Wednesday, March 21, 2012

फ़ेसबुक वापरताना....


इंटरनेटच्या माध्यमातून विश्वजवळ आल्याने त्याचा वापर गेल्या काही वर्षात वाढतच आलेला आहे. त्यातच गेल्या चार-पाच वर्षामध्ये सोशल नेटवर्किंग करणाऱ्या वेबसाईट्सचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज इंटरनेट वापरणाऱ्यांचे फ़ेसबुकवर अकाऊंट नसेल तर तो ’अडाणी’ मानला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात ’फ़ेसबुक’ ही सोशल नेटवर्किंग साईट जगात वापरली जाते. काही दिवसांपासून फ़ेसबुक व सोशल नेटवर्किंग निरनिराळ्या कारणांनी चर्चेत आहे. मागील काही महिन्यात बंगळुरु मध्ये लाखो फ़ेसबुक अकाऊंट्स चा पासवर्ड हॅक करण्यात आला होता. फ़ेसबुकवर आपण आपली बरीच माहिती देत असतो, त्यामौळे फ़ेसबुकची सुरक्षितता म्हणजेच आपल्या इंटरनेटवरील अस्तित्वाची सुरक्षितता मानली तर वावगे ठरणार नाही. नवख्या फ़ेसबुक युजर्सला त्याच्या विविध सेटिंग्जची माहीती नसते. ती जर जाणून घेतली तर आपले फ़ेसबुक अकाऊंट ’सेक्युअर’ करण्यास निश्चित मदत होईल.
-    फ़ेसबुकच्या Account Settings मध्ये आपला मोबाईल क्रमांक व पर्यायी ई-मेल पत्ता याची नोंद ठेवता येते. म्हणजेच आपण दोन वेगवेगळ्या ई-मेल पत्याद्वारे किंवा स्वत:च्या मोबाईल नंबरद्वारे सुद्धा फ़ेसबुक लॉग-इन करु शकतो. पुढे कधी फ़ेसबुकचा पासवर्ड जरी हॅक झाला तरी ई-मेल वरुन वा मोबाईलद्वारे तो पुन्हा रिसेट करता येतो. म्हणजेच पासवर्ड हॅकर्सला फ़ेसबुक अकाऊंट हॅककरण्यासाठी ई-मेलचा पासवर्ढी हॅक करावा लागेल.
-    नवे मित्र जोडणे हा अनेक जणांचा छंद असतो. परंतू तो फ़ेसबुकवर थोडा मर्यादित ठेवला तर नेहमीच फ़ायदेशीर ठरतो, जमलं तर आपण ओळखत असलेल्या व्यक्तिंचीच ’फ़्रेंड रिक्वेस्ट’ स्विकारली तर ते फ़ेसबुक अकाऊंटच्या सुरक्षितेशी फ़ायदेशीर ठरेल. आज फ़ेसबुकवर हिरो-हिरॉईनची छायाचित्रे वापरुन विविध नकली अकाऊंट्स तयार झालेली आहेत किंवा अनेक जण तुमच्या मित्र-मैत्रिणींचे नाव व हिरो-हिरॉईनचा फ़ोटो वापरुन तुमच्या फ़्रेंड लिस्ट्मध्ये प्रवेश करतात, अशी अकाऊंट्स आपल्या फ़्रेंड लिस्ट मध्ये असणे नेहमीच धोकादायक असते. शक्यतो मित्राचा मित्र च आपल्याला फ़्रेंड रीक्वेट पाठवेल अशी फ़ेसबुकमध्ये Privacy Setting करून ठेवा, अकाऊंट्सना मोठ्या प्रमाणात नकली अकाऊंट्समधून फ़्रेंड रिक्वेस्ट येतात, त्या न स्विकारणेच योग्य ठरेल.
-    फ़ेसबुकने लॉग-ईन अलर्ट्ची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्या करीता आपल्याला स्वत:चा मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागतो. फ़ेसबुक अकाऊंट लॉगईन झाल्यावर आपल्या मोबाईलवर लगेचच फ़ेसबुकवरुन तसा मेसेज येतो. त्यामुळे सुरक्षित लॉगईन साठी या सुविधेचा उपयोग करणे योग्य ठरते. Privacy Settings मधे जाऊन या सुविधेचा वापर करता येईल.
-    वैयक्तिक संगणकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणवरुन लॉग-ईन करताना विशेष खबरदारी घेणे महत्वाचे आहे. फ़ेसबुकच्या पहिल्या पानावरील पासवर्ड/लॉअगईन आयडी च्या शेजारी ‘Remember Password  असा  चेकबॉक्स असतो, त्या ठिकाणी कधीही ‘टिक’ () करु नये, तसे केल्यास आपला पासवर्ड त्या संगणकावर सेव्ह राहिल व दुसरा कोणीही संगणक वापरकर्ता त्या पासवर्ड्द्वारे आपले अकाऊंट सहज उघडू शक्केल. सहसा सार्वजनिक ठिकाणी फ़ेसबुक अकाऊंट न उघडणेच योग्य होय.
-    अनेकदा कामाच्या ठिकाणी कार्यालयात फ़ेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स वर बंदी असते. शेरास सव्वाशेर म्हणून अनेक जण यावर ’खुष्किचा मार्ग’ वापरतात. Blocked sites उघडण्यासाठी अनेक वेबसाईट्स इंटरनेट विश्वात तयार झालेल्या आहेत. अशा साईट्सचा वापर फ़ेसबुक उघडण्यासाठी कधीच करु नये. तरे केल्यास अधिकृतपणे आपण फ़ेसबुकचे अकाऊंट त्या वेबसाईट्सकडे सोपवत असतो. सर्वात जास्त फ़ेसबुक अकाऊंट हॅक हे याच पद्धतीने होतात, त्यामुळे फ़ेसबुक उघडण्याच्या मोहात न पडता या साईट्सचा वापर न करणेच योग्य ठरेल.
-     शक्यतो दुसऱ्याच्या मोबाईल एप्लिकेशनद्वारे फ़ेसबुक लॉगईन करणे टाळावे. मोबाईल सेटिंग्ज ज्ञात नसल्यास आपला पासवर्ड त्या मोबाईलमध्ये सेव्ह राहण्याची शक्यता आहे. म्हणून जमलं तर फ़ेसबुक लॉगईन करिता स्वत:चाच मोबाईल वापरावा.

