'देव' या संकल्पनेभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना, विचारधारणा व धार्मिक
समजुती जगात ज्ञात आहेत. शिवाय यावर आजवर अनेक तत्त्वज्ञांनी व लेखकांनी
प्रकाशझोत टाकणारी पुस्तके लिहीलेली आहेत. अशाच एका वेगळ्या वाटेवरचे
पुस्तक म्हणजे बाळ भागवत यांचे 'देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर' हे पुस्तक
होय! पुस्तकाच्या नावावरूनच त्यात कोणत्या प्रकारचे विवेचन असावे, याची
कल्पना येते. परंतु, देव हे परग्रहावरचे अंतराळवीर असू शकतात का? हा प्रश्न
मात्र उत्सुकता वाढवणारा आहे.
देवाच्या संकल्पनेला विज्ञान व इतिहासाच्या माध्यमातून सादर करण्याचा उत्तम प्रयोग बाळ भागवत यांनी या पुस्तकातून केला आहे. प्राचीन काळापासून म्हणजे अगदी दहा ते बारा हजार वर्षांपासून देव हे पृथ्वीवर नांदत आहेत. परंतु, देव मानायचे कुणाला? काही मोठा प्रश्न पडतो. सर्वसामान्यपणे सांगायचं तर सामान्य माणसांपेक्षा अधिक शक्तिशाली व बलवान असणारा मनुष्य म्हणजे देव होय. असे आपण म्हणू शकतो. याच विचारावर सदर पुस्तकाची पूर्ण प्रगती आहे. प्राचीन काळापासून नांदत असलेल्या अमेरिका, आशिया व आफ्रिका खंडातील विविध संस्कृतींचा अभ्यास करून विविध निष्कर्ष लेखकांनी या पुस्तकात नमूद केले आहेत. आज आपल्या अस्तित्वाच्या व प्रगतीच्या केवळ पाउलखुणा सोडून गेलेल्या माया, सुमेरियन व ईजिप्शियन संस्कृतींना विज्ञान तंत्रज्ञानाचे ज्ञान हजारो वर्षांपासून होते. त्यांच्या पाऊलखुणांमधून लेखकाने काढलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या ते पूर्णतः पटणारे वाटतात. त्यातूनच त्यांनी देवाचं अस्तित्व सिद्ध केलं आहे. आपल्यासारखे जीवनसृष्टी असणारे हजारो ग्रह आपल्या विश्वात असतील तर त्यांनी अजून आपल्याशी संपर्क साधला नसावा का? असेल तर तो कशा पद्धतीने? या प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे बाळ भागवत देतात. दक्षिण अमेरिकेत एकेकाळी नांदत असलेले प्राचीन माया संस्कृती आजच्या विज्ञानाइतकी प्रगती होती का? जगाला विविध शास्त्रांचे ज्ञान देणारी सुमेरियन संस्कृती अचानक नाहीशी का झाली? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जगाच्या विविध देशांतील दंतकथा व पुराणकथांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून त्यातील निष्कर्ष शोधण्याचाही प्रयत्न केला आहे. आजही ईस्टर आयलंड असो वा ईजिप्तचे पिरॅमिड्स यापैकी कशाचीही १००% उत्तरे कुणालाही देता आलेली नाहीत. परग्रहवासीयांनी संपर्क साधण्याचे आजवर किती शास्त्रज्ञांनी व कसे प्रयत्न केले? याची साराभर माहिती या पुस्तकात मिळते.
शास्त्रीय विचार कसा करावा? या प्रश्नाचे उत्तर हे फक्त निश्चितच देईल. एकंदरीतच देव हाही इतिहास विज्ञानाचा एक भाग आहे हे सिद्ध करण्याची क्षमता आजही मानवप्राण्यात आहे, हे त्या पुस्तकाचे एकूण सार होय.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com