Monday, July 27, 2020

डेटा सायन्स आणि पायथॉन प्रोग्रॅमिंग

मागच्या दहा वर्षांपासून संगणक क्षेत्रांमध्ये वेगाने बदल होताना दिसत आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग सारखी क्षेत्रे ही वेगाने विकसित होत आहेत. डेटा सायन्स हा या क्षेत्रांचा मूळ गाभा होय. उपलब्ध माहितीच्या आधारे विविध प्रकारचे ऍनालिसिस करून त्यावर योग्य निर्णय प्रक्रिया राबवण्याचे कार्य डेटा सायन्स द्वारे केले जाते. त्यामुळे डेटा सायन्स व डेटा सायंटिस्टची जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या कारणास्तव संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये डेटा सायन्स वर काम करणाऱ्या तंत्रज्ञ व अभियंत्यांची गरज भासत आहे. परंतु सद्य परिस्थिती पाहता या तंत्रज्ञानात कुशल असणारे मनुष्यबळ अजूनही उपलब्ध नाही. अनेक विद्यापीठांमध्ये सदर अभ्यासक्रम नुकताच समाविष्ट करण्यात आलेला आहे. परंतु त्यातून कुशल मनुष्यबळ तयार होण्यासाठी अजून किमान तीन ते चार वर्षे जावी लागतील. अशा परिस्थितीमध्ये आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डेटा सायंटिस्ट व डेटा अनॅलिस्ट तसेच मशीन लर्निंग इंजिनीयरची नितांत गरज आज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही डेटा सायन्सचा परिपूर्ण कोर्स मागील चार वर्षांपासून घेत आहोत. या क्षेत्रात लागणारे परिपूर्ण व प्रात्यक्षिकांचे ज्ञान सदर अभ्यासक्रमातून आम्ही विद्यार्थ्यांना प्रदान करत असतो.
जसं संगणक तंत्रज्ञान बदलत चाललं आहे, तसंच इथे वापरण्यात येणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस सुद्धा बदललेल्या आहेत. एकेकाळी सी आणि सी प्लस प्लस अथवा जावा सारख्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आल्या तरी आपल्याला संगणक क्षेत्रांमध्ये सहज प्रवेश करता येऊ शकत होता. पण आजची परिस्थिती तशी नाही. आज कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे विश्व पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज व्यापू पाहत आहे. मागच्या दहा वर्षांचा आलेख पाहिला तर ध्यानात येईल की, जावा प्रोग्रामिंग लैंग्वेज पेक्षा पायथॉन ही दोन पावले पुढे चालणारी लँग्वेज आहे. सन २०१६ मध्ये पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजने जावाला माहिती-तंत्रज्ञान विश्वात मागे टाकले आहे. त्यामुळे येणारे जग हे पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजवर आधारित असेल, यात शंका नाही. महत्त्वाचे असे की, पायथॉन ही आज वापरण्यात येणाऱ्या संगणकातील डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानात प्रामुख्याने वापरली जाते. त्यामुळे संगणक तंत्रज्ञान जसजसे विकसित होत जाईल तस-तशी पायथॉन प्रोग्रामरची सुद्धा गरज माहिती-तंत्रज्ञान विश्वाला भासणार आहे.
या दोन्ही तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या कंपनीतर्फे मागच्या चार वर्षांपासून दोन निरनिराळे कोर्सेस चालवले जातात. त्यापैकी डेटा सायन्सचा कोर्स हा २५००० रुपये किमतीचा होता आणि पायथॉनचा कोर्स दहा हजार रुपये किंमतीचा होता. परंतु लॉकडाऊन मध्ये आम्ही दोन्ही कोर्सेस ऑनलाइन पद्धतीने सुरू केलेले आहेत. ज्यांना संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वरील तंत्रज्ञानावर काम करायचे असेल, त्यांना डेटा सायन्स चा कोर्स ८० टक्के डिस्काउंटसह रुपये ४९९९ मध्ये तर पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजचा कोर्स ९० टक्के डिस्काउंटसह रुपये ९९९ मध्येच आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. सदर कोर्सद्वारे अधिकाधिक तंत्रज्ञ नव्या तंत्रज्ञानासह माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला उपलब्ध व्हावेत व नवीन मनुष्यबळ विकसित व्हावे, यासाठी इतकी मोठी सूट आम्ही दिलेली आहे. तरी यांची माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर किंवा वेबसाईटवर तुम्ही संपर्क साधू शकता.