     - तुषार भ. कुटे

Monday, March 12, 2012

श्रेया घोषाल: मराठी टॉप टेन

 भारतातील आजची सहा प्रमुख भाषांतील पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी मराठी भाषेत मराठी मातृभाषिक गायकांनाही लाजवेल अशा सुरांत अनेक गाणी गायली आहेत. त्यातील टॉप टेन गाणी मी इथे देत आहे. जमलं तर ऐकुन बघा....


१. जीव दंगला (जोगवा)
२. अजुन तरळते (माझी गाणी-अल्बम)
३. मन रानात गेलं गं (जोगवा)
४. सूर आले शब्द ल्याले (सुंदर माझे घर)
५. मेंदी भरल्या पावुली (मस्त शरदीय रात-अल्बम)
६. चंचल हा मनमोहन (माझी गाणी-अल्बम)
७. गार गार हा पवन बावरा (अर्जुन)
८. डोहाळे पुरवा (इश्श)
९. मंगळागौरी (मणी मंगळसूत्र)
१०. ऐकुन घे ना रे मना (स्वप्न तुझे नी माझे)

====================================================================

Sunday, March 11, 2012

संगणकाचे प्रकार


मित्रांनो, मी सध्या नितीन प्रकाशनाच्या ’ज्ञानसागरातील शिंपले’ या पुस्तकांच्या श्रुंखलेतील पुढच्या पुस्तकाचे लेखन करित आहे. त्यात समाविष्ट असलेल्या एका लेखाचीच ही झलक-


