Friday, October 4, 2013

नारबाची वाडी: Review.

गंभीर विषयाला विनोदी फोडणी दिलेला चित्रपट म्हणजे... ’नारबाची वाडी’! टिपिकल कोकणात चित्रित झालेल्या चित्रपटाने सकस मराठी विनोदाची मेजवानी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांत मराठी चित्रपटातील विनोद अधिक सकस होत असल्याचे दिसते. याच पठडीतील हा चित्रपट होय. सर्वसामान्यपणे विनोदनिर्मिती करताना कृत्रिमतेची झालर घालावी लागते. परंतु, ’नारबाची वाडी’ हा नैसर्गिक विनोदी चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर व मनोज जोशी यांच्या अत्यंत प्रभावी भुमिका, मंगेश धाकडेचे प्रसंगानुरूप येणारे श्रवणीय संगीत, चित्रपटाचा वेग कुठेही न मंदावता त्याची सलगता जपणारे अदित्य सरपोतदारचे दिग्दर्शन व प्रामुख्याने गुरू ठाकूरची पटकथा, संवाद व गीते ही या चित्रपटाची बलस्थाने आहेत! दिलीप प्रभावळकर व मनोज जोशी यांना तोडच नाही. शिवाय निखिल रत्नपारखी, विकास कदम, किशोरी शहाणे, अतुल परचुरे यांनीही त्यांना उत्तम साथ दिलीय. ’देऊळ’ नंतर मंगेश धाकडेचे संगीत पुन्हा उत्तमच झालंय. चित्रपटाचे निम्मे यश हे गुरू ठाकूरमुळे आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याची ’नारू म्हणे...’ ही वचने फारच उत्तम, शिवाय ’गझाल खरी काय...’ व ’शबाय शबाय...’ ही दोन्ही गीते सुंदर जमून आलीयेत. 


नाशिकमध्ये या चित्रपटाचे दुसऱ्या आठवड्यात शोज वाढविण्यात आलेत! ४.५ रेटिंग्जचा हा चित्रपट ’Must watch' कॅटेगरीतला आहे!