Wednesday, April 3, 2019

तो प्रवास सुंदर होता!

कधीकधी खूप अनपेक्षित प्रवास घडत असतात. त्यातलाच हा एक प्रवास महाविद्यालयात शिकवत असताना एकदा वाडा आणि पालघरला काम आले होते. वाड्याला दोन आणि पालघरला एका महाविद्यालयात काम होते. जवळपास दोन दिवस मी नाशिकच्या बाहेर असणार होतो, त्यामुळे रश्मी नाशिकला एकटीच राहिली असती. म्हणून आम्ही दोघांनीही पालघरला जायचे ठरवले. बसचा पर्याय होताच परंतु त्यासाठी आदल्या दिवशी जावे लागले असते. शिवाय तिकडे फिरायची मारामार झाली असती. 


त्यामुळे, आम्ही स्वतःचीच एक्टिवा घेऊन जाण्याचे ठरवले. सगळ्यात पहिल्यांदा गुगल मॅप चा अभ्यास चालू झाला. कोणत्या रस्त्याने कसं जाता येईल, याचा प्लॅन तयार करत होतो. ठाणे जिल्ह्यातील वाडा, नाशिक पासून बरोबर 120 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे जाणाऱ्या बसचा तो नेहमीचा मार्ग नव्हता. परंतु गुगल मॅप हाच रस्ता सगळ्यात जवळचा दाखवत होता, त्यामुळे याच मार्गाचा अवलंब करायचे आम्ही ठरवले.
आमच्या सोबतचे विवेक पाटील सर, वाघमारे सर आणि सुरवाडे सर आधीच वाड्याला जाऊन पोहोचले होते. परंतु आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे निघायचा प्लान ठरवला. सकाळी आठ वाजता चे लेक्चर...  त्यामुळे पाच वाजताच नाशिकमधील निघू, असं ठरवलं होतं. सगळा प्लॅन ठरला आणि ठरल्याप्रमाणे आम्ही बरोबर पाच वाजता नाशिक मधून निघालो. माझं साधं एक्टिवाचं ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं. फक्त लर्निंग लायसन्सच्या जोरावर ती आम्ही रिस्क घेऊन चाललो होतो. नोव्हेंबर चा शेवटचा आठवडा आणि थंडीची सुरुवात झालेली. पहाटेची थंडी भयंकर जाणवायला लागली होती. पहाटे पाच-साडेपाच च्या दरम्यान कॉलेज रोड वरून सर्टिफिकेट घेतले आणि थेट हायवेला लागलो.
त्यावेळेस नाशिकच्या उड्डाणपुलावरून बाईकला परवानगी नव्हती. पण, त्यादिवशी पहिल्यांदाच बाईक उड्डाणपुलावर ती नेली. नाशिकच्या रस्त्यांवर इतक्या पहाटे चिटपाखरूही नव्हतं. उड्डाणपुलावरून पूर्ण नाशिक पहिल्यांदाच पाहत होतो. पुला वरचे दिवे लागलेले आणि त्यातून आमची गाडी सुसाट चालू पडली. कसारा घाट पार करायचा आणि उजवीकडे वळायचं एवढंच माझ्या ध्यानात होतं. मुंबई हायवे वरून इतक्या पहाटे गाडी चालवण  धोकादायकच...  परंतु हे तर त्यावेळेस अनुभवायचं होतं. रश्मी आणि मी दोघांनीही तोंडाला घट्ट बांधून टाकलेलं होतं. शिवाय दोघांच्या डोक्याला हेल्मेट ते वेगळेच...  मग काय सुसाट वेगाने एक्टिवा इगतपुरी कसारा च्या दिशेने पळवायला सुरुवात केली. विल्होळी, घोटी करत इगतपुरी चा टोल नाका पार केला. तोवर बऱ्यापैकी उजाडायला लागलेलं होतं. आमचा पहिला थांबा तोही चहासाठी...  अगदीच अर्ध्या तासाच्या अंतरावरती कसारा घाट राहिला होता घाटात पोहोचलो तोवर सूर्योदयाची सुरुवात झालेली...  