७.      संगणकाचे प्रकार
संगणकाच्या आकारानुसार तसेच वेगानुसार त्याचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात- सुपर कॉम्प्युटर, मेनफ्रेम कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर व मायक्रो कॉम्प्युटर इत्यादी. सुपर कॉम्प्युटर हा सर्वात वेगवान संगणक होय. हवामान अंदाज, उपग्रह प्रक्षेपण, मोबाईल कम्युनिकेशन यासारख्या विशिष्ट कामांकरिता हे संगणक वापरले जातात. त्यांचा वेग हा खूप जास्त असतो. तो ’फ्लॉप्स’ या एककात मोजला जातो. शासकिय संस्थांव्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांमध्येही सुपर कॉम्प्युटर वापरले जातात. सीडॅकने तयार केलेला. ’परम’ हा भारताचा पहिलाच महासंगणक अर्थात सुपर कॉम्प्युटर होता. अशा संगणकांचा हाताळण्यासाठी विशिष्ट संगणक प्रणालीची गरज असते. सुपर कॉम्प्युटर पेक्षा आकाराने लहान व वेगाने कमी असणारा संगणक म्हणजे मेनफ्रेम कॉम्प्युटर होय. १९६० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या संगणकांची निर्मिती झाली होती. आजही अनेक कंपन्यांकडे असे संगणक उपलब्ध आहेत. जिथे सुपर कॉम्प्युटरची गरज नसून अधिक कार्य करायचे असते, अशा ठिकाणी मेनफ्रेमचा वापर होतो. मेनफ्रेमपेक्षाही कमी आकाराचा व कमी वेग असणारा संगणक म्हणजे मिनी कॉम्प्युटर होय. आज अशा प्रकारचे संगणक वापरले जात नाही. ८० च्या दशकात शेवटचा मिनी कॉम्प्युटर वापरण्यात आला होता. मेनफ्रेमपेक्षा कमी आकाराचा संगणक तज्ञांनी बनविल्याने त्याला मिनी कॉम्प्युटर असे नाव दिले गेले होते. आज मिनी कॉम्प्युटरचे नामोनिशान केवळ संग्रहालयांत दिसून येते. आपल्या घरी किंवा महाविद्यालयांत जो संगणक वापरण्यात येतो त्याला मायक्रो कॉम्प्युटर असे म्हणतात. सन १९८० नंतर वैयक्तिक संगणकाचे युग अवतरल्यावर त्याला मायक्रो कॉम्प्युटर असे नाव दिले गेले. पूर्वीच्या खोलीएवढ्या मोठ्या संगणकांपेक्षा हा संगणक अतिशय लहान असल्याने त्याला हे नाव सार्थक होते. मायक्रो कॉम्प्युटरचे डेस्कटॉप व लॅपटॉप असे दोन प्रकार पडतात. डेस्कटॉप म्हणजे टेबलावर व लॅपटॉप म्हणजे मांडीवर ठेवून वापरता येण्यासारखा कॉम्प्युटर होय. आता हाताच्या तळव्यावर मावेल असा पामटॉप नावाचा कॉम्प्युटरही लोकप्रिय होत आहे. काही वर्षांनी फिंगरटॉप नावाचे संगणक बाजारात आले तर आश्चर्य वाटायला नको.

Sunday, March 4, 2012

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने....