https://mitu.co.in/courses
मोबाईल: 8600829693

द इमिटेशन गेम : एका ध्येयवेड्या गणितज्ज्ञाची कथा

संगणकाचा जनक कोण? याचं उत्तर अर्थात चार्ल्स बाबेज हे नाव जवळपास सर्वांनाच माहीत असतं. परंतु, आधुनिक संगणकाचा जनक कोण? याचे उत्तर मात्र खूप कमी लोकांना माहीत आहे. अगदी संगणक अभियंते व तंत्रज्ञ यांनाही हे नाव कदाचित माहीत नसावं.
आधुनिक संगणकाचा जनक आहे ॲलन ट्युरिंग!
सन १९५० नंतर संगणकाची पिढी हळुहळु डिजिटल व्हायला लागली होती. डिजिटल कम्प्युटरच युग सुरुवातीच्या काळामध्ये होतं. या काळानंतर संगणक क्षेत्रात सर्वात महत्त्वाचं योगदान देणारे तीन शास्त्रज्ञ म्हणजे ॲलन ट्युरिंग, जॉन व्हॉन न्यूमन आणि डेनिस रिची होय. या तिघांशिवाय आधुनिक संगणक बनू शकला नसता, असं मला वाटतं. त्यापैकी ट्युरिंग हा सर्वाधिक विशेष असा गणितज्ञ होता. सन १९४० च्या सुमारास दुसरे महायुद्ध जर्मनीने जगावर लादलं होतं. तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीने हे महायुद्ध खूप महत्त्वाचं मानलं गेलं पाहिजे. कारण याच महायुद्धामुळे तंत्रज्ञानाचा विशेष करून डिजिटल इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर व विकास अतिशय वेगाने होऊ लागला. यात काळामध्ये ॲलन ट्युरिंग हा इंग्लंडमध्ये गणितज्ञ म्हणून नावारूपास येत होता. त्याची कहाणी सन २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इमिटेशन गेम' या चित्रपटात चित्रित करण्यात आलेली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर ट्युरिंगचे तंत्रज्ञानाला व विशेषतः संगणक तंत्रज्ञानाला असलेले योगदान किती महत्वपूर्ण आहे, याची प्रचीती येते. शिवाय त्यांनी केलेली धडपड व समर्पण हेही आपल्या समोर प्रकर्षाने येतं. अँड्रयू ह्युजेस यांनी १९८३ मध्ये लिहिलेल्या 'ऍलन ट्युरिंग: द एनिग्मा' या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे.


