Wednesday, October 30, 2019

अवघे जग बदलून टाकणारे महान द्रष्टे

"टॉप व्हिजनरीज हू चेंज्ड द वर्ल्ड" या जॉर्ज इलियन लिखित पुस्तकाचा "अवघे जग बदलून टाकणारे महान द्रष्टे" हा अनुवाद होय. तंत्रज्ञानाच्या विश्वाचे राजे असणारे स्टीव जॉब्स, जॅक मा, बिल गेट्स, एलोन मस्क व मार्क झुकेरबर्ग यांचे हे छोटेखानी प्रेरणादायी चरित्र आहे. कोणतीही संकल्पना मनात येणे, ती प्रत्यक्षात उतरवणे व व्यावसायिकरित्या यशस्वी करून दाखवणे, याची गोष्ट या पुस्तकातून वाचायला मिळते. वरील सर्व तंत्रज्ञ व व्यावसायिकांनी आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय काय मेहनत घेतली? अपयशाच्या कोणत्या पायऱ्या पार केल्या? व आज ते इतक्या उंचीवर पोहोचूनही सामाजिक भावनेने कशा प्रकारे कार्य करत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतात. शिवाय अन्य देशांची विचारसंस्कृती व भारतीय विचारपद्धती यातील फरकही प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे सांगायचं असं की, यातील एक जण जरी भारतीय कुटुंबात व भारतात जन्माला आला असता तर कदाचित तो या स्थानी असला नसता. आपल्या देशात अनेक धडपडे तरुण आहेत. परंतु, त्यांना प्रोत्साहन देणारे वातावरण इथे नाहीये. ते कसे असावे? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकातून मिळू शकेल. 


स्टीव जॉब्स वगळता इतर चौघे आजही अविरतपणे कार्यरत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात विविध प्रकारची सकारात्मक व नकारात्मक वळणे आली. त्यांचा योग्य रीतीने सामना केला गेला. त्यांची एक विचारसरणी तयार होत गेली. हेच त्यांच्या यशस्वीतेचे मुख्य कारण आहे. अगदी सारांश सांगायचा तर "थ्री इडियट्स" या हिंदी चित्रपटात फुनसुख वांगडू सांगतात तसं "सक्सेस के पीछे मत भगो, एक्सलन्स का पीछा करो. सक्सेस झक मार के तुम्हारे पिछे आयेगी".

डिंभक

डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्यानंतर मी वाचलेले डॉ. संजय ढोले हे चौथे विज्ञान कथा लेखक आणि त्यांचा "डिंभक" हा विज्ञान कथासंग्रह! आपल्या आवडत्या विषयात वाचन करण्याची मजाच काही और असते. 'मनोरंजनाबरोबरच कुतूहल जागृत करणाऱ्या लक्षवेधक विज्ञानकथा' या सारांशाने मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. विज्ञानाला अनुसरून लिहीलेल्या जवळपास सर्वच कथांची भट्टी छान जमून आलीये.


पुस्तकाच्या मलपृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे कथांचा सारांश असा...
नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग...  मृत माणसाच्या मेंदूचे रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे...  भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर...  शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ...  परग्रहावरील डिंभक... पिंजकामुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा...  क्लोननिर्मिती...  गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्युमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात...  ग्राफीनच्या कणांवरचे संशोधन...  विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यापर्यंत पोहोचणारा शास्त्रज्ञ...  एक विचित्र कीटक. अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग व दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ. त्यातून घडणारे मानवी मनाचं दर्शन. वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह...
थोडसं वेगळं सांगायचं तर बऱ्याच कथांमध्ये ध्येयवेडे शास्त्रज्ञ व त्यांची प्रयोगशाळा अशी कथा रचना तयार झाली आहे. त्यामुळे कथेचा मूळ गाभा जरी वेगळा असला तरी त्यात सारखेपणा जाणवत राहतो. लेखकाने विज्ञानाच्या सर्व अंगांचा विचार केल्याचेही दिसते. एकंदरितच विज्ञान प्रेमींनी हे पुस्तक वाचावे असेच आहे.

