Saturday, December 22, 2018

मशीन लर्निंग: नव्या युगाची नांदी

मानवी आकलनक्षमता संगणकाला प्रदान करण्याच्या संकल्पनेतून संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम झाला. यायचं पुढचा टप्पा म्हणजे 'मशीन लर्निंग' होय. शक्यता आणि संभाव्यता या दोहोंचाही वापर निर्णय प्रक्रियेत करून घेणारे शास्त्र म्हणजे मशीन लर्निंग होय. संगणक मानवासारखा विचार करू शकतो का? असेल तर त्याचे निर्णय अधिक अचूक करण्यासाठी व वेगवान करण्यासाठी मशीन लर्निंग चा उदय झालाय, हे निश्चितपणे सांगता येईल. 


विविध घटना, रचना, संकल्पना व माहिती यांमध्ये एक प्रकारचा सांख्यिकीय सिद्धांत दडलेला असतो. अर्थात, हे सर्व गणिताच्या नियमाप्रमाणे चालतात. परंतु, हे नियम सर्वांनाच लागू होतील असेही नाही. यात कोणता विषय, कोणाला, कश्या पद्धतीने लागू पडतो? याचे उत्तर मशीन लर्निंग देते.
निसर्ग ही मानवाला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. जर आपण म्हणतो की, सर्व काही निसर्ग नियमांप्रमाणे चालते तर संगणकही या नियमांचा उपयोग का नाही करू शकत? 'निसर्ग प्रेरित संगणन' ही संकल्पना यातूनच उदयास आली. निसर्गाने शिकवलेले धडे संगणकाने योग्य पद्धतीने गिरवले आहेत. किंबहुना संगणक हेच 'निसर्ग प्रेरित संगणनाचे' पहिले उत्पादन मानता येईल. निसर्ग आमचा गुरु... असं मानून अद्ययावत संगणकीय तंत्रज्ञानाची नवी वाटचाल चालू आहे. मशीन लर्निंग हा त्यातलाच एक भाग. यातील काही पद्धतींची तुलना अगदी आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाशी, चौमितीशी, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाशी व डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताशी केली तर वावगे ठरणार नाही. हे शास्त्र समजायला किचकट वाटत असले तरी, ती भविष्यातील नांदी ठरेल, इतपत क्षमता त्याच्यात आहे. अगदी भविष्यही सांगू  शकतील अश्या पद्धती मशीन लर्निंगच्या निर्णय प्रक्रियेत समाविष्ट आहेत.
संगणकाने मानवाला अधू केलं असं म्हटलं जातं. अर्थात, ते संगणक वापरणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. परंतु, नवनिर्मिती प्रक्रियेत व मानवी जीवनाच्या पुढील प्रवासात मानवाचाच मेंदू वापरून ते वेगाने वाटचाल करत आहे, असे दिसते. मागच्या लाखो वर्षांत जी क्रांती झाली, तीच काही शतकांमध्ये आजच्या काळात झाली. त्याहून वेगवान क्रांती पुढच्या दशकानुदशके चालेल ती या मशीन लर्निंग तंत्रज्ञानामुळेच, हे ध्यानात ठेवायला हवे.

Tuesday, December 11, 2018

आजोबा अन एम एच १५

त्या दिवशी बालगंधर्वच्या सिग्नलला लाल दिवा लागला म्हणू थांबलो होतो. तोच शेजारी एक आजोबा (अर्थातच पुणेकर) येऊन थांबले. माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.
'कशी.... चालवतच आणली का?' त्यांनी प्रश्न केला.
या प्रश्नाने त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर तयार झाले. 


'नाशिकहून गाडी चालवतात आणली का?' त्यांनी पुन्हा प्रश्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, आजोबांना माझ्या गाडीचा क्रमांक दिसला होता. पण, त्यांना मी गाडी पुण्यात कशी आणली, यात मात्र किती रस होता!

मी मात्र स्मितहास्य करून 'नाही' असे सहज सोप्पे उत्तर दिले. पण, मनातल्या मनात 'नाही... डोक्यावर घेऊन आलो', असे उत्तर आधीच तयार झाले होते. टिपिकल पुणेकरांसोबत त्यांचाच सारखे बोलायची सवय आता हळूहळू होऊ लागलीये. कदाचित त्या आजोबांना 'एम एच १५' हा क्रमांक नाशिकचा आहे... अन ते मला माहित आहे... असेही सुचवायचे असेल... म्हणून हा खटाटोप असावा. 'आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं' ... त्यातलाच हा भाग...!!!

Tuesday, December 4, 2018

राजगड हिंदीतून

गडांचा राजा अन राजांचा गड म्हणजे राजगड...
शिवरायांचा सर्वात अधिक सहवास लाभलेला किल्ला म्हणजे राजगड...
स्वराज्यातील प्रतापगडाचे युद्ध, लाल महालातील चढाई, सुरतेचा छापा, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह यासारख्या घटनांचा राजधानी म्हणून साक्षीदार असलेला दुर्ग म्हणजे राजगड...
या किल्ल्याविषयी बऱ्याच दिवसांपासून हिंदी लेख लिहावा असे बऱ्याच दिवसांपासून मनात होते. ही इच्छा मी एक जानेवारी २०१३ मध्ये पूर्ण केली. सदर लेख इथे http://tusharkute.blogspot.com/2013/03/blog-post_8071.html वाचता येईल. तदनंतर दोन वर्षांनी मी हाच लेख महाविद्यालयाच्या वार्षिक मासिकासाठी पाठविला होता. लेख दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंदी संपादकीय मंडळातून मला फोन आला. त्यांना वाटत होते की, सदर लेख मी 'रायगड' या किल्ल्यासाठी लिहिला असावा पण चुकून त्यात 'राजगड' असं नाव आलंय. आपल्यालाच लोकांना आपल्या किल्यांविषयी अथवा इतिहासाविषयी माहिती नाही, याचे मला अर्थातच फारसे विशेष वाटले नाही. लेख अखेर प्रसिद्ध झाला! त्यावेळी त्यावर मला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तुमच्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत यावेळीही आहे.
http://tbkute.blogspot.com/2015/11/hindi_17.html