१९३० च्या दशकातला ॲलन ट्युरिंग हा नावाजलेला गणितज्ञ होता. त्यामुळे केंब्रिज विद्यापीठात एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी वयाच्या केवळ सत्ताविसाव्या वर्षी त्याला संधी मिळाली. आपल्याला माहीतच आहे की, याच कालावधीमध्ये हिटलरच्या जर्मनीने जगावर दुसरे महायुद्ध लादलं होतं. जर्मनी सर्वच क्षेत्रात आघाडीवर होती. युरोपमध्ये जवळपास सर्वच देश पादाक्रांत करण्याची हिटलरची मनीषा होती. या युद्धात भयंकर नरसंहारही झाला होता. जर्मन सैन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर आघाडी घेत होतं. त्यांचे एन्कोडेड संदेश हे पाठवले जायचे. यातली बरेचशे संदेश इंग्लंड व अन्य मित्र राष्ट्रांना मिळत होते. परंतु त्याचे अर्थ त्यांना उमगत नसत. एक गणिती प्रक्रिया सोडवण्यासाठी सत्तावीस वर्षे लागतील इतकी ती किचकट होती. त्यामुळे जर्मनांनी पूर्ण युरोप समोर मोठे आव्हान निर्माण केले होते. जर्मन संदेश मिळवण्यासाठी इंग्लंडकडे एनिग्मा नावाचे मशीन होते. परंतु त्यातून संदेशांची डिकोडिंग होत नव्हती. ती साध्य करण्यासाठी इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञ व गणित तज्ञांचा एक चमू कार्यरत होता. त्यात ॲलन ट्युरिंगला बोलावणे आले. तसं पाहिलं तर ट्युरिंग हा जरा विक्षिप्त होता. आल्या आल्या त्याने थेट पंतप्रधान चर्चिल यांनाच पत्र पाठवून संशोधनाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली व त्यांच्या टीम मधून दोघांना वगळून टाकले. त्याचे ध्येय निराळे होते. तो कोणत्याही प्रकारचे जर्मन संदेश तात्काळ डिकोडिंग करू शकेल, अशा यंत्राच्या शोधात होता. त्यासाठी तंत्रज्ञ गोळा करण्याकरिता बरीच मेहनत घेतली व आपल्या गणिती मेंदूचा वापर करून एक अतिशय किचकट यंत्र तयार केले. त्याला तो "ख्रिस्तोफर" म्हणत असे. क्रिस्तोफर हे त्याच्या बालपणीच्या दिवंगत मित्राचे नाव होते. या मशीनची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याने दिवस-रात्र मेहनत केली. जवळपास दोन वर्ष या प्रकल्पावर काम चालू होते. एकीकडे महायुद्ध जर्मनी जिंकणार अशी परिस्थिती बनत चालली होती. परंतु जर्मन संदेशांचे डिकोडिंग मात्र काही होत नव्हते. त्यामुळे इंग्लंड सरकारने विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांच्या चमूला अखेरचा एक महिना दिला. तो एक महिना ऍलन ट्युरिंग व त्याच्या साथीदारांनी सार्थकी लावला. एक महादिव्य असे मशीन त्यांनी तयार केले. आता जर्मन संदेश त्यांना सहजपणे डिकोडिंग करता येऊ लागले. यामागची त्यांची मेहनत, कष्ट व समर्पण हे वाखाणण्याजोगे होते. डिजिटल कम्प्युटरला तयार करणारे हेच ते इंजिन होय ज्याला 'ट्युरिंग मशीन' असे म्हटले जाते. आधुनिक डिजिटल संगणकाचा पाया या नव्या तंत्रज्ञानाने भरला गेला होता. या मशीनचा वापर इंग्लंडने जर्मन संदेश डिकोर्डिंग साठी तर केला. परंतु त्यांनी सर्वच संदेश वाचून त्यावर कृती केली नाही. त्यामुळे जर्मनांना इंग्लिश लोक आपला संदेश वाचत आहेत, हे समजूनच आले नाही. या मशीनमुळे दुसरे महायुद्ध दोन वर्ष आधीच संपले. आणि त्यामुळे १.४ कोटी लोकांचा जीव वाचला. इतिहासामध्ये ट्युरिंगचे इतके भरीव योगदान आहे. त्या काळामध्ये इंग्लंडला कदाचित ते समजले नसावे. कारण समलैंगिकतेच्या गुन्ह्याखाली त्याला शिक्षा झाली होती. त्याला दोन वर्षे जेल किंवा हर्मोनिक थेरपी यापैकी एक निवडायचे होते. संशोधनावर कार्य चालू राहावे म्हणून त्याने थेरपीची निवड केली व टुरिंग नावाने आणखी काही शोध जगासमोर आणले. त्याचा शेवट मात्र आत्महत्येने झाला. वयाच्या ४१ व्या वर्षी ट्युरिंगने सायनाईड घेऊन आत्महत्या केली. १९५४ अंतर २०१३ पर्यंत समलैंगिकतेचा कायदा इंग्लंडमध्ये लागू होता. परंतु २०१३ मध्ये इंग्लंडच्या राणीने अधिकृतरित्या ट्युरिंगची माफी मागितली होती. अर्थात त्यामुळे त्याचे योगदान इंग्लंडला मान्य करता आले.
ट्युरिंगने तयार केलेल्या ट्युरिंग मशीनच्या या बळावरच आजचा आधुनिक संगणक उभा आहे. ॲलन ट्युरिंग जर नसता तर कदाचित डिजिटल संगणक अजूनही मागच्याच पिढीमध्ये असला असता. त्याच्या या योगदानाला स्मरून एसीएम अर्थात असोसिएशन ऑफ कॉम्प्युटिंग मशिनरीने  संगणक शास्त्राचे नोबेल म्हणून ट्युरिंग अवार्ड देण्याची सुरुवात केली. आतापर्यंत अनेक महान संगणक तज्ञांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
"इमिटेशन गेम" या चित्रपटातून ट्युरिंगचे चरित्र जगासमोर आले. एकंदरीतच संगणकावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी हा चित्रपट निश्चित बघण्यासारखा आहे. काही धडपड्या व ध्येयवेड्या लोकांमुळेच आजचं तंत्रज्ञान उभं आहे. त्यातलाच एक ॲलन ट्युरिंग...

