नाशिकला शहराला नुकतेच दिल्लीत पर्यटनमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. ही आपल्या शहरासाठी निश्चितच गौरवाची बाब आहे. नाशिक म्हणजे पुरातन काळापासूनच समृद्ध शहर आहे. रामायण याच ठिकाणी घडले, सातवाहनांची समृद्धी याच शहराने पाहिली. तर मुघल साम्राज्य, मराठा स्वराज्य व पेशवाई अनुभवलेले शहर म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच मानले जाते. रामायणकालाने पावन झालेल्या या भूमीत भक्तांचा तर ओढा असतोच शिवाय देशातील सर्वाधिक डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग) याच जिल्ह्यात वसलेले आहेत. त्यामुळे गिरिप्रेमींसाठी नाशिक म्हणजे एक मेजवानीच ठरते. असे असले तरी नाशिकच्या पर्यटनाबाबत अजुनही फारशी माहिती बाहेरील पर्यटकांपर्यंत पोहोचलेली नाही. किंबहुना नाशिकवासियांनाच ह्या गोष्टींची माहिती नसल्याने नाशिकचे पर्यटनक्षेत्र म्हणावे तितके बहरताना दिसत नाही. पुरातन किल्ल्यांवर, मंदिरांवर केंद्रीय व राज्य पुरातत्व खात्यांनी त्यांचे फलक दिमाखाने लावलेले दिसतात, परंतु त्यांची निगा मात्र चांगली घेतली गेलेली दिसत नाही. नाशिकची जनता पर्यटनासाठी आपल्या जवळच असलेल्या परंतु, गुजरातमध्ये वसलेल्या सापुताराला मोठ्या प्रमाणात हजेरी लावते. पण, नाशिकच्या निसर्गसौंदर्याची त्यांना जास्त माहिती नाही. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील रायगड, रायगड, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, तोरणा, पन्हाळा या शिवकालीन किल्ल्यांचा नेहमी दौरा करणारी ट्रेकप्रेमी तरुणाई नाशिकच्या रामशेज, साल्हेर, मुल्हेर, अनकाई, त्र्यंबक, हरिहर यासारख्या किल्ल्यांवर फिरकत सुद्धा नाही. हे दुर्दैव मानावे लागेल. सातवाहनांचा दैदिप्यमान इतिहास दाखविणारी पांडवलेणी इथली तरुणाई फक्त एकांत मिळावा व जोडिदाराशी गप्पा मारता यावा म्हणुन फिरायला जाते. या ठिकाणी अनेक परदेशी अभ्यासक अभ्यासासाठी येतात. त्यांच्या मनात आपल्या नागरिकांबद्दल कोणती भावना तयार होत असेल, याचाही विचार करायला हवा.
’पिकतं तिथं विकत नाही’ असं म्हणतात, हे आपल्या शहराच्या बाबतीत १०० टक्के खरं आहे. नाशिकवासियांनी याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे.
’पिकतं तिथं विकत नाही’ असं म्हणतात, हे आपल्या शहराच्या बाबतीत १०० टक्के खरं आहे. नाशिकवासियांनी याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com