साधारणत: दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी इंजिनियरिंगला शिकत होतो, तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की, मी एखाद्या पुस्तकाचा लेखक होईल. सन २००० मध्ये मी माझ्या मराठी लेखनाला सुरुवात केली होती परंतु, पुस्तक लिहिण्याचा विचार मनातही नव्हता. लेखन करणे, हे केवळ छंद म्हणून मी जोपासू लागलो होतो. आज त्याचे फलित मला माझ्या पहिल्या पुस्तकाच्या रूपाने समोर दिसत आहे.
इंजिनियर आणि तोही शिक्षक व मराठी लेखकही... हे समीकरण काहींना न समजणारे आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी घेऊन शिक्षक बनणाऱ्याला काहीजण मूर्ख म्हटले होते. त्यांच्या भावना मी समजू शकतो. परंतु, ’काही मिळविण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो’, हेही तितकंच खरं आहे. माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मला मिळालेल्या प्रतिक्रियांत मी माझ्या विद्यार्थ्यांपेक्षा माझ्या महाविद्यालयीन मित्रांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या मानतो. त्याचे कारणही तसेच आहे. त्यांनी मला घडताना पाहिले होते व मी काय करू शकतो, याची जाणीवही त्यांना होती. आज मागे वळून बघताना मला काहीही गमावल्याचे दु:ख वाटत नाही. असो... पुस्तकाच्या खऱ्या कथेकडे वळूयात.
 पूर्वी केवळ अलंकारिक लिहिणं वगैरे किंवा नव्या पिढिच्या प्रतिनिधीच्या भावना मांडणे, अशा कल्पनांतून मी पुण्याच्या दैनिक युवा सकाळमधून लिहिणे सुरू केले होते. सकाळ समूहाचे ते नुकतेच सुरू झालेले दैनिक होते. माझे लेख वृत्तपत्रांतून प्रकाशित होऊ लागल्यावर मला खरोखर नवा हुरूप मिळू लागला होता. पूर्वी पेपरात नाव आलं की खूप अभिमान वाटायचा. पण, आता त्याचं फारसं काही वाटत नाही. आता नावापेक्षा आपलं लिहिलेलं प्रसिद्ध झालंय, याची किंमत जास्त वाटू लागलीय. गेल्या बारा वर्षांची लेखन तपस्या आज ’बिटस न्ड बाईट्स’ या नितीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाद्वारे मला प्रकाशित करता आली. पूर्वीचं हलकंफुलकं लेखन गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाकडे वळून गेलं व पुस्तकरूपी प्रकाशितही झालं. मला त्याचा विशेष आनंद वाटतो.
माझा सतत लिहित राहण्याचा छंद मला या पुस्तकासाठी कामाला आला. संगणक विषयावर वृत्तपत्रांत लिहावे, असे अनेक दिवसांपासून मनात होते. त्यासाठी सर्वप्रथम नाशिकच्या ’दैनिक गांवकरी’ ला संपर्क साधला. नोव्हेंबर २००८ मध्ये त्यांच्या कार्यालयातून फ़ोन आला. ’दैनिक गांवकरी’चे उपसंपादक श्री. शैलेंद्र तनपुरे यांच्याशी भेट निश्चित झाली. संगणकाच्या विविध हार्डवेअर व सॉफ़्टवेअर शोधामागील नक्की इतिहास काय आहे? हे समजावून सांगण्याकरीता दैनंदिन लेखमालिका तयार करण्याची संकल्पना तनपुरे सरांनीच मला सांगितली. संगणकाचा इतिहास माझा पक्का असल्याने मला या विषयी लिखाण करण्यास काहीच अडचण येणार नव्हती. माझ्या या दैनंदिन स्तंभाला मीच ’बिट्स अन्ड बाईट्स’ हे नाव सुचविले व तनपुरे सरांनीही त्याला तात्काळ होकारही दिला. वृत्तपत्रात दैनंदिन लिहिण्यासाठी मला मिळालेली ही पहिलीच संधी होती.