Thursday, July 23, 2020

१४ स्टोरीज दॅट इस्पायर्ड सत्यजित राय

वाङ्मय ही प्रेरणा असू शकते का? निश्चितच होय... कथा,कविता, कादंबरी अशा साहित्याच्या विविध प्रकारांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. विविध कादंबरी व कथांवर आधारित आजवर अनेक चित्रपट विविध भाषांमध्ये तयार झाले. ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजीत राय हेही याला अपवाद नाहीत.
सत्यजित राय यांना प्रेरणा देणाऱ्या चौदा विविध लघुकथा या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यातला प्रत्येक सिनेमा हा श्रेष्ठ दर्जाचा होता. देवी, जलसा घर आणि शतरंज के खिलाडी हे त्यापैकी काही गाजलेले चित्रपट होय. १४ पैकी १३ कथा या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. प्रेमचंद यांची एक कथा वगळता अन्य सर्व कथा ह्या बंगालीतून इंग्रजीमध्ये भाषांतरित झाल्या व इंग्रजीतुन मराठीमध्ये नीता गद्रे यांनी भाषांतरित केलेल्या आहेत.
रवींद्रनाथ टागोर, ताराशंकर बंदोपाध्याय, प्रभात कुमार मुखोपाध्याय, राजशेखर बसू आणि प्रेमचंद यांच्या कथा या कथासंग्रहात समाविष्ट आहेत. शिवाय सत्यजित राय यांनी ही दोन कथा लिहिलेल्या आहेत. अतिथी आणि पिकुची डायरी या कथांमधून त्यांचे लेखन कौशल्यही प्रतीत होते. जीवनातील विविध रस या कथांमधून आपल्याला अनुभवयास मिळतात. कथा लिहिली गेली तरी दिग्दर्शकाने ती ज्या पद्धतीने मांडली आहे, त्या पद्धतीवर ती श्रोत्यांपर्यंत कशाप्रकारे पोहोचते, हे अवलंबून असते. अशाच धाटणीच्या विविध कथा या पुस्तकांमधून वाचकांना वाचायला मिळतील.


Saturday, July 18, 2020

हवाई मुलुखगिरी, लेखक-मिलिंद गुणाजी, छायाचित्र-उद्धव ठाकरे

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आणि पर्यटनावर बंदी असल्याने किल्ले भ्रमंती करता येत नाही. दुर्गभ्रमंती करणाऱ्यांसाठी सध्या कठीण काळ चालू आहे! त्यामुळे पावले घरात थांबली आहेत आणि किल्ले ओस पडलेले आहेत.
घरच्या घरी किल्ले पाहण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे दुर्गभ्रमंती वर लिहिली गेलेली पुस्तके. अनेक पुस्तकांमध्ये छायाचित्रे समाविष्ट नाहीत. परंतु उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं "हवाई मुलुखगिरी" हे पुस्तक मात्र अपवाद आहे. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांचे रंगीत बर्ड आय व्ह्यूज या पुस्तकातून पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशी छायाचित्रे या पुस्तकांमध्ये आहेत. भुईकोट किल्ले, गिरीदुर्ग आणि सागरी दुर्ग अशा सर्व प्रकारचे किल्ले यात समाविष्ट आहेत. सह्याद्रीचं दुर्गसौंदर्य उद्धव ठाकरे यांनी अप्रतिमरीत्या आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त केलं आहे. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी छायाचित्रे या पुस्तकात पाहता येतात. आमच्या जुन्नर मधले जवळपास सर्वच किल्ले या पुस्तकात आहेत. याशिवाय लेणी, घाटवाटा कोकण कडा अशा विविधरंगी छायाचित्रांनी हे पुस्तक सजलेलं आहे. पावसाळ्यातली छायाचित्रे तर अतिशय मनमोहक आहेत. त्यांच्याकडे पाहातच रहावसं वाटतं. पुस्तकात केवळ छायाचित्रच नाही, तर