Monday, November 18, 2019

हॉटेलात पुस्तक वाचणारा

बर्‍याच दिवसांनी भाऊबीजेच्या निमित्ताने आमची ही दोन दिवसांसाठी माहेरी गेली होती. म्हणून घरी एकट्यासाठी काही बनविण्यापेक्षा बाहेर उपहारगृहातच जाऊन खावे, असा विचार केला. दिवाळीच्या निमित्ताने बरीचशी उपहारगृहे ही बंद होती. मुख्य चौकातल्या एका दर्शनी जागेत 'महाराष्ट्रीयन कॅफे'च्या नावाने चालू झालेले नवे उपाहारगृह दिसले. तशी चांगलीच गर्दी होती. त्यामुळे आमचीही पावले पोटाची पूजा करण्यासाठी सदर उपहारगृहाकडे वळाली. तिथे गेल्यावर समजले की, चपात्या संपल्या आहेत व सध्या फक्त थाळीच उपलब्ध आहे. दहा मिनिटे थांबावे लागेल, असा मालकांचा आदेश आला. रात्रीचे दहा वाजले होते. आता यावेळेस कुठे नवे उपहारगृह शोधा? असा विचार करून तिथेच बसायचा विचार केला. आमच्यासारखे अजून अनेक जण थाळी येण्याची वाट बघत बसले होते. आजकालच्या युगात एखाद्या ठिकाणी वाट बघणे म्हणजे मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसणे असा होतो. त्याचा प्रत्यय आम्हास याही वेळेसही आला. जेवणाची वाट बघणारे सर्व मनुष्यप्राणी खाली मान घालून मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं वर खाली करत बसले होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. 



आम्हीपण एका टेबलावर ठाण मांडून बसलो. दहा मिनिटे असच स्वस्थ बसण्यापेक्षा बॅगमध्ये एखादं पुस्तक आहे का? हे पाहिलं तर शेवटचे एकच पुस्तक सापडलं. आमच्या उर्दू भाषेमध्ये ते पुस्तक होतं! पुस्तक उघडलं आणि जामा मशीदीतल्या चाचा कबाबी दिल्लीवाले यांच्यावर मुल्ला वाहिदी यांनी लिहिलेला लेख वाचायला सुरुवात केली. उपहारगृहात काम करणारा पोऱ्या (मराठीत वेटर!) आमच्याकडे टक लावून पाहायला लागला. पहिली गोष्ट म्हणजे कुणी हॉटेलमध्ये पुस्तक घेऊन वाचत का? हा प्रश्न त्याला पडला असावा व दुसरी गोष्ट, सदर पुस्तक हे कुठल्याशा "मुसलमानी" भाषेत लिहिले आहे, हेही त्याने पाहिलं. हा बाबा नक्की कोण आहे? याविषयी त्याला नक्कीच कुतूहल निर्माण झाले असावे. अशा प्रकारची पुस्तकं फक्त विशिष्ट धर्माचे लोकच वाचतात, असा अनेकांचा समज असतो. कदाचित त्यालाही तसेच वाटत असावे. जवळपास दहा मिनिटे झाली असावीत. त्यानंतर तो वाट पाहणाऱ्या प्रत्येकाला विचारत होता, 'तुम्हाला थाळी पाहिजे का?' परंतु, माझ्या जवळ आल्यावर त्याने विचारले, 'आपको भी लाऊ क्या थाली?' त्यावर मी प्रतिप्रश्न केला, 'मराठी येत नाही का तुला?' माझ्या अनपेक्षित प्रश्नावर तो काहीसा वरमला. मग मीच सांगितले, 'ये घेऊन'.
यातून एक गोष्ट समजली की, सर्वसामान्य जीवनात वावरताना आपण मनात कितीतरी समजुती घेऊन फिरत असतो व आपल्या निरीक्षणाने वेगवेगळ्या प्रतिमा मनात तयार करत असतो. प्रत्येक वेळेस या प्रतिमा तंतोतंत तशाच असतील असेही नाही.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com