भारतातल्या सर्व राज्यांमध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात व
प्रत्येक राज्याला स्वतःची एक किंवा अनेक राज्यभाषा आहेत. आपल्या राज्याची
ही राज्यभाषा व इथली बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे, मराठी. तिला आपण लाडाने
'मायबोली' म्हणतो! महाराष्ट्र हे इतर राज्यांपेक्षा व प्रामुख्याने दक्षिण
भारतातील पाच प्रमुख राज्यांपेक्षा जरा वेगळे राज्य आहे. म्हणजे सांगायचं
असं की, इथला मराठी भाषिक सर्वसामान्यपणे मराठी बोलण्यास प्राधान्य देत
नाही. कदाचित त्याला भारतातल्या अन्य काही भाषा 'इंटरनॅशनल' वाटत असाव्यात!
या कारणास्तव आम्ही सदर विषयांवर थोडे संशोधन केले व त्यानुसार काही
निष्कर्ष काढले आहेत. ते तुमच्या समोर सादर करतो.
मराठी भाषिक सहजपणे इतर भाषिकांशी मराठीत बोलत नाहीत याची अनेक कारणे आहेत-
पहिले कारण: जाज्वल्य अभिमान
मराठी लोकांना आपल्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे ती भाषा फक्त आपणच बोलावी, असे त्यांना वाटत असते. आपण जर परभाषिकाशी मराठीत बोललो तर त्यालाही आपली भाषा येऊ लागेल व लवकरच तो तिच्यावर प्रभुत्व प्राप्त करेल. असं कोणीही येऊन आपली भाषा बोलावी, हे मराठी भाषिक कसं खपवून घेऊ शकेल? आमच्या भाषेवर फक्त आमचाच अधिकार आहे, यावर मराठ्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे ते सहसा मराठी लोकांशी मराठीत बोलण्याचे टाळतात. मुंबईत तर त्याचा कधी कधी कहरच होतो. तिथे मराठी लोकही मराठीत बोलत नाहीत. इतका जाज्वल्य अभिमान फक्त आणि फक्त मराठी लोकच दाखवू शकतात!
दुसरे कारण: भाषाप्रभुत्व
इतिहासावर व वर्तमानावरही नजर टाकली तर देशाला सर्वाधिक बुद्धिमान व तेजस्वी माणसे महाराष्ट्राने दिली आहेत, असे दिसेल. त्याचे कारणही मराठी लोकांना माहित आहे. आम्ही लोक बहुभाषिक आहोत. आमच्या राज्यात कमीत-कमी ऐंशी टक्के लोकांना किमान तीन भाषा तरी सहज देतात ( अर्थात समजतात). भाषा तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्याला अधिक भाषा येतात त्याचा मेंदू तितका तल्लख असतो. तीन-तीन भाषांच्या ज्ञानप्राप्तीमुळे मराठी माणसाचा मेंदू तल्लख झालाय. त्यामुळे तो आपली भाषा समोरच्याला शिकू देत नाही. पण, समोरच्याची भाषा बोलून तिच्यावरही प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. अमराठी लोकांचं बोलणं त्यांच्याच भाषेत ऐकतो व त्याच भाषेत उत्तर देतो. त्यामुळे मराठी लोकांना नव्या भाषेवर प्रभुत्व मिळवणं सोपं जातं. मग समोरच्याला वाटतं, याला तर आपली भाषा येतीये, मग कशाला याच्याशी मराठीत बोला? यामुळे दोन गोष्टी साध्य होतात अमराठी लोकांना आपली भाषा येत नाही व ते वा दोन भाषांतच अडकून पडतात आणि मराठी लोकांची बहुभाषिकत्वामुळे मात्र बौद्धिक पातळी वाढत राहते.
तिसरे कारण: दुसऱ्याच्या भाषेची वाट लावणे
एखादा अमराठी भाषिक तोडकी-मोडकी मराठी बोलत असेल तर मराठ्यांना हा आपल्या भाषेचा हा अपमान वाटतो. म्हणून ते दुसऱ्या भाषेत मुद्दाम चुकीचे शब्द भरवतात. जसे ते हिंदीत बोलताना मुद्दाम तेरेकू, मेरेको, इसकू, उसकू टाइप टपोरी शब्दांचा वापर करतात व त्या भाषेचे सौंदर्य बिघडवतात. यामुळे त्यांना सिद्ध करता येते की, मराठी भाषा ही किती सुंदर व शुद्ध आहे.
चौथे कारण: आपले शब्द घुसडवणे
वरच्याच कारणाला जोडून हेही एक कारण आपण सांगू शकतो. समोरच्याची भाषा अशुद्ध करण्यासाठी मराठी भाषिक आपल्या भाषेतले शब्द त्यात घुसडवतात. उदाहरणार्थ कांदा, बटाटा, नक्की वगैरे शब्द हिंदी नसून मराठी आहेत, हे महाराष्ट्रातल्या अनेक परप्रांतीयांना माहीतच नाहीये! अशाप्रकारे समोरच्याच्या भाषेत भेसळ करून तिचे सौंदर्य बिघडवले जाते व मराठी भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे मराठी लोक अप्रत्यक्षपणे दाखवून देतात.
अशाप्रकारे मराठी लोकांना माहित आहे की, आम्हाला मराठी येतंय म्हणून आम्हाला मराठी राज्यात किंमत आहे जर कोणीही ऐरागैरा येऊन मराठीत बोलू लागला तर आमची किंमत काय राहणार? या प्रश्नाच्या उत्तरापायी मराठी लोकांची ही सारी खटपट चालू आहे.
बरोबर ना?
© तुषार कुटे
एकदम बरोबर बोललात तुषार भाऊ
ReplyDeleteधन्यवाद भाऊ ...
Delete