कंपनीच्या कामाच्या निमित्ताने अनेकदा सांगली
जिल्ह्यातल्या इस्लामपूरला जाणे झाले. हे शहर बऱ्यापैकी ओळखीचे झाले आहे.
जून महिन्यातली गोष्ट आहे. एका पाच दिवसांच्या कामासाठी इस्लामपूरला गेलो
होतो. राहण्याची सोय कामाच्या ठिकाणी होती. संध्याकाळी पाच नंतरचा वेळ
रिकामाच असायचा. त्या वेळात थोडं शहरात फेरफटका मारून यावं, असा विचार
होता. शिवाय फिरण्यासाठी एक बाईकही मिळवली होती. त्यादिवशी आमच्या हीचा मेसेज आला की, इस्लामपुरात "स्वराज्य रक्षक संभाजी" मालिकेतील
कलाकारांची रांगोळी काढलेले एक प्रदर्शन भरलंय. तिने पत्ताही पाठवला होता.
शहरातल्या आंबिका मंदिराशेजारी हे प्रदर्शन भरलं होतं. सहानंतर फ्रेश होऊन
प्रदर्शन बघायला निघालो. अर्थात गुगल मॅपवाली बाई होतीच आम्हाला मार्गदर्शन
करायला. साधारणत: पंधरा-वीस मिनिटात मी या मंदिराजवळ जाऊन पोहोचलो.
इस्लामपूरातल्याच एका महाविद्यालयातर्फे रांगोळीचे हे छोटेखानी प्रदर्शन
आयोजित करण्यात आले होते. रांगोळी मात्र छान काढलेली होती. अगदी हुबेहूब!
त्यासोबत थोडावेळ फोटोसेशन करून मी मंदिराच्या बाहेर आलो. अजून जेवायला
बराच वेळ होता. त्यामुळे काय करावे, याच विचारात असताना मंदिराच्या उजव्या
बाजूला चार-पाच स्टॉल्स लावलेले दिसले. त्या रस्त्याने आज शिरलो तर लक्षात
आले की, इथे खूप मोठे मार्केट आहे. अगदी पुण्या-मुंबईतल्या गजबजलेल्या
रस्त्यासारखी गर्दी येथे झाली होती. जवळपास सर्वच वस्तू रस्त्याच्या दोन्ही
बाजूच्या दुकानात लावलेल्या दिसल्या. अनेक दुकाने लख्ख प्रकाशात उजळून
निघालेली दिसत होती. खरेदीदारांची संख्याही काही कमी नव्हती. एकमेकांना
धक्का मारून पुढे जाणारे उत्साहाने भाव करीत खरेदीला हातभार लावत होते. अशा
ठिकाणी पुस्तकांचं दुकान असणे, म्हणजे मूर्खपणाचं लक्षण म्हणता येईल! पण
त्या गर्दीतही पुस्तकांची दुकाने होती! कुठे... तर रस्त्यावर! मार्केटच्या
दोन्ही बाजूंनी दुकानांची गर्दी तर मधल्या जागेत दोन-तीन मुले रस्त्यावर
बसून पुस्तके विकत होती. अशा गजबजलेल्या मार्केटमध्ये कुणी खरेदीदार
त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता. याउलट त्यांच्या पुस्तकांना व विक्री
करणाऱ्या मुलांनाही येणाऱ्या जाणाऱ्यांचे अनेकदा पाय लागत होते. या
परिस्थितीतही दहा-बारा वर्षांची ती मुले उत्साहाने विक्रीसाठी बसली होती.
आपल्या देशातल्या वाचनसंस्कृतीचे एक अंग मी याची देही याची डोळा पाहिले.
पुस्तक म्हटलं की आमचे हात आणि मेंदू दोन्ही उत्तेजित होतात. मी खाली बसून
पुस्तके चाळायला सुरुवात केली. बहुतेक सर्वच लहान मुलांची पुस्तके होती.
कोल्हापुरच्या कुठल्या प्रकाशनाने प्रकाशित केलेली... बऱ्याचशा पुस्तकात
बोधपर, मनोरंजनपर गोष्टी होत्या व किंमतही वीस ते पंचवीस रुपयांच्या
दरम्यान होती. मी तिथे जाईपर्यंत कदाचित त्यांचे एकही पुस्तक विकलं गेलं
नसावं. गिऱ्हाईक आलय म्हटल्यावर त्यांनीही पुस्तकांची माहिती सांगायला
सुरुवात केली. एकेक पुस्तक पाहून मी माझा गठ्ठा तयार करायला लागलो. जवळपास
तीस पुस्तके मी निवडली. यावर मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यामुळे
त्यांनीही प्रत्येक पुस्तकामागे पाच रुपये कमी केले. शिवाय एक पुस्तकही मला
फ्री देऊन टाकले!
मी ती सर्व पुस्तक लहान मुलांना वाटण्यासाठी घेतली होती. परंतु त्यात विक्री करणाऱ्या मुलांचे समाधानही मला प्राप्त झाले होते. आज मी त्यातील बरीच पुस्तके लहान मुलांना वाटून टाकलीयेत. थोडीशी उरलीत, ती पण संपतील. परंतु वाचनाची संस्कृती आज रस्त्यावर पडली, हे मात्र या घटनेतून मला मनापासून जाणवले.
© तुषार कुटे
मी ती सर्व पुस्तक लहान मुलांना वाटण्यासाठी घेतली होती. परंतु त्यात विक्री करणाऱ्या मुलांचे समाधानही मला प्राप्त झाले होते. आज मी त्यातील बरीच पुस्तके लहान मुलांना वाटून टाकलीयेत. थोडीशी उरलीत, ती पण संपतील. परंतु वाचनाची संस्कृती आज रस्त्यावर पडली, हे मात्र या घटनेतून मला मनापासून जाणवले.
© तुषार कुटे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com