गोष्ट एका परीक्षेची

इंजीनियरिंग झाल्यानंतर वयाच्या 22 व्या वर्षीच नोकरीला लागलो. नाशिकच्या के. के. वाघ पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरर म्हणून मला नोकरी मिळाली होती. पहिल्याच वर्षी परफॉर्मन्स चांगला राहिला. लागलीच दुसऱ्या वर्षी मला एक्स्टर्णल एक्झामिनर म्हणून जाण्याची संधीही मिळाली पॉलिटेक्निकच्या समर एक्झाम चालू होणार होत्या मी त्यावेळी 'कॉम्प्युटर आर्किटेक्चर अँड मेंटेनन्स' हा विषय शिकवायचो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या या विषयाला फक्त ओरल एक्झाम अर्थात तोंडी परीक्षा होती. त्याच्या आधीच्या सेमिस्टरला मात्र मी चांदवडच्या पॉलिटेक्निकमध्ये एक्स्टर्णल एक्झामिनर म्हणून जाऊन आलेलो होतो. परंतु ती फक्त ऑनलाईन एक्झाम होती. त्यामुळे एक्झामिनरचा रोल फक्त सुपरवायझर म्हणूनच होता. आता मुलांना थेट प्रश्न विचारण्याची परीक्षा मला पहिल्यांदाच मिळाली होती आणि कॉलेज होतं... महावीर पॉलीटेक्निक! शिक्षक होतो तरी देहयष्टी शिक्षका सारखी नव्हती. त्यावेळी मी कोणत्याच अँगलने पॉलिटेक्निकचा मास्तर वाटत नव्हतो. या गोष्टीचे कधी फायदे व्हायचे तर कधी तोटे. केवळ 55 किलो वजन आणि पाच फूट 10 इंच उंची असलेल्या माणसाला कोण शिक्षक म्हणेल? सडपातळ बांधा आणि आत गेलेले गाल हीच माझ्या देहयष्टीची ओळख! त्यामुळे त्या काळात बरेच किस्से घडले. एकदा तर एका इंडस्ट्रियल व्हिजिटला मला कोणी शिक्षक आहे, अशी ओळख देईनाच. जेव्हा विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले तेव्हा त्यांना समजले की, मी शिक्षक आहे असाच एक किस्सा त्या वर्षीच्या परीक्षांमध्ये घडला होता.
पॉलिटेक्निकला नुकतेच 'कॅरिऑन' लागू झाले होते कॅरीऑन चा अर्थ असा की, कधीही नापास झालेला मुलगा पुढच्या वर्गात ढकलला जात असे. शिवाय इयरली पॅटर्न मधून सेमिस्टर पॅटर्न आल्यामुळे तंत्रशिक्षण मंडळाला सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे अनिवार्य झाले होते. अर्थात यामुळे वर्षानुवर्षे डिप्लोमा करत असलेली मुले एकाच वर्गात आली होती. यातले कितीतरी मुले माझ्या पेक्षा वयाने मोठी होती आणि शरीरानेही!