मुंबई आणि नाशिकला जोडणारा तो वळणावळणांचा घाट पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होतो. सकाळी तशी गर्दी कमी होती. घाट उतरलो आणि गरम हवा चालू झाल्याचे वाटले...  जणूकाही मुंबईतच पोचले की काय असं वाटायला लागलं होतं. काही अंतरातच शहापूर येऊन गेलं. गाडी एवढ्या वेगाने चालत होतो की, कुठे वळण घ्यायचे याचे भानच राहिले नाही. उजवीकडे वळायचा रस्ता मागेच राहून गेला होता. गुगल मॅप वर शोधाशोध करून शेवटी आटगाव सापडलं. एका छोट्याशा खडीच्या रस्त्याने गाडी धावत आतमध्ये  नेली. एक गावाकडच्या आजीबाई येताना दिसत होत्या. त्यांनाच विचारलं वाड्याकडे जाणारा रस्ता कुठे आहे? रस्ता तर तोच होता...  परंतु त्यांनी आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि सांगितलं की रस्त्यात वानलं आहेत तुम्ही जाऊ शकता का? आता ही वानलं म्हणजे नक्की काय? हे मला माहीतच नव्हतं. नंतर समजलं की ती त्या जंगलाबद्दल बोलत होत्या. इथून पुढचा पूर्ण रस्ता हा जंगलाने व्यापलेला होता. एका छोट्याशा रस्त्याने मार्ग काढत काढत मुख्य डांबरी रस्त्याला लागलो. त्याच ठिकाणी तानसा अभयारण्याची मोठी कमान दिसत होती. पुढे जाणारा रस्ता आता अभयारण्याच्या जंगलातून जाणार होता. पालघर जिल्ह्यातलं पहिलं जंगल इथून सुरू झाल्याचे दिसले. छोटासा रस्ता आणि आजूबाजूला नुसती झाडीच झाडी...  तरी रस्ता बरा होता. त्याच्यामुळे गाडी वेगाने चालवता येत होती. जंगलात मध्ये कुठेतरी एखादी झोपडी वजा घर दिसायचं. रस्त्यावर रहदारी तर बिलकुलच नव्हती. अधूनमधून एखादी गाडी जायची. तानसा नदी आणि तानसा धरण यांचा उत्तम नजरा या रस्त्यावरती बघायला मिळाला. जंगल मात्र खूपच सुंदर होतं. गुळगुळीत रस्त्याचा नजारा मात्र पाच-सहा किलोमीटर मध्येच संपला. आता सुरु झाला होता खडकाळ रस्त्यांचा प्रवास...  जंगलं कमी झाली आणि मानवी वस्ती वाढू लागली होती. साडेसात ते आठ वाजले होते. शहापूर आणि वाड्याला जोडणारा हा रस्ता इतका खराब असेल याची कल्पनाच नव्हती. अशा भयंकर रस्त्यावरती गाडी पंचर झाली नाही म्हणजे मिळवलं, असा विचार मनात येऊन गेला. वाडा फक्त पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर ती राहिलं होतं. परंतु अशा खडतर रस्त्यावरती खडतर प्रवास करायला एक ते दीड तास आम्हाला लागले... हाडं खिळखिळी करणारा प्रवास बऱ्याच काळानंतर संपला. वाडा-भिवंडी रस्त्याला लागलो आणि हायसं वाटू लागलं होतं. इथून वाडा फक्त पाच किलोमीटर अंतरावर होतं. अशा जंगली खडतर प्रवासातून इतका गुळगुळीत रस्ता भेटेल, असं वाटलं नव्हतं. अखेर महाविद्यालयात पोहोचलो लेक्चर झालं आणि दुपारी हॉटेलवर निघालो. दुपारच्या आरामाने थोडासा थकवा कमी झाला होता. इथल्या हॉटेलमध्ये खेळलेला मेंढीकोट कायम लक्षात राहील, असाच होता वाड्यातल्या दोन्ही कॉलेजची काम झाल्यामुळे उद्या सकाळीच पालघरला निघायचं होतं...
