विज्ञानाच्या
कक्षा अधिकाधिक रुंदावत असताना संगणक क्षेत्रातील प्रगतीचा वेग मात्र अफ़ाट
असल्याचा दिसून येते. माहिती
तंत्रज्ञान व दूरसंचार तंत्रज्ञान या दोहोंच्याही प्रगतीच्या वेगाला सीमाच नाही. रोज नवनव्या संकल्पना संगणक
विश्वात येऊ घालत आहेत. तंत्रज्ञानातील
अशा विविध संपल्पनांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात आता अपरिहार्य होऊ पाहत आहे. शिक्षण क्षेत्र हे
तंत्रज्ञानाच्या वापरापासून आता दूर राहू शकलेले नाही. एका अर्थाने तंत्रज्ञानातून
साध्य वेगाची भुरळ ही प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे.
तंत्रज्ञानाच्या
प्रभावामुळे शिक्षणपद्धतीत बदल हा निश्चितच घडत आहे व तो स्वागतार्ह मानला पाहीजे. पाश्चिमात्य देशांमध्ये शिक्षण
क्षेत्रात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती घडवून आणली. याच कारणामुळे तेथील शिक्षणाच्या दर्जात व वेगातही वाढ
झालेली आहे. या गोष्टी
भारतीय शिक्षणक्षेत्रातही रुजणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारच्या आधुनिकीकरणाने आपण भारतीय शिक्षणपद्धतीचा
दर्जा निश्चित सुधारु शकु. माहिती
तंत्रज्ञानाचा वापर एक शिक्षक म्हणून रोजच्या शिक्षणात कसा करता येऊ शकेल, याचाच आढावा घेत असलेला हा लेख.
शहरात संगणक
वापरकर्त्यांची संख्या जशी वाढत आहे तशी ती ग्रामीण भागातही वाढत आहे. आज संगणकाच्या किमती बऱ्याच
अंशी कमी झाल्याने शहरी व ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय जनांना आता संगणक विकत घेणे
हे परवडण्यासारखे आहे. इंटरनेटच्या
वापराविषयी आजची युवा पिढी अतिशय जागरूक झाली आहे. अगदी १२-१३ वर्षाचा
मुलगाही इंटरनेट सहजपणे वापरु लागतो. शिवाय बीएसएनएल सारख्या सरकारी कंपन्यांनी अतिशय कमी दरात
इंटरनेट सुविधा सर्वसामान्यांच्या घरात पोहचवली आहे. इंटरनेटविषयी कुतूहल असणारी मुले बहुतांश वेळा संगणकीय खेळ
खेळण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी व गाणी ऐकण्यासाठी संगणक व इंटरनेटचा वापर
करतात. अर्थातच, हा संगणक व इंटरनेटचा ’योग्य’ उपयोग निश्चित नाही. परंतु संगणकाचा वापर एखाच्या
शिक्षकाने ठरविले तर खुपच उत्तम प्रकारे विद्यार्थांच्या दैनंदिन जीवनात
शिक्षणासाठी करवून घेता येऊ शकतो. त्याचे काही
उदाहरणे पहा.
१) पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अर्थात PPT
संगणकाद्वारे सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे
सर्वोत्तम सॉफ़्टवेअर म्हणजे मायक्रोसॉफ्टचे ’पॉवरपॉइंट’
होय. विविध
तंत्रज्ञान संस्थांमध्ये PPT चा वापर
आपल्या विषयाचे सादरीकरण करण्यासाठी केला जातो. खडू व फळा या पारंपारीक पद्धतीला पर्याय म्हणून या संगणकीय
पद्धतीचा वापर होतो. त्याचा वापर
तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थांना अपरिहार्य आहे. परंतू केवळ तंत्रज्ञानाशीच याचा
संबंध न राहता संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांसाठी PPT चा वापर करता येऊ शकतो. अनेक पाश्चिमात्य संस्थांनी
विविध ज्ञानशाखांकरिता PPT ह्या
इंटरनेटवर उपलब्ध करुन दिल्या आहेत. शिवाय त्या इंटरनेटवरून डाऊनलोडही करता येतात. अशा प्रकारचा एक प्रकल्प
अमेरिकेतील ’एमआयटी’ संस्थ्येने 'Open Course Ware' या नावाखाली
इंटरनेटद्वारे उपलब्ध करुन दिला आहे. ह्यातील विविध विषयांवरील PPT मुलांना अभ्यास म्हणून उपलब्ध करुन दिल्यास, ते निश्चितच संगणकाद्वारे
अभ्यास करु शकतील.