यंदा पहिल्यांदाच ओरल एक्झाम आल्यामुळे मीही भलताच खूष होतो आणि विद्यार्थ्यांची चांगलीच ओरल घेऊ असाही, विचार मनात पक्का केला होता. त्याकाळात परीक्षेच्यावेळी माझ्यातला आदर्श शिक्षक जागा होत असे! मला पहिलीच परीक्षा आली ती महावीर पॉलिटेक्निकला.
हे महाविद्यालय नाशिकच्या दिंडोरी रोड वरील म्हसरूळ गावापासून आत मध्ये वरवंडी गावच्या रस्त्यावर आहे. या रस्त्याने नाशिकची सिटीबस दिवसातून एक ते दोन वेळा जायची. शिवाय गावाकडचा भाग असल्यामुळे रिक्षांची संख्या अत्यंत कमी होती. कॉलेजची बस मात्र नियमित जायची. तिथल्या इंटरनल एक्झामिनरने मला त्यांच्या बसचे वेळापत्रक दिले होते. तरीही त्या दिवशी माझी बस चुकली. मग मी अमृतधाम ते पंचवटी आणि पंचवटी ते म्हसरूळ असा रिक्षाने प्रवास केला. परीक्षेची वेळ होत आली होती आणि मलाही जायची घाई होती. म्हसरूळच्या वरवंडी फाट्यावर उतरलो. तर तिथे एकही रिक्षा उभी असलेली दिसली नाही. अर्थात मला फक्त शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध होता. थेट परीक्षा करणे मात्र परवडणारे नव्हते. त्यामुळे लिफ़्ट मागण्याचा एक सहज सोपा पर्याय माझ्यापुढे होता. त्याचीच वाट बघत मी वरवंडी फाट्यावर उभा राहिलो. परंतु या रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी फार नव्हती. जाणारे बाइकस्वार फारफार तर म्हसरूळ गावात घुटमळत. आता काय करावे? हा प्रश्न उभा ठाकलेला होताच.
फाट्यावर उन्हात उभे असताना एका बाईकस्वाराने पाहिले व तो थोडं पुढे अंतरावर जाऊन थांबला. त्याने मागे वळून बघितले आणि मला हाक मारली. डोळ्यावर टिपिकल चष्मा अडकवलेला, छोटे केस आणि माझी बारीक देहयष्टी घेऊन मी त्याच्याकडे गेलो.
'कॉलेजला जायचं का?' तो म्हणाला.
त्याच्या या प्रश्नावर मनात आनंदी होऊन मी होकारार्थी मान डोलावली. अखेर काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर मला लिफ्ट मिळाली होती. त्यामुळे हायसे वाटले. त्या दहा मिनिटांच्या प्रवासात आमच्या थोड्या गप्पा झाल्या.
'परीक्षेला चालला काय?' त्याने विचारले.
त्याच्याच प्रश्नावर मला समजले की, त्याला वाटतंय मी विद्यार्थी आहे. मग मनातल्या मनात म्हटलं, बघूया काय होतंय ते आणि होकारार्थी मान डोलावली.
मग आमचे प्रश्न-प्रश्न आणि उत्तरे-उत्तरे चालू झाली.
'कोणत्या क्लासमध्ये आहेस' त्याने विचारले.
'टीवाय आयटी'.
'मी पण त्याच वर्गात आहे'.
'कॅमच्या (कम्प्युटर आर्किटेक्चर अँड मेंटेनन्स) ओरलला चाललाय का?'.
'हो' मी म्हटले.
त्यालाही आपला जोडीदार मिळाल्याचे समाधान वाटले. अर्थात कॅरीऑन मुळे अनेक उडाणटप्पू मुले एकाच वर्गात आली होती. त्यातले बरेच जण कॉलेज अटेंड करत नव्हते. आमचा हा स्वारही त्याच कॅटेगरीतला! त्यामुळे माझ्या उत्तरावर त्याचा लगेच विश्वास बसला.
'तू कोणत्या बॅचचा?' त्याने पुढे विचारले.
'2004'
'हो का? मी 2003 च्या बॅचचा...'
'हे एक्स्टर्नल लई खडूस असतात का रे?'
'हो... लै खडूस असतात. मी तीन वेळा नापास झालोय'
'मी तर काहीच प्रिपरेशन केला नाही भाऊ!'
'अरे मी तरी कुठे केलीये? मी असंच चाललोय.'
'जाऊदे पास तर पास नापास तर नापास!'
असं म्हणत त्याने एक्स्टर्णल एक्झामिनरला दोन-चार शिव्या दिल्या आणि पुढचा संवाद सुरू ठेवला.
कॉलेजच्या गेट पाशी गेल्यावर मात्र माझी गोची झाली. त्याने तर त्याचे आयकार्ड दाखवले. पण माझ्याकडे तर तेही नव्हते आणि वॉचमनला एक्स्टर्णल एक्झामिनर आहे, असे सांगावे तर माझाच भांडाफोड झाला असता. वॉचमन मात्र कार्ड वरती अडून बसला होता.
काय भाऊ तुला परीक्षेला आयकार्ड लागतं हे पण माहीत नाही का? असं सांगून तो लगबगीने आत मध्ये निघून गेला. मग मी लगेचच इंटर्णल एक्झामिनर ला फोन लावला आणि वॉचमनशी बोलायला सांगितले. मग काय वॉचमनने तातडीने आत सोडून दिले आणि अखेरीस आमची परीक्षा चालू झाली. मी आणि इंटरनल एक्झामिनर टेबलसमोर बसलेलो आणि एक एक विद्यार्थी आत यायला सुरुवात झाली. आणि पाहतो तर काय, आमचा बाईकस्वार पहिल्या क्रमांकावर होता!!! खूप जुन्या बॅचचा असल्यामुळे त्याचा पहिला क्रमांक लागला होता. मला समोर एक्झामिनर म्हणून बघितल्यावर तर त्याला धक्काच बसला. काय करावं काय नाही, या प्रश्नाचे उत्तरही त्याच्याकडे नव्हते. त्याला हेही माहीत होते की, त्यांनी काहीच अभ्यास केलेला नाहीये, हे मला माहितीये! शिवाय माझ्या नावाने त्याने दोन-चार शिव्या हासडल्या होत्या. बिचाऱ्याची अवस्था मात्र मला बघवली नाही. कदाचित त्याचा मेंदू हँग झालेला असावा! ओरल ला दोन-चार सोपे प्रश्न विचारले आणि त्याला सोडून दिले. परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर बिचाऱ्याला आले नाही. परीक्षा संपल्यावर त्या विद्यार्थ्याला मी परत कधीच पाहिले नाही. परंतु एका अनपेक्षित प्रसंगाची मजा मात्र तो घेऊन गेला. हा किस्सा जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचो तेव्हा त्यांचा शेवटचा एकच प्रश्न असायचा, तो पास झाला की नापास? मग मी हसून उत्तर द्यायचो, 'मी माझ्या दहा मिनिटांच्या मित्राला नापास थोडी करणार होतो?'

