Saturday, March 2, 2013

कपडे धुण्याची कला

आजकाल कला म्हटले की, गायनकला, चित्रकला, हस्तकला ह्या मर्यादित कलाच आठवतात. पण, प्रत्यक्षात कला ही विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नसतेच. प्रत्येक माणूस हा एक कलाकारच असतो. निरनिराळ्या क्षेत्रात वर्चस्व असणारे हे एक प्रकारचे कलाकारच असतात. त्यातीलच मला कपडे धुणे ही एक कलाच वाटते. ’तुमचे कपडे तुम्ही स्वत: धुता...?’ असे आश्चर्याने व प्रश्नार्थक रित्या विचारणारे मला अनेक जण भेटतात. अनेक जणांची आई किंवा बायको त्यांचे कपडे धुत असते! मला मात्र मागील दहा वर्षांपेक्षा जास्त कपडे धुण्याचा अनुभव आहे. पुण्यात सीओईपीला सन २००२ मध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून मी माझे कपडे धुत आलो आहे. सुट्टीच्या दिवशी माझे अनेक मित्र जेव्हा कपडे धुण्यासाठी घरी घेऊन जायचे तेव्हा मी मात्र आपली दोन कपड्यांची बॅग घेऊन घरी जायचो. फक्त कपडे धुण्यासाठी घरी घेऊन गेल्याचे मला आठवत नाही. किंबहुना आजवर कधीच कपड्यांची थप्पी मी घरी नेली नाही. माझी ही परंपरा आजवर चालूच आहे. फरक इतकाच की तेव्हा मी पुण्याला होतो आणि आता नाशिकला आहे! तसं पाहिलं तर मला प्रवास करताना जास्त ओझंही नेणं म्हणजे खूप कंटाळवाणं वाटतं. हेही एक कारण कदाचित कपडे घरी न नेण्यामागे असू शकेल!

सुरुवातीच्या काळात कपडे नक्की कसे धुवायचे? या प्रश्नाचे उत्तर प्रात्याक्षिकरित्या सापडण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली! आणि तीही मार्गदर्शकाविना! ह्या प्रोसेसमध्ये मला अनेक नवे अनुभव आले! अनुभव हाच माणसाचा खरा गुरू असतो, हेही समजले. कोणता साबण वापरायचा तसेच ब्रश कसा वापरायचा याचेही धडे मी स्वत:च गिरवले. त्यामुळे साबण व ब्रश या दोघांच्याही दर्जाच्या अंदाज येऊन गेला. निरमा, एरियल, सर्फ़ एक्सेल, टाईड असे अनेक निरनिराळे ब्रॅंड वापरून झाले. त्यातही निरनिराळे फ्लेव्हर्स वापरून पाहिले. मग, कोणता ब्रॅंड व कोणता फ्लेव्हर हा चांगला आहे, याची माहिती झाली. आज एखाद्या गृहिणीलाही मी याबाबत मार्गदर्शन करू शकतो. पूर्वी मी रफ ब्रशचा वापर करताना कपडे लवकर खराब व्हायचे नंतर मित्रांच्या मार्गदर्शनामुळे सॉफ्ट ब्रशचा वापर करायला लागलो व कपड्यांची ’लाईफ’ वाढली! उदाहरणच द्यायचे झाले तर सीओईपीमध्ये जो युनिफॉर्म वापरायचो त्याचे शर्ट आजही मी वापरतो आहे!!!

आणखी एक महत्वाची गोष्ट मला कळू लागली किंबहुना माझ्या कपडे वापरण्याच्या पद्धतीमध्येही फरक झाला. कपडे मला स्वत:ला धुवायला लागत असल्याने मी अगदी सांभाळून वापरू लागलो. शर्ट हे गळ्यापाशी व बाह्यांपाशी जास्त खराव होतात त्यामुळे हाच भाग अधिक खराब होऊ नये, याची खबरदारीही घेऊ लागलो. गांधीजींच्या आत्मचरित्रात त्यांनी स्वावलंबनाविषयी नमूद केले आहे. तेही स्वत:चे कपडेही स्वत:च धुवायचे. ही गोष्टही मला प्रेरणा देणारी ठरली. छोट्याछोट्या गोष्टींमध्ये किती गोष्टी शिकण्यासाठी असतात, याचा अनुभव या नव्या कलेने मात्र मला आला...

1 comment:

  1. अजुन लग्न नाही झालं वाटतं.

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com