२) गुगल
न्युजग्रुप:-
News
Group ही संकल्पना पाश्चिमात्य देशांत जवळपास तीस पेक्षा अधिक
वर्षांपासून राबवली जात आहे. संगणक
क्षेत्रातील अनेक शोध हे न्युजग्रुप मुळेच प्रकाशझोतात आले. असे असले तरी भारतात ही
संकल्पना फ़ारशी रुजलेली नाही. न्युजग्रुप
मध्ये इंटरनेटद्वारे विविध चर्चा सत्रे व बातमी विवरण सत्रे आयोजित केली जातात. त्याचा वापर माहितीची
देवाणघेवाण करण्यासाठी होतो. एका विशिष्ट
विषयाला वाहिलेले लाखो न्युजग्रूप्स हे गूगलवर उपलब्ध आहेत. अशा ग्रूप्सचे ईमेलद्वारे सभासद
होऊन एखाद्या विशिष्ट विषयावरची नवनवी माहिती मिळवता येऊ शकते. शिवाय शिक्षकही असे
न्युजग्रूप्स तयार करुन विद्यार्थ्यांशी माहितीची देवाणघेवाण करू शकतात. याची माहिती groups.google.com वर उपलब्ध
आहे.
३) गूगल साईट्स:-
स्वत:ची मोफत साईट
तयार करण्याची संकल्पना गूगलने यशस्वीपणे राबवली आहे. ’याहू’ने तयार केलेली geocities ही मोफत साईट्सची सुविधा बंद
झाल्याने गूगल साईट्सने मोठी झेप घेतली. गूगलच्या या सुविधेद्वारे
आपल्याला स्वत:ची मोफत साईट
तयार बनविता येते. त्यासाठी वेबसाईट बनविता येणारे
सॉफ्टवेअर वा संगणक भाषा वापरण्याची आवश्यकता नसते. ह्या
वेबसाईटचा पत्ता sites.google.com/sites ने सुरू होतो. १००
मेगाबाईट्स पर्यंत माहिती आपण एका वेबसाईटवर साठवू शकतो. एखाद्या
विषयावरची इत्यंभूत माहिती देण्याकरिता अशा प्रकारच्या साईट्सचा वापर करता येतो. विषयाची ई-बुक
प्रश्नसंच, बोर्डाच्या / विद्यापीठाच्या
पूर्वीच्या प्रश्नपत्रिका यासारखे soft copy साहित्य आपल्या साईट्सला जोडता
येतात व जगातून ती साईट कुठुनही उघडल्यास डाऊनलोडही करता येतात. ई-मेल न वापरता
विविध विषयांवरील माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता हे उत्तम साधन आहे. स्वत:ची वेबसाईट
तयार करण्यासाठी sites.google.com ला भेट
द्यावी लागेल.
४) युट्युब
(व्हीडिओ साईट):-
विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी वापरण्यात येणारी
जगातील सर्वात मोठी वेबसाईट म्हणजे youtube.com होय. गेल्या तीन
वर्षांपासून या वेबसाईटची लोकप्रियता कैकपटीने वाढली आहे. ती इतकी आहे
की, आज
इंटरनेटवरील कोणताही व्हिडिओ प्रथम युट्युबवर शोधला जातो. याच
कारणास्तव जगातील अनेक नामांकित संस्थांनी त्यांचे व्हिडिओ लेक्चर्स या वेबसाईटवर
अपलोड केले आहेत, जे जगात कुठेही पाहता येतात. शिवाय आयआयटी
व आयआयएम सारख्या भारतीय संस्थाही याच वेबसाईटवर आपले व्हिडिओ अपलोड करत असतात. अशा प्रकारे
युट्युबने ज्ञानाचे विपुल भांडार उपलब्ध करून दिले आहे. त्यातील
आपल्याला हवे असलेले उपयुक्त व्हिडिओ डाऊनलोड करून किंवा थेट ऑनलाईन
विद्यार्थ्यांसोबत प्रदर्शित करता येऊ शकतात. वर्गात
मिळाणाऱ्या ज्ञानाबरोबरच इतर ज्ञानाचाही स्त्रोत म्हणुन युट्युबचा वापर करता येवू
शकेल.