वाडा ते पालघर अंतर जवळपास पन्नास किलोमीटर! रस्ता चांगला असल्यामुळे दीड तास पुरणार होते. परंतु आमच्या विवेक पाटील सरांनी आम्हाला घाबरवून सोडलं. रस्ता जंगलातून जाणार असल्यामुळे, तो खतरनाक असल्याचं सांगितलं होतं. पालघर-मनोर रस्त्यावरती कुठलीशी वाघोबा खिंड आहे, तिथे बिबट्या थेट बाईकस्वारांच्या अंगावर झेप घेतो, असे ते म्हणाले त्यातले एक दोन प्रसंगही त्यांनी सांगितले होते. आम्हाला थोडी भीती वाटली पण जोखीम घेण्याशिवाय पर्याय नव्हता. दुपारचे जेवण आटोपले आणि थेट निघालो अडीच वाजता पालघरच्या दिशेने...
रस्ता तसा चांगला होता...  गुळगुळीत आणि पूर्णपणे डांबरी...  आदिवासी जिल्हा आहे असे बिलकुल वाटत नव्हता. रस्ता इतका चांगला असेल याची खरोखर खात्री नव्हती. त्यामुळे एक तासाच्या आधीच मुंबई-अहमदाबाद हायवेवर मनोरजवळ पोहोचलो. मनोरमध्ये हायवेला ओलांडून पालघरच्या दिशेने जाणारा रस्ता होता.  सगळीकडे जंगलच जंगल, अन झाडीच झाडी...  इथून पुढे रहदारी थोडी वाढू लागली होती. याच रस्त्यावर ती पाटील सरांनी सांगितलेली वाघोबा खिंड होणार येणार होती. शिवाय आजूबाजूला जाताना  बरेच किल्ले ही नजरेत पडले. कदाचित माहिती नसतील या रस्त्यावरती! त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाघोबा खिंडी सारख्या अनेक खिंडी आहेत आणि वाघोबा खिंड आहे तो खूप सुंदर घाट आहे. पावसाळ्यातली अत्युच्च अनुभूती देणारा...  कदाचित या ठिकाणी पावसाळ्यात खूप नयनरम्य धबधबे वाहत असावेत. रस्त्यावरची रहदारी होतीस. त्यामुळे बिबट्या वगैरेचे टेन्शन घेतले नाही. वळणावळणाचे झाडीतून जाणारे रस्ते खूपच सुंदर होते. वाघोबा खिंड उतरलो आणि दूरवर पालघर शहराचे नयनरम्य दर्शन होऊ लागले. इथून पुढचा रस्ता थेट होता. जंगलाची तीव्रता कमी होत चालली होती अखेरीस पालघर मध्ये पोहोचलो. इथल्या हॉटेलची मात्र खूप मोठी गंमत सांगावीशी वाटते.  कोणत्या हॉटेलमध्ये कपल्सला खोली देण्यासाठी हॉटेल मालक तयार नव्हते. अगदी नवरा-बायको असून सुद्धा ही!!! अर्ध्या पाऊण तासात चार-पाच हॉटेल्स धुंडाळली, परंतु कोणीच रिस्क घ्यायला तयार नव्हते. शेवटी माहीम रोडला एक चांगले हॉटेल भेटले. तिथे सोय बऱ्यापैकी चांगली होती.  पालघर मधला हा आमचा पहिला दिवस! इथून केळवा बीच अगदी जवळ आहे. संध्याकाळीच केळवा बीच ला जायचे ठरवले होते. इतर कोणालाच जमले नाही त्यामुळे आम्ही दोघंच गाडी घेऊन केळव्याच्या दिशेने निघालो. पंधरा किलोमीटर अंतर असावे. रश्मीचा आणि माझा पहिलाच समुद्रकिनाऱ्यावर चा प्रवास! सूर्यास्त पहायला मिळाला, हे आमचे भाग्यच! परत निघताना अंधार झालेला होता. परतताना सुरवाडे सरांनी घेतलेली एक्टिवाची राईड मात्र इथून पुढे नेहमी लक्षात राहिली. त्यामुळे त्याबद्दल विशेष काही लिहित नाही. नंतरच्या गप्पाटप्पातच वेळ निघून गेला. त्याच दिवशी पाटील सरांच्या बहिणीला मुलगी झाल्याची बातमी आली होती. त्यामुळे पालघरमधल्या मुक्काम आमच्या कायम लक्षात राहिला.
