मागच्या काही वर्षांपासून वातावरणात व हवामानात होत चाललेले बदल आता
प्रकर्षाने लक्षात येऊ लागलेत. यंदाचा ऑक्टोबर महिना पूर्ण पावसाचा गेला.
शिवाय कधी नव्हे ते पूर्ण दिवाळीतही पाऊस पडला! निसर्गाकडून मानवजातीला
देण्यात येणारी ही धोक्याची घंटा समजायला हवी. मानवनिर्मित कारणांमुळे
निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे सर्वच ऋतूंवर त्याचा प्रतिकूल
परिणाम होतोय. हिवाळ्यात थंडीची तीव्रता वाढत चालली व उन्हाळ्यातही उन्हाची
दाहकता नवे नवे उच्चांक गाठत आहे. नुकतेच क्लायमेट सेंटरने प्रकाशित
केलेल्या अहवालात मुंबईसह अन्य मोठी शहरे येत्या तीस वर्षांत पाण्याखाली
जाण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा विविध धोक्याच्या घंटांनी आता तरी नागरिक
व सरकारांनी जागे व्हायला हवे. पर्यावरण शिक्षणाला फारसे गांभीर्याने न
घेतल्याने मानव जातीकडून निसर्गाची अतोनात हानी होत आहे. त्यामुळेच
निसर्गाचे पलटवार मनुष्य जातीवर होत आहेत. या सर्व घटनांची कारणमीमांसा
होणे व त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे वाटते. केवळ मूठभर
पर्यावरणवाद्यांमुळे पर्यावरणात बदल घडेल, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे
ठरेल. निसर्ग संवर्धनासाठी सरकारबरोबरच नागरिकांचाही सकारात्मक व सबळ
पाठिंबा असायला हवा. तरच भविष्यात येऊ घालणाऱ्या नैसर्गिक संकटापासून आपण
आपल्याला व येणाऱ्या पिढीला वाचवू शकू.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com