५) ब्लॉग:-
इंटरनेटद्वारे आपले विचार आपल्या भाषेत खुलेपणाने
मांडण्याकरिता गेल्या काही वर्षांपासून ब्लॉग या संकल्पनेची लोकप्रियता वाढत आहे. केवळ अभ्यासक्रमातीलच
नव्हे तर दिशादर्शक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ब्लॉगचा वापर शिक्षकांद्वारे
करता येऊ शकतो. ब्लॉगचे
विश्व इंटरनेटद्वारे झपाट्याने विस्तारले आहे. लहान
मुलांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेक जण ब्लॉगच्या माध्यमातून विचारमंथन करत असतात. मार्गदर्शक ब्लॉग
लिहुन शिक्षक नक्कीच विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा देऊ शकतात. ज्या गोष्टी
सांगण्यासाठी शिक्षकांना वर्गात वेळ मिळत नाही, अशा अनेक
मार्गदर्शक गोष्टी ब्लॉगमधुन मांडता येतील. शिवाय आज
संगणकात ’युनिकोड’ उपलब्ध
झाल्याने सर्वच भारतीय भाषांत ब्लॉग लिहिता येतात. या युनिकोडचा
वापर केवळ ब्लॉगपुरताच मर्यादित नसुन इंटरनेटवर प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर करता
येतो. त्याची अधिक
माहिती www.baraha.com या वेबसाईटवर
उपलब्ध आहे. शिवाय ब्लॉग
तयार करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वेबसाईटस आहेत:- blogger.com
व wordpress.com.
६) SMS चॅनेल:-
एकाच वेळी अनेक जणांना माहितीवजा SMS पाठविण्यासाठी
गूगलने तयार केलेली सेवा म्हणजे SMS channel होय. याद्वारे
आपल्याला स्वत:चे SMS
channel तयार करता येते व एकाच वेळी अनेकांना SMS पाठविता
येतात. गूगलच्या
विश्वात अनेक माहितीपूर्ण SMS channel उपलब्ध आहेत. ज्याद्वारे
विविध विषयांवरील नवी व जुनी माहिती SMS द्वारे मिळवता येते. विद्यार्थ्यांना
अशी उपयुक्त माहिती देण्याकरिता शिक्षक असे SMS channel तयार करू
शकतात. मोबाईलचा
विधायक वापर करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याची
माहिती labs.google.co.in
वर उपलब्ध आहे.
७) सोशल नेटवर्किंग:-
आजची युवा पिढी फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सला
चिकटुन असते. विविध गोष्टी
’शेयर’ करण्यासाठी व नवे मित्र जोडण्याकरिता फेसबुकची
मदत होते. याच फेसबुक बरोबरच twitter
सारख्या मायक्रोब्लॉगिंग साईटसचाही विद्यार्थ्यांशी
इंटरनेटद्वारे संवाद साधण्याकरिता उपयोग करता येऊ शकेल.
वरील सातही संकल्पना मी माझ्या दृष्टीने सादर केल्या आहेत. त्यामुळे
शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर केवळ यापुरताच मर्यांदित नाही, तो ज्याच्या-त्याच्या
दृष्टीकोनावर अवलंबुन आहे. भविष्यात शिक्षणपद्धतीला गती
येण्यासाठी अशा तंत्रांचा वापर वाढत जाणार आहे. त्यामुळे
शिक्षकांनी याचा वापर आतापासूनच सुरू केल्यास त्याच्या निश्चितच चांगला फायदा मिळू
शकेल.
- तुषार भ. कुटे....
परिपूर्ण ,सर्वसमावेशक ,दर्जेदार ,सकस लेख
ReplyDeleteविज्ञान हाच भविष्यात धर्म उरणार आहे.