमातीचे ’बियर्स लॉज’ हे नाव प्रसिद्ध आहे. सन १८७५ मध्ये या मनोऱ्याचे डेव्हिल्स टॉवर असे नामांतरण झाले. कर्नल रिचर्ड आयर्विंग डॉज यांनी ’बियर्स लॉज’ टॉवरला ’बॅड गॉड्स टॉवर’ असे ऐकले व बाह्य जगताला ह्या पर्वताच्या याच नावाची माहिती झाली. परंतू, कालांतराने हे नाव डेव्हिल्स टॉवर म्हणून ओळखले जाऊ लागले. सन २००५ मध्ये डेव्हिल्स टॉवरचे पुन्हा पूर्वीचे नाव नामकरण करण्यासाठी हालचाली झाल्या होत्या परंतू, अनेक वर्षे वापरले जाणारे नावच कायम ठेवण्यात आले.
हा मनोरा म्हणजे सर्वसाधारण डोंगरासारखा दिसत नाही. सरळ उभा असणाऱ्या मानवनिर्मित मनोऱ्याप्रमाणे याची रचना असल्या कारणाने आजही त्याच्या निसर्गनिर्मित उत्पत्तीबाबत एकमत झालेले नाही. आजुबाजुच्या खडकांवरून तरी तो ट्रायॅसिक काळातीलच आहे, हे अनुमान वैज्ञानिकांनी लावलेले आहे. बहुतांश सहमती हा मनोरा ज्वालामुखीतून तयार झाला आहे, यावरच आहे. परंतु, या अनुमानासही पुरेशे पुरावे मिळालेले नाहीत. अतिशय प्राचीन काळातील असल्याने त्याच्या निर्मीतीचा पेच अजुनही शास्त्रज्ञांना सोडवता आलेला नाही. शिवाय इथे राहत असलेल्या जमातींमध्ये अनेक समजुती व आख्यायिका डेव्हिल्स टॉवर बद्दल ऐकायला मिळतात.
कियोवा व लाकोटा जमातींच्या समजुतीनुसार एक वेगळी आख्यायिका सांगण्यात येते. सात मुली जंगलात खेळत असताना अचानक एका रानटी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्याच्यापासून वाचण्यासाठी ह्या मुली एका उंच पर्वतावर चढल्या. तरिही अस्वलाने त्यांना पाठलाग सोडला नाही. मुलींनी आपल्याला वाचवण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली तेव्हा देवाने ही पर्वत आणखी उंच केला तेव्हा अस्वलाने त्यांना पकडण्यासाठी पर्वतावर थेट चढाई सुरू केली. त्याच्याच पाऊलखुणांमुळे पर्वताचे आत्ताचे रूप पाहायला मिळते. अशी कियोटांची समजुत आहे.
अशाच एका आख्यायिकेत दोन मुले आपल्या गावापासून भरकटतात. तेव्हा जंगलात त्यांच्यावर माटो नावाच्या अवाढव्य अस्वलाची नजर पडते. मुले पळू लागतात व देवाचा धावा करतात. मग, त्यांचा देव ’वाकन टंका’ प्रसन्न होऊन मुलांच्या जमिनीचा पर्वत तयार करतो व त्यांना खूप उंचीवर नेतो. माटो मात्र त्यांना पर्वताच्या सर्व बाजुंनी चढून पकडायचा प्रयत्न करतो पण त्याला यश मिळत नाही. त्याच्या पाऊल खुणांनी मात्र पर्वतावर मोठेमोठे पट्टे तयार होतात.
याच आख्यायिकेवर आधारित एक पेंटिग सुद्धा तयार झालेली आहे.
amezing mahiti
ReplyDelete