हा ब्लॉग लिहिण्याचं निमित्त आहे, २१/१२/२०१२
चं. याच दिवशी जगबुडी होणार, असं माया संस्कृतीतल्या कॅलेंडरने दर्शविलं होतं. प्रत्यक्षात
जगबुडी मात्र झाली नाही. पण, चॅनेल्सला टीआरपी मिळाली, अनेकांचं मनोरंजन झालं व
२०१२ नावाचा हॉलिवूडपट चालून गेला. आता नवं जगबुडीचं भाकित केव्हा होतंय, याची मी
वाट पाहतोय! २१/१२/२०१२ च्या भाकितामुळे अनेकांनी नासातील अधिकाऱ्यांना खूप परेशान
केलं होतं व नासाच्या नावाखाली अफवा पसरविणंही चालू केलं होतं. त्यामुळे नासाला
याची दखल घेऊन त्यांच्या वेबसाईटवर याचा सविस्तर खुलासा करावा लागला होता. शिवाय
त्यांनी यावर एक चित्रफितही बनवली होती! आता लोकं असं म्हणतील मेक्सिकोमधल्या
चिंचेन इट्झा समोर प्रार्थना केल्यामुळॆ जगबुडी टळली! अर्थात, मानवी अंधश्रद्धेला
मर्यादा नसतात, हेही तितकंच खरं!
काळाच्या ओघात जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या.
त्यातीलच एक माया संस्कृती होय. शाळेत असताना मला ’संस्कृती’ या शब्दाबद्दल विशेष
कुतूहल असायचं. हडप्पा व सिंधू या दोन शब्दांच्या पुढे नेहमी येणारा संस्कृती हा
शब्द मला फारसा कळाला नव्हता. पण वयाच्या प्रगल्भतेबरोबरच आजुबाजुच्या परिस्थितीने
त्याचा अर्थ मला उमजवला. आज वाटतंय भारतीय संस्कृती ही जगातील एक सर्वोत्तम व
विज्ञाननिष्ठ अशी संस्कृती आहे. आपली कालगणना संपली म्हणून जगाचा विनाश चिंतणारी
माया संस्कृती मात्र मला समजली नाही. शेकडों वर्षांच्या स्पॅनिश आक्रमणाने ती दबली
गेली व त्यामुळेच आज मध्य व दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश राष्ट्रे तयार झाली आहेत. यातून
भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आपल्याला ध्यानात यायला हवे. जर आपणही असे तकलादू
असतो, तर भारत हे एक इंग्रजी मातृभाषिकांचं राष्ट्र दिसलं असतं. त्यातही काही
अपवादात्मक नमूने आज मी आजुबाजुच्या परिसरात पाहतोय.
काही वर्षांपूर्वी मेल गिब्सनचा माया भाषेतील Apocalypto हा
चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट सर्वोत्तम परदेशी चित्रपटांच्या ऑस्कर नामांकनात
समाविष्ट झाला होता. त्यात माया अदिवासींचं जगणं पडद्यावर पाहिलं. भारतात
बॉलिवूडमध्ये तयार झालेला ’नक्षा’ हा चित्रपट हॉलिवूडमधील कुठल्या तरी माया भाषिक
चित्रपटावरून तयार झालाय. याव्यतिरिक्त माया संस्कृतीबद्दल मला फारसं ज्ञान नाही. खरं
बोलायचं तर त्यांनी आपल्या संस्कृतीच्या अंताचही भाकित नक्कीच करून ठेवलं असणार!
बरोबर एक वर्षांपूर्वी मी वृत्तपत्रांत वाचलं
होतं की, मेक्सिकोच्या लोकांची माया संस्कृतीवर दृढ श्रद्धा असल्याने त्यांनी जीवनाचे अंतिम वर्ष
मोठ्या आनंदाने, मुक्तपणे जगायला सुरूवात केलीय. वर्षभर विविध महोत्सवांचे आयोजन
या देशात केले जाणार होते. आता २१ डिसेंबर २०१२ उलटून गेलाय. सूर्याने उत्तरायन
चालू केले आहे. इथुन पुढे मेक्सिकोवासियांचे पैसे संपल्याने त्यांना अधिक कष्टाचे जीवन
न जगायला लागो. अन्यथा तेच म्हणतील, २१ डिसेंबर नंतरच आमचे हे हाल चालू झाले...
म्हणजे भविष्यवाणी खरी
होती...!!!