पालघर पासून माहीम नावाचा बीच खूप जवळ आहे. सकाळी उठून माहीम बीचला जाण्याचे ठरवले होते. कोकणासारख्या छोट्या-छोट्या वाटा आणि नारळाच्या झाडांमधून वाट काढत आम्ही माहीम बीच ला पोहोचलो. अगदी कोकणच ते!  याच बीचवर पहिल्यांदा एक्टिवा घेऊन गेलो होतो. गाडीच्या टायरला पहिल्यांदा समुद्राचे पाणी लागलं. आम्ही पाहिलेला हा दुसरा समुद्रकिनारा! परंतु सकाळच्या त्या अनुभवाने एक गोष्ट मात्र पक्की ध्यानात राहिली की सकाळी कोणत्याच बीच वरती जाऊ नये!!!
दुपारनंतर पालघरच्या एका महाविद्यालयात जाऊन आलो. दोन अडीच पर्यंत काम संपले होते. आता थेट निघायचं होतं नाशिकला! परत गुगल मॅप उघडला आणि नाशिकच्या अंतर बघितले. ते होते ... तब्बल 165 किलोमीटर्स!!! शिवाय त्रंबकेश्वर पर्यंतचा सगळा रस्ता हा जंगलाने व्यापलेला होता.  ठरवले इतकेच की अंधार पडायच्या आधी या जंगलातून बाहेर पडायचे. रस्त्यात लागणारे मनोर विक्रमगड मोखाडा जव्हार सगळी जंगलातली शहर होती. बरोबर अडीच वाजता आमचा प्रवास चालू झाला आणि किलोमीटर्सचं  काउंट-डाउनही!!!
वाघोबा खिंडीशी परत एकदा सामना झाला.  तेच जंगलातले रस्ते मनोर पर्यंत पूर्ण पार करत आलो. अहमदाबाद हायवे वरती रहदारी तर होतीच. डावीकडून पुढे गेल्यानंतर विक्रमगडला जाणारा रस्ता होता. तो थेट नाशिक कडे जाणार होता. येथून विक्रमगडचे अंतर होते ...  जवळपास वीस किलोमीटर! विक्रमगड जव्हार मोखाडा तीनही जंगलव्याप्त तालुके आहेत. आतले रस्ते कसे असतील, याची खरोखर कल्पना नव्हती.  विक्रमगडच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि पुन्हा जंगलांची गाठ पडायला सुरुवात झाली. रस्ता मात्र दोन पदरी होता.  परंतु, रहदारी बिलकुलच नसल्यामुळे पूर्ण रिकामाच...  जिथवर नजर जाईल तिथवर जंगल जंगल...  जंगली श्वापदांचा वावर होता की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही.
