महाराष्ट्रात असे फार क्वचितच इतिहासकार असतील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिले नाही. शिवरायांवर लिहिलेल्या हजारो पुस्तकांपैकी हेही एक छोटेखानी पुस्तक. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. खरतर शिवचरित्रापासून या अगणित गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्या एका पुस्तकातून मांडणं केवळ अशक्य आहे. जयसिंगराव पवारांनी त्यांच्या लेखमालेतून शिवचरित्रातील काही अंग इतिहासकाराच्या नजरेतून उलगडून दाखवले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी व अभ्यासकांसाठी हे निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल. मराठा इतिहासाचे ज्येष्ठ संशोधक प्रा. न.र. फाटक म्हणाले होते इतिहासाला चार मुख्य शत्रू असतात, ते म्हणजे नाटककार, कादंबरीकार, सिनेमावाले व राजकारणी लोक! त्यांच्या काळात टीव्ही नव्हता अन्यथा पाचव्या शत्रूचीही त्यात भर पडली असती. त्यांचे म्हणणे मात्र शंभर टक्के खरे आहे. खरा इतिहास जाणून घेणाऱ्यांनी या पाच शत्रुंपासून दूर राहायला हवे.
डॉ. पवारांनी शिवचरित्राचे काही महत्त्वपूर्ण पैलू या पुस्तकातून सादर केले आहेत ते इथे नमूद करू इच्छितो.
- शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. परंतु ते केवळ हिंदूंचेच राजे होते का? इस्लामी जनतेविषयी त्यांचा दृष्टिकोन कसा होता? या प्रश्नांची उत्तरे इतिहासकारांच्या नजरेतून आपल्याला मिळतात.
- शिवरायांना रयतेचा राजा मानले जात. इतर बादशहा प्रमाणे त्यांची त्यांनी स्वतःलाच रयतेचा राजा मानले नव्हते. तर रयतेने त्यांना खर्या अर्थाने राजा म्हणून स्वीकारले होते. हे ऐतिहासिक पुराव्यांतून डॉ. पवारांनी सिद्ध केले आहे.
- शिवछत्रपती हे मराठा आरमाराचे किंबहुना भारतीय आरमाराचे खरे जनक होय. सागरावर राज्य प्रस्थापित करणे किती महत्त्वाचे आहे, हे ते जाणून होते. इतिहासाच्या पुस्तकात नसणाऱ्या विविध आरमार मोहिमांची माहिती या पुस्तकातून होते. शिवाय स्वतः आरमाराच्या गलबलातून प्रवास करून मोहीम फत्ते करणारे शिवाजी महाराज हे पहिले व शेवटचे मराठी राजे होत!
- सुरतेच्या हल्ल्याच्यावेळी शिवाजी महाराजांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात सापडेल. शिवाय सुरतेच्या दोन्ही छाप्यांव्यतिरिक्त त्यांनी इतरही अनेक मुघलांच्या समृद्ध बाजारपेठांवर सातत्याने हल्ले केले होते. त्याचा सारांश या पुस्तकात उपलब्ध आहे.
- शिवराज्याभिषेक ही इतिहासातील एक मोठी घटना होती. त्यासाठी त्यांना किती दिव्ये पार पाडावी लागली होती. अनेक शतकांनंतर इस्लामी राजवटीत असलेल्या भारतात एक हिंदुराजा सार्वभौम छत्रपती झाला होता.
- छत्रपतींचे व इंग्रजांचे एकंदरीत राजकीय संबंध कसे होते? यावरील डॉ. पवारांचा तपशीलवार लेख आहे. इतिहासातील अनेक अज्ञात गोष्टी या माध्यमातून अभ्यासकांना निश्चितच समजतील. शिवाय सिद्धी, पोर्तुगीज, डच या पश्चिमेकडून आलेल्या अन्य परकीय शक्तींचा शिवाजी महाराजांनी कसा सामना व वापर केला याचीही माहिती या पुस्तकात आहे.
- शिवरायांच्या सर्व सेनानीपैकी हंबीरराव मोहिते हे असे सेनापती होते, ज्यांनी स्वराज्याच्या पहिल्या दोन्ही छत्रपतींची कारकीर्द प्रत्येकी सात वर्षे पाहिली. त्याबद्दलही इतिहासात बरीच कमी माहिती सापडते. त्यांनी ठरवले असते तर आज इतिहास वेगळा असला असता. परंतु स्वराज्य निष्ठावंत असणाऱ्या हंबीररावांनी खंबीरपणे राज्याची सेवा केली अनेक मोहिमांमध्ये विशेषत: संभाजीमहाराजांच्या काळात त्यांनी शत्रूला नामोहरम करून सोडले होते. कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेतले होते. त्यांच्यावरील सर्वात विस्तृत लेख या पुस्तकात सापडतो. तो निश्चितच वाचनीय आहे.
- शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमांची माहिती आजही सर्वसामान्य शिव अभ्यासकांना नाही. तंजावर, जिंजीची स्वारी, व्यंकोजी बरोबरचे युद्ध व वाटाघाटी यासंबंधी बरीचशी माहिती डॉ. पवारांनी त्यांच्या लेखांतून दिली आहे.
एकंदरीतच शिवाजी महाराजांच्या नीतीकौशल्याची, युद्धकौशल्याची व राज्यकौशल्याची तपशीलवार आढावा घेणारे काम हे पुस्तक निश्चित करते यात शंका नाही.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com