क्रिकेटमध्ये मोठे फटके मारुन अर्थात
चौकार व षटकार मारुन मिळणाऱ्या धावा ह्या चार व सहा होत. शिवाय फलंदाजाने धावून काढलेल्या
तीन धावाही खुप मानल्या जातात. या सर्व धावांच्या गणितामध्ये पाच ही संख्या राहूनच
जाते. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर पाच धावा कधी मिळतात का? या प्रश्नाचे उत्तर ’होय’ असेच आहे.
चार धावांना चौकार आणि सहा धावांना षटकार म्हणतात. तसे आपण पाच धावांना ’पंचकार’ म्हणूया.
क्रिकेटमध्ये काही अपवादात्मक परिस्थितीत पाच धावा मिळवता येतात किंवा बहाल केल्या
जातात. सन २००० मध्ये आयसीसीने क्रिकेट मध्ये नियमावलीत काही महत्त्वपुर्ण बदल केले.
क्रिकेटची ’जन्टलमन्स गेम’ ही प्रतिमा अबाधित
राहण्यासाठी हे बदल गरजेचेच होते. यापुर्वी केवळ एका अपवादात्मक परिस्थितीत धावांचा
पंचकार दिला जायचा. आज जवळपास दहा विविध नियमांन्वये पाच धावा काढता येतात!
फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षक वा यष्टीरक्षक हे बहुतांश वेळा हेल्मेट चा वापर
करतात. एका ओव्हर नंतर फलंदाज व गोलंदाज बदलला तर क्षेत्ररक्षक स्वतःचे हेल्मेट काढून
ठेवतो. हे हेल्मेट मैदानावरच विकेटकिपरच्या मागे ठेवलेले असते. त्यामुळे त्याला चेंडूचा
स्पर्श होणे, हे दुर्मिळच होय. या हेल्मेटला चेंडू लागल्यास पंचकार
देण्याचा आयसीसीचा नियम आहे. चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागून गेला असल्यास पाच धावा
ह्या फलंदाजाच्या खात्यात जमा होतात व बॅटला लागला नसल्यास या पाच धावा अवांतर म्हणून
संघाच्या धावसंख्येत जमा केल्या जातात. सन २००० पुर्वी केवळ याच परिस्थितीत पंचकार
दिला जात होता. परंतु, कालांतराने आयसीसीने काही कडक नियम सादर
केले व त्या साठी पाच धावा बहाल करण्याची योजना तयार केली.
आज क्रिकेटमधील बहुतांश पंचकार हे ’पेनल्टी धावा’
याच प्रकारांत गणले जातात. फलंदाजी करणाऱ्या संघाला किंवा फलंदाजाला
खाली दिलेल्या परिस्थितीत पाच धावा बहाल करण्याचा नियम आहे-
- क्षेत्ररक्षकाने आपल्या शरिराव्यतिरिक्त टोपी वा शर्टचा वापर क्षेत्ररक्षणासाठी केल्यास.
- गोलंदाजाने किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघाने चुकीच्या मार्गांचा वापर करुन चेंडुची गोलाई वा आकार बदलविण्याचा प्रयत्न केल्यास.
- क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जाणूनबुजून फलंदाजाला फलंदाजीस अडथळा आणल्यास. चेंडु टाकत असताना एखाद्या क्षेत्ररक्षक वेगाने आपली स्थिती बदलत असल्यास पंचानी त्याला तशी ताकीद देणे गरजेचे आहे. तरीही पुन्हा अशी घटना घडली तर फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा बहाल करण्यात येतात.
- क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जाणूनबुजून चेंडु सीमारेषेबाहेर घालविल्यास. (इच्छित फलंदाज पुढच्या षटकात फलंदाजीसाठी यावा, यासाठी क्षेत्ररक्षक ही क्लृप्ती वापरतात.)
- अनेकदा ताकिद देऊनही क्षेत्ररक्षकाने वा गोलंदाजाने खेळपट्टीवर धावण्याचा प्रयत्न केल्यास.
वरील सर्व स्थितींमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा दिल्या जातात. तर
काही अपवादात्मक परिस्थितीत गोलंदाजी करणाऱ्या संघालाही पंचकार बहाल केला जातो. विशेष
म्हणजे यासाठी अंपायरचे संकेत
मात्र निरनिराळे आहेत.
छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे अम्पायरने डाव्या हाताने संकेत केल्यास पाच धावा फलंदाजी
करणाऱ्या संघाला व उजव्या हाताने संकेत केल्यास ह्या धावा गोलंदाजी करणाऱ्या संघास
मिळतात! खाली दिलेल्या परिस्थितीत
गोलंदाजी करणाऱ्या संघाला पंचकार बहाल करण्याचा नियम आहे.
- फलंदाजाने क्षेत्ररक्षकांस अडथळा आणून चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न केल्यास.
- फलंदाजाने वारंवार सूचना देवुनही निष्कारण वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केल्यास.
- फलंदाजाने व फलंदाजी करणाऱ्या संघाने अम्पायरने इशारा दोनदा देवुनही खेळपट्टीवरुन धावण्याचा प्रयत्न केल्यास.
- गोलंदाजी करणाऱ्या संघाला दिलेल्या धावा ह्या त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये समाविष्ट केल्या जातात किंवा पुढे येणाऱ्या इनिंगमध्ये समाविष्ट केल्या जावू शकतात!
अगदी नजीकच्या काळात पंचकार दिली जाण्याची घटना ३ जानेवारी २०१० रोजी केप टाउन
येथे घडली होती. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध ग्राहम स्वानचा एक चेंडू इंग्लंडचा विकेटकिपर मॅट प्रायर याच्याकडून निसटून थेट त्याच्या मागच्या हेल्मेटवर
आदळला होता!
-
तुषार भगवान कुटे