Tuesday, October 22, 2019

आपल्या नद्या आणि आपण

मागच्या आठवड्यात जपानमध्ये मोठा पूर आला होता व पुराचे पाणी शहराच्या विविध भागांमध्ये शिरले होते. याच पुरातील पाण्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यात असे लिहिले होते की, जपानमधले पुराचे पाणीही भारतातील नद्यांच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आहे! एकूणच जपानी जीवनशैली पाहता ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. आजची एक आदर्शवत संस्कृती जपानने तयार केली आहे. व ती सर्वांनी अनुकरण करण्यासारखीच आहे. 


भारतीय नद्यांचा विचार केल्यास त्या जगातील सर्वात गलिच्छ नद्या आहेत, हे वास्तव आहे. याचं फारसं विश्लेषण करण्यापेक्षा पुन्हा एकदा व्हायरल झालेला खालील फोटो पहा. 


चित्रांवर लिहिलेल्या वाक्यावरून भारतातील नद्या सामान्य नागरिकच का घाण करतो? याचे उत्तर मिळेल. नदीला आपण देवी मानतो व तिचं दैवत्वच तिला गलिच्छ स्वरूप प्राप्त करून देत आहे, असं दिसतं. सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत आपलं मागासलेपण पावलोपावली जाणवत असतं. शिवाय आपली सदसद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून केवळ स्वार्थापोटी अनेक गोष्टींचा आपण विचार करतो. उदाहरणार्थ, प्लास्टिकचा वापर... भारत हा सर्वात मोठा प्लास्टिक वापरकर्ता देश आहे. भारतात वापरले गेलेले प्लास्टिक ( मुख्यत्वे सिंगल युज प्लास्टिक ) हे आपल्याला नदीपात्रात सापडेल, मुक्या जनावरांच्या पोटात सापडेल किंवा तुंबलेल्या गटार मध्येही सापडेल.
भारतातील व्हायरल झालेला आणखी एक फोटो पहा. 


हा कुठला आहे, हे नक्की माहीत नाही. परंतु, आपल्या प्रत्येक शहरातल्या गटारातली ही परिस्थिती आहे. आपण या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून किती कर्तव्य पार पाडतो? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. खालचा फोटो पहा. यावरून अजून एक गोष्ट देण्यात येते की, जैविकरित्या विघटन न होणारे प्लास्टिक देवता मानलेल्या हजारो गायांच्या पोटात आज ठाण मांडून बसलेले आहे. अशी परिस्थिती आणखी किती वर्षे राहणार आहे? 

चार-पाच वर्षांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका फोटोबद्दल आपण बोलूयात. हा फोटो ऑस्ट्रेलियातील आहे. 


भूमिगत गटारे व सांडपाण्याच्या पाइपमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यातील स्थायू घाण अडवण्यासाठी केलेली ही उपाय योजना! हा एक उत्तम पर्याय आहे. याने काही प्रमाणात नदीतील घाण कमी होऊ शकते. परंतु, आपल्याकडे अशा उपायांसाठी राजकीय इच्छाशक्ती नाही, हे मान्य करावे लागेल. तरीही जनमताचा रेटा असेल तर प्रशासनही सुधारेल. असे मानायला हरकत नाही. शेवटी काय, आपण सुधरा, देशही सुधारेल... इतकेच सांगू शकतो.