१ जानेवारी २००९ रोजी ’बिट्स अन्ड बाईट्स’ मधला पहिला लेख प्रसिद्ध झाला. महिनाभरातच उत्तर महाराष्ट्रातून अनेक फ़ोन व ई-मेल प्राप्त झाले. विशेष म्हणजे यात शहरी भागातून कमी तर ग्रामीण भागातून जास्त प्रतिसाद प्राप्त झाला होता. संगणकाविषयी वृत्तपत्रांमधून प्रथमच अशी दैनंदिन लेखमालिका प्रसिद्ध झाली होती. या मालिकेचा फ़ायदा जितका वाचकवर्गाला होत तितकाच तो मलाही झाला. संगणकाच्या एखाद्या भागाविषयी केवळ वरकरणी माहिती असून चालणार नव्हती म्हणून अनेक लेखांना समृद्ध करण्याकरीता मला इंग्रजीतील दर्जेदार पुस्तकांचा तसेच इंटरनेटवरील लेखांचा मोठा आधार घ्यावा लागला. त्यातून मला ही मोठी ज्ञान प्राप्ती झाली. शिक्षकी पेशात असल्यामुळे या ज्ञानाचा मला सतत फ़ायदा सतत झाला आहे. एखाद्या संकल्पनेला शिकवताना सुरुवात करतेवेळी मी यातील नक्की इतिहास काय आहे! अशा प्रकारच्या उत्तराने सुरुवात करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत जाते. एकंदरीत लेखमालिका लिहताना मला तनपुरे सरांच्या सूचनांचाही मोठा फ़ायदा झाला आहे. या लेखमालिकेला पुस्तक रुपात आणण्याची संकल्पना मला त्यानीच दिली होती.
संगणक इतिहास मांडताना अनेक धडाडीच्या संशोधकांची व संगणक विकसकांची चांगलीच ओळख होते. प्रत्येक  क्षेत्रात व्यवस्थापन शास्त्राला वाव आहे, याची कल्पना येते. संगणकाचा मुलभूत विषय  मानला जाणारा ’कॉम्प्युटर र्गनायझेशन’ हा विषय शिकवताना मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो. Computer is not a magic, but it is a logic!’ हे १०० टक्के खरे आहे. अनेक धडपड्या व ध्येयवेड्या संगणक तज्ञांनी आजचा परिपूर्ण संगणक तयार केला आहे यात वाद नाही. त्यांनी संगणकाच्या विविध संकल्पना तयार केल्या नसत्या तर आजचा संगणक अस्तित्वात आलाच नसता. एखादे हार्डवेअर वा सॉफ़्टवेअर वापरताना ते बनविण्याचे श्रेय कोणाचे आहे याची माहीती जवळपास कोणालाच नसते. पण त्यांचे योगदान आपण कधीच हिरावून घेऊ शकत नाही. जुन्या पिढीतील संगणक विकसकांनी जो संगणकाचा विकास केला आहे अशा ज्ञात व अज्ञात तज्ञांना माझा सावंद्य नमस्कार ! त्यांचे कार्य मराठी वाचकांना समजावे याकरीता मी केलेला हा एक प्रयत्न होय.
नितीन प्रकाशनाकडे जेंव्हा मी ’बिट्स अन्ड बाईट्स’ च्या पुस्तकरूपी प्रकाशनाचा प्रस्ताव मांडला तेंव्हा त्यांनी मला तात्काळ होकार दिला. आज नितीन प्रकाशन मराठीमध्ये तंत्रज्ञानाला आणू पाहत आहे, याचा मला अभिमान वाटतो. मराठीतील माझे पहिले पुस्तक प्रकाशित करत असल्याबद्द्ल मी श्री. नितीन गोगटे व श्री. अविनाश काळे यांना मन:पूर्वक धन्यवाद देतो.
प्रस्तावना लिहण्याकरीता मी अच्युत गोडबोले सरांना जेंव्हा विनंती केली तेंव्हा त्यांनी तात्काळ मला होकार दिला. माझ्यासारख्या नवोदित लेखकाला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांचे शतश: धन्यवाद. मराठी तंत्रज्ञान लिखाणासाठी मी गोडबोले सरांना माझा आदर्श मानत आलो आहे. त्यांचीच प्रस्तावना माझ्या पुस्तकाला लाभली, हे मी माझे भाग्य मानतो.
माझ्यातील संगणक अभियंत्याची ओळख मराठी तंत्रज्ञान लेखक म्हणून दैनिक गांवकरी मुळे झाली. गांवकरी वृत्तपत्र समूहाचा मी ऋणी आहे. माझे धाकटे बंधू अमित व अमोल यांचे सहकार्य ही लेखमालिका व पुस्तक लिहिण्यासाठी खूप मोलाचे ठरले. याशिवाय क. का. वाघ तंत्रनिकेतन मधील तसेच संदिप तंत्रज्ञान संस्था व संशोधन केंद्र येथील सर्व सहकाऱ्यांचा मी आभारी आहे.
प्रत्यक्ष दिसत नसले तरी माझ्या सर्व यशात मोलाचा सहभाग असणारे माझी आई-वडील, काका-काकी, ज्यांच्या कडून मी लिखाणाचा वसा घेतला ते मामा विजय आवटे व नेहमीच मला प्रोत्साहित करणारे माझे इतर सर्व कुटुंबिय व लिखाणाबद्द्ल नेहमीच चौकस असणारे मित्र अर्जून, प्रमोद, माणिक व पत्रकार अशोक डेरे यांचही योगदान मोलाचं आहे, हे देखिल तितकच खरं.