मानवी बिल्डिंगच्या जंगलापासून दूर असणारं हे जंगल खूपच सुंदर होतं. ते कधीकधी भयावह तर कधीकधी अतिशय सुंदर भासायचं. विक्रमगड च्या अलीकडे एका चिंचघर नावाच्या गावापाशी आम्ही पहिला थांबा घेतला. पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना शांत करण्यासाठी काहीतरी देण्याची गरज होती त्यामुळेच हा थांबा... !!! निघाल्यानंतर अगदी दहा मिनिटातच विक्रमगड गाव आले. तालुक्याचे ठिकाण वाटेल इतपतही त्या गावाची व्याप्ती नव्हती. असं कुठेतरी वाचलं होतं, जव्हारच्या विक्रम राजाने या गावाची स्थापना केली आहे, त्यामुळेच गावाचं नाव विक्रमगड पडलेलं आहे. आता विक्रमगड जव्हार रस्त्यावरची गर्दी कमी होत चालली होती आणि जंगलांची गर्दी वाढत चालली होती. पालघर जिल्ह्यातला सगळ्यात जास्त झाडीचा प्रदेश हाच असावा. पावसाळ्यात किती भयावह परिस्थिती असेल याचा आम्हाला अंदाज येत होता. वळणावळणाचे निर्मनुष्य रस्ते अन कधी डोंगरावरती वळण घेणारे रस्ते पार करत आमचा प्रवास हळूहळू सुरू होता. अचानक एका घाट रस्त्यावरती दोन वाटा दिसायला लागल्या. आता नेमकी जावे कुठे हा प्रश्न होता परंतु यापूर्वी दोनदा डहाणू ला जाण्याचा अनुभव कामी आला. डावीकडचा रस्ता डहाणू ला जातोय आणि उजवीकडचा जव्हारला जातोय हे, माझ्या ध्यानात आले होते. शिवाय या ठिकाणी कोणती पाटी नव्हती आणि कोणी सांगायला माणूसही नव्हता. त्यामुळेच स्वतःच्या ज्ञानावर भरोसा ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही. काही वेळाने रस्ता बरोबर असल्याचे आमच्या ध्यानात आले. घाट रस्ता आता सपाटीच्या दिशेने चाललेला होता. थोड्याच वेळात जव्हार गाव आले. याच गावाला महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर म्हणतात. खरोखरच एका सुंदर नयनरम्य भागात हे गाव वसलेले दिसते. एक टुमदार , डोंगराळ गाव जंगली वस्तीत कसे दिसेल, तसेच जव्हार आहे. पावसाळ्यात इथली सुंदरता खरोखर मनमोहक ठरावी, अशीच असावी. जव्हार मधून बाहेर आल्यावर ती आमचा दुसरा थांबा झाला. तोवर पाच वाजत आले होते आणि सूर्य मावळतीच्या दिशेने झुकत होता. येथून नाशिकचे अंतर होते 70 किलोमीटर!!! आता गाडी थेट नाशिकमध्ये जाऊन थांबावायची, हे मनाशी ठरवले आणि सुरू पडलो. स्पर्धा अंधाराशी करायची ठरवलं होतं. पुन्हा तेच वळणावळणाचे रस्ते आणि घनदाट जंगलातून जाणाऱ्या वाटा. हळूहळू जंगलांची तीव्रताही कमी होत चालली होती. परंतु दूरदूरवर मनुष्यवस्ती चा मागमूसही दिसायचा नाही. काहीच वेळात मोखाडा मागे पडले. अंधाराशी स्पर्धा आणखी तीव्र होऊ लागली होती. वळणावळणाचा वेग आणि गाडीवरचे नियंत्रण याची कसरत मात्र चांगली झाली. सूर्य क्षितिजावरून खाली जायला लागला आणि तोरंगणचा घाट लागला. नाशिक जिल्हा आणि पालघर जिल्ह्याला जोडणारा हा घाट होय. घाट चढून वरती आलो तर डाव्या बाजूला वाघेरा किल्ला दिसू लागला. तेव्हाच नाशिकमध्ये दाखल झाल्याची चाहूल लागली. जंगलं तर होतीच परंतु आता ती सपाटीवर होती. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पाट्या दिसायला लागल्या होत्या. रस्ता चौपदरी झाला आणि सूर्य मावळतीला गेलेला होता. त्रंबकेश्वरचा झगमगाट दिसायला लागला आणि हायसे वाटले. इथून नाशिक फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. शिवाय रस्ताही चौपदरी, नेहमीचाच आणि ओळखीचा! अंधारासोबतची रेस आणि जंगला बरोबर ची रेस आम्ही जिंकली होती. 165 किलोमीटरचे अंतर पावणे चार तासात पूर्ण झाले! तेही एक्टिवावर! मागे वळून पाहिले तर लक्षात आले की पालघर जिल्ह्याची एक परिक्रमा पूर्ण झाली होती!
खरोखर पूर्णतः लक्षात राहील असा प्रवास कदाचित पुन्हा होणे नाही... !!!