Tuesday, August 7, 2012

भुसावळचे मराठी लोक हिंदी का बोलतात?

गेल्या दोन वर्षांपासून मला पडलेला प्रश्न मी या ब्लॉगच्या माध्यमातून विचारू इच्छितो. खरं तर मागील वर्षीच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या परिक्षेत मी हा विषय संशोधनासाठी घेणार होतो. पण, योग जुळुन आला नाही. हा प्रश्न काय, ते या ब्लॉगच्या शिर्षकातून तुम्हाला समजले असेलच. तरीही थोडक्यात सांगतो.
नव्या तंत्रज्ञानामुळे मराठी सारख्या भाषा बुडणार, असे काही वर्षांपासून ऐकत होतो. पण, जसजसे इंटरनेटने संवाद साधू लागलो, तसतसे समजू लागले की, याच इंटरनेटमुळे मराठी भाषा अधिक पसरत आहे व अधिक समृद्ध होत आहे. युवा पिढी आपल्या मातृभाषेच्या बाबतीत खूप संवेदनशील दिसते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात राहणारे युवक इंटरनेटद्वारे मराठीतून संवाद साधतात व मुळातच आपल्या मातृभाषेला प्राधान्य देतात, ही बाब मला सुखावह वाटली. त्यामुळे माझा मातृभाषेसाठी काहीतरी करण्याचा उत्साह द्विगुणित झाला.
उत्तर महाराष्ट्रातील अर्थात खानदेशातील अनेक जणांशी माझा चांगला स्नेह आहे. इथे बोलली जाणारी बोलीभाषा म्हणजे ’अहिराणी’ होय. मराठी भाषेसारखा गोडवा याही भाषेत दिसून येतो. खानदेशातीलच जळगांव जिल्ह्यात भुसावळ हे गांव आहे. अर्थात हे गांव याच मराठी मातीतील आहे. पण, गेल्या तीन-चार वर्षांत इथल्या सर्वच मराठी नावाच्या लोकांना मी प्रामुख्याने उत्तर भारतीय पद्धतीच्या हिंदीत बोलताना पाहिले आहे. विशेष म्हणजे ते अत्यंत अस्खल्लितपणे ही भाषा बोलतात. अनेकांना ’मराठी किस चिड़ियां का नाम है?’ हे माहितच नसावे! त्यामुळे माझी उत्सुकता अधिक ताणली गेली. एकिकडे गेली साठ वर्षे बेळगावचे मराठी बांधव आपली भाषा व संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतायेत. असे असताना हा काय वेगळा प्रकार आहे? याचा उलगडा मला झाला नाही.
काहींनी मला सांगितले की, हे गांव ’बॉर्डरच्या’ जवळ आहे. पण, मग बेळगांव वा गोव्यातल्या मराठी बांधवांविषयी आपल्याला काय म्हणता येईल? या प्रशाचे उत्तर मात्र शोधता आले नाही. असेही नाही की, पानिपत प्रमाणे हे शहर पूर्णपणे वेगळ्याच राज्यात आहे. पानिपतच्या मराठी लोकांची भाषा बदलू शकते, ही बाब समजू शकतो. मी गूगलवरही ह्या शहराची माहिती बघितली व प्रथम खात्री करून घेतली की, हे शहर महाराष्ट्रातच आहे! विकिपीडियावर तर इथल्या मराठी शाळांची यादीच दिली गेली आहे. त्यानंतर मात्र मी बुचकळ्यात पडलो. आपल्याकडे जशी मुले इंग्रजी माध्यमातून शिकुन मराठी बोलतात, तसे तिथे मराठी माध्यमातून शिकुन हिंदी बोलतात, असे तर असेल ना? याची शक्यता मला कमीच वाटते. ’मुंबई’सारखी परिस्थितीही इथे नाही. “Why Bhusawal Marathi people speaks Hindi?” असे गूगलमध्ये टाकून मला योग्य निकाल मिळाले नाहीत. त्यामुळे मी शेवटचा पर्याय म्हणून हा ब्लॉग लिहायचे ठरविले. माझ्या मातृभाषेच्या बाबतीत कोणतीही शंकेचे निरासन करणे, मी माझे आद्य कर्तव्य समजतो. त्यामुळे वाचक मला मदत करतील, याची आशा वाटते. कोणाला माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर माहित असल्यास कृपया ’कमेंट’मध्ये लिहावे.

2 comments:

  1. भुसावळचे सर्वच लोक हिंदीतून बोलत असतील असे मला वाटत नाही. हिंदीभाषक प्रदेश जवळच लागून असल्यामुळे व हल्ली बाहेरून महाराष्ट्रात आलेल्या लोकांचे प्रमाण वाढल्यामुळे हिंदीचा वापर वाढला असणे स्वाभाविक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये बरेच लोक कानडी बोलतात. धारवाडमधील बरेच लोक मराठी बोलतात. हे चालायचेच. कुटेसाहेब, मराठीला काही धोका नाही. घाबरू नका. आपली भाषा कणखर आहे.
    यशवंत कर्णिक.

    ReplyDelete
  2. मराठीचा स्वाभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे. मित्रा तू ज्या भुसावळ शहराची हिंदी भाषिक म्हणून गोष्ट केली आहे त्या शहरात मी लहान पानापासून राहतो आहे. मला माहित आहे तुला कुणाला दुखवायचा नाही कदाचित... पण अमेरिकेतून आलेल्या माणसाशी तू मराठीत बोललास तर त्याला कळणार नाही... तसाच जर उत्तर भारतातून आलेल्या हिंदी भाशिकाशी बोललास त्यालाही ते कळणार नाही. शेवटी पोटाची खळगी कुठलीच भाषा जाणत नाही. तिला फक्त पैसा कळतो. भूक एक तर भिक मागल्यावर भागते एक तर कमावल्यावर. आणि भुसावळ म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत जोडणारा मुख्य सेतू आहे.. तिथे अनेक प्रकारचे लोक येतात... व्यापार होतात जर एकमेकांची भाषा नाही कळाली तर सर्व ठप्प होणार.
    जितके मला माहित आहे तितका शहरामध्ये एकमेकांशी कुणीच हिंदीत बोलत नाही. बोलले तर हिंदी भाषिक भागामध्ये आणि रेल्वे स्थानकावरच... एव्हढेच नाही तर मुस्लिम बांधव सुध्धा मराठी माणसाशी मराठी बोलतात. ते पण अस्सल खानदेशी मध्ये. तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. आणि हरियाणाचे पानिपत महाराष्ट्रात आणण्याचे काहीच कारण नाही. पानिपत चे मराठी लोक हा सर्व इतिहास आहे... इतिहासात जगणारे लोक भविष्य घडवू शकत नाहीत... पिढ्यान पिढ्या त्यांच्या तिथे गेल्यात ... कमीत कमी मराठी नाव लावतात यातच धन्यता. भुसावळ हे मराठीच आहे आणि मराठीच राहणार...त्याचे बेळगाव किवा पानिपत असला काहीच प्रकार होणार नाही. आणि असाच जर असेल तर नागपुरात नक्की फेरी मार... नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे... तिथे किमान २० लोकांशी बोल मराठीत. आणि अंदाज काढ...

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com