Monday, October 21, 2019

मराठीचे जगातील स्थान

विकिपीडियाच्या ह्या लिंक वरून काढलेली खालील आकडेवारी पहा. 'एथोनॉलॉग' या जगप्रसिद्ध भाषांची माहिती ठेवणाऱ्या कॅटलॉगने सदर तालिका सन 2019 मध्ये प्रसिद्ध केली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपली मातृभाषा 'मराठी' या तालिकेत जगात दहाव्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी प्रथम भाषा बोलणार्‍या लोकांची आहे. यात एकाच भाषेचे विविध प्रकार वगळण्यात आलेले आहेत. भारतीय भाषांचा विचार केल्यास देशात मराठी ही हिंदी व बंगाली नंतर तिसऱ्या तर जगात चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या दहामध्ये मराठी ही अशी एकमेव भाषा आहे, जी फक्त एकाच देशात बोलली जाते! अशी मराठी भाषा बोलत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो!


Monday, October 14, 2019

मराठीत बोला आणि लिहा सहजपणे...

इंटरनेटवर आज मोठ्या प्रमाणात मराठी भाषेतून लेख कविता ब्लॉग्स व ई-बुक उपलब्ध झालेले दिसतात. हा सारा सृजनशील पसारा वेगाने वाढत चाललाय. मराठी भाषेसाठी इंटरनेट व त्यावर लिहिली जाणारी मराठी आज एक प्रकारे टेक्नो-संजीवनीच काम करीत आहे. ज्यांना आपल्या भाषेत व्यक्त व्हायचंय, त्यांच्यासाठी अनेक मुक्त व्यासपीठ इंटरनेट मी उपलब्ध करून दिलीत.
आज वाचकांची संख्या लेखकांपेक्षा जास्त असली तरी प्रत्येक वाचतात एक सुप्त लेखक घडल्याचा दिसतो. अनेक जणांना लिहायचं असतं. इंटरनेटद्वारे व्यक्त व्हायचं असतं, परंतु लिहायचं कसं? हा पहिला प्रश्न पडतो. फॉन्ट कोणता? सॉफ्टवेअर कोणते? कसे टाईप करायचं? असे अनेक प्रश्न मराठी लेखकांना पडतात. युनिकोड व नॅचरल लँगवेज प्रोसेसिंग द्वारे मराठी भाषा आता सहजपणे संगणकात वापरता येऊ लागलीये. ही सर्व संगणक तंत्रज्ञानाची किमया आहे. संगणकात मराठीसाठी कोणताही फॉन्ट वापरला जात नाही. युनिकोडच्या साह्याने इंग्रजी सारखीच अन्य कोणतीही भाषा आपण संगणकात सहजपणे वापरू शकतो. त्यासाठी विविध प्रकारचे एडिटर्सही उपलब्ध झाली आहेत. यातीलच बहुतांश एडिटर्स हे गुगल ट्रान्सलिटरेशन ची मदत घेतात. याद्वारे कोणीही सहजपणे मराठीत टाईप करू शकतो. अनेकांना तर टाईप करण्याचा व लिहायचाही कंटाळा असतो. त्यासाठी ही विविध सुविधा अँड्रॉइड ऍपच्या साह्याने उपलब्ध झालेल्या आहेत. खाली दिलेल्या लिंक वर असेच एक सुलभ ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. गुगलचे 'स्पीच टू टेक्स्ट' तंत्रज्ञान वापरून हे ऍप मराठीत बोललेली माहिती टेक्स्ट मध्ये अर्थात संगणकात मराठी भाषेत आपोआप टाईप करून दाखविते. विशेष म्हणजे यात आपले बोलणे मराठी टाईप करून अन्य भाषेत भाषांतरित करण्याचीही सुविधा आहे! जेव्हा तुम्ही सदर ॲप इन्स्टॉल करून उघडाल तुम्हाला वरच्या बाजूला पाच आयकॉन्स दिसतील. त्यातील मधल्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला फक्त आपल्या भाषेत स्पष्टपणे बोलायचं आहे. जसजसे तुम्ही बोलत जाल तसे या ॲपच्या एडिटरवर टाईप होत जाते. विशेष म्हणजे सदर ॲपचा वेग खूपच चांगला असून असून त्याची अचूकता 99% मानायला काहीच हरकत नाही. एडिटरमध्ये टाईप झालेले मराठी वाक्य तुम्ही दुसरीकडे कुठेही थेट कॉपी व शेअरही करू शकता. ॲप वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एक की, तुमचं मोबाईल इंटरनेटला जोडलेला असायला हवा.
असं हे मराठीतले एक सुंदर ऍप आहे. चला तर मग ते वापरूया व इंटरनेटवरची मराठी समृद्ध करूयात. 
 
 
 

Sunday, October 13, 2019

पोलिसांची प्रतिमा

पोलीस व प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित एक वेगळ्याच प्रकारचा विषय असतो. कधी ना कधी ह्या विषयाची आपल्याबरोबर गाठ पडत असते. परंतु, ही गाठ सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकते कडे जास्त झुकलेली दिसते. केवळ माझाच नाही तर अनेकांचा अनुभव कदाचित असाच असावा.
साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. पुणे ते नाशिक रस्त्यावर आंबेगाव तालुक्यात कळंब नावाचे एक खेडे आहे. या गावातून पुणे-नाशिक महामार्ग अतिशय अरुंद भागातून जातो. घोड नदीच्या काठावर वसलेल्या या गावात नदीवरचा एक अरुंद पूलही आहे. त्यादिवशी नाशिकला जाताना या पुलावर आमचा अपघात झाला होता. एका सेलेरियो कारने s-cross कारला मागून धडक दिली. त्यामुळे त्या कारने आमच्या कारला धडक दिली व आमची कार पुढच्या एसयूव्ही कारला धडकली! अशा तऱ्हेने एकाच वेळी चार गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. आमच्यासह सर्वजण सर्वात शेवटच्या कार ड्रायवरवर भयंकर भडकले होते. त्याला फक्त मारायचे बाकी ठेवले होते. त्यातच आमच्या मागच्या गाडीच्या ड्रायव्हरने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. प्रत्यक्षात त्याने तसे केले नसते. परंतु जवळच्या पोलिस चौकीला कुठून तरी वास लागलाच! थोड्याच वेळात दोन कॉन्स्टेबल पंचनामा करण्यासाठी दाखल झाले. हे सर्व अपघात प्रकरण पोलिसात लवकरच नोंद होणार, अशी परिस्थिती होती. परंतु याबाबतीत आजूबाजूच्या लोकांनी आमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे असेच म्हणणे होते की, पोलिसात गेल्यावर त्यांना चार-पाच हजार रुपये द्यावे लागतील. विशेष म्हणजे अशा मताचे जवळपास सर्वच लोक तिथे होते! सर्वांना हेच वाटत होते की, तुम्ही आपापसात मिटवून घ्या. कशाला पोलिसांची 'झंझट'? त्यावेळी एकंदरीत पोलिसांची जनमानसात काय प्रतिमा असेल, हे ध्यानात आले आणि हा विषय पोलिसात मात्र गेला नाही.
वरील घटनेनंतर साधारणत: चार महिन्यांनी भोसरीच्या स्पाईन रोड सिग्नलपाशी मला असाच अनुभव आला. एक दारू पिऊन चाललेला बेवडा माझ्या गाडीला मागून येऊन घासून गेला. अर्थात त्यामुळे त्याच्यात गाडीचे जास्त नुकसान झाले होते. तरीही बेवडे साहेब गाडीतून उतरून तावातावाने भांडायला आले. त्यावेळेसही सदर प्रकरण पोलिसात जाण्याच्या वाटेवर होते. परंतु पुन्हा सर्वांच्या म्हणण्यानुसार पोलिसात जाणे म्हणजे पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालवणे होय. पोलीस खायलाच टपलेले असतात, असे अनेकांचे म्हणणे होते आणि हेही प्रकरण इथेच थांबले.


फक्त याच दोन नाही तर अशा अनेक त्रयस्थ ठिकाणी अशाच प्रकारचा अनुभव येतो. यातून कोणता बोध घ्यावा, तेच समजत नाही. सिंघम आणि दबंग हे केवळ चित्रपटात शिट्ट्या मिळवण्यासाठी असतात, असेच यातून एकंदरीत दिसते. केवळ पोलिसच नाही तर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना बद्दल अशाच प्रकारचे अनुभव आपल्या नागरिकांकडे आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना त्याची सवय झालीये! अनेक ठिकाणी तर ही संस्कृती मानली जाते. त्यामुळे एकंदरीत सरकारी कर्मचारी ही जमात वेगळीच आहे. त्यांच्या वाटेला जायला नको. असा ग्रही आमच्यासारख्यांच्या मनात तयार झालाय. कधी कोणत्या सरकारी कार्यालयात गेले की तेथील लोक केवळ आपल्या कडून पैसे उकळायला बसलेत, असंही बऱ्याचदा वाटून जातं. हा ग्रह पुसून टाकण्यासाठी कधीतरी एखादा प्रामाणिक अधिकारी आमच्यासारख्यांच्या अनुभवात जमा व्हावा असेही वाटते. वाट बघुयात.

Friday, October 11, 2019

एक्झाम वॉरियर्स - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे, "एक्झाम वॉरियर्स". अगदी अपघातानेच हे पुस्तक हाती आले. परीक्षेला केंद्रभागी ठेवून लिहिलेले कदाचित हे पहिलेच 'सुटसुटीत' पुस्तक असावे. शालेय जीवनात विद्यार्थी अनेकदा परीक्षांना सामोरे जातात. परीक्षा हेच शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात भीतीचे सर्वात मोठे कारण असते. हीच भीती उद्भवू नये, म्हणून काय करावे? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकातून मिळते. परीक्षा म्हणजे नक्की काय? स्पर्धा, तंत्रज्ञान, विश्रांती, खेळ, झोप, ताणतणाव, आत्मविश्वास, शिस्त, शैली, कॉपी, आत्मचिंतन, प्रवास, तंदुरुस्ती अशा विविध अंगांना लेखकाने खूप उत्तम प्रकारे व सहजपणे हाताळले आहे. 


वरील काही शब्द वाचायला जरी जड वाटत असले तरी त्यांची शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मांडणी छानपणे करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे 'पर्सनल डायरी' सारखे काम करेल असेच आहे. जवळपास प्रत्येक धडा 'क्यूआर कोड'ने पंतप्रधानांच्या ऍपला जोडण्यात आलाय, जेणेकरून विद्यार्थी त्यांचे अनुभव थेट शेअर करू शकतील. पालक, शिक्षक व विद्यार्थी अशा तिघांनाही उद्देशून लिहिलेले हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांनी वाचायला हवे. पेंग्विन रँडम हाऊसने प्रकाशित केलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद पुण्याच्या अमेय इन्स्पायरिंग बुक्सने केला आहे.

वाचन प्रेरणेचे एक पाऊल

आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात वाचनसंस्कृती रुजवावी, या हेतूने भारत सरकारने 2015 पासून भारताचे लोकप्रिय माजी राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीला अर्थात 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आजही सर्व मराठी शाळांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. वाचनाची संस्कृती रुजावी आणि वाचनसंस्कृती वाढवावी, ही केवळ सरकारच नव्हे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असेच उद्दिष्ट लक्षात घेऊन मी आणि माझी पत्नी मागच्या चार वर्षांपासून विविध मराठी शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा करतो. सदर उपक्रमांतर्गत विविध गरजू मराठी शाळांना आम्ही चरित्रपर, प्रेरणादायी, गोष्टींची, कवितांची, कोड्यांची, सुलभ विज्ञानाची तसेच अभ्यासक्रमातील पुस्तके भेट स्वरूपात देत असतो. साधारणतः 80 ते 90 पुस्तके या संचात असतात. विद्यार्थ्यांना शालेय वयातच छोट्या-छोट्या पुस्तकांमधून अवांतर वाचनाची गोडी लागावी व त्यातूनच त्यांची ज्ञानसमृद्धी व्हावी, हा आमचा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. सण 2015 पासून नाशिकच्या एका मराठी शाळेतून आम्ही ही सुरुवात केली होती. यावर्षी सदर उपक्रमाची व्याप्ती वाढवून आम्ही तीन शाळांपर्यंत पोहोचणार आहोत.
हे सर्व इथे लिहिण्याचा उद्देश असा की आपणही आपल्या परीने आपल्या जवळच्या शाळेत सदर उपक्रम राबवू शकता. मराठी वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने आपले योगदान निश्चितच बहुमूल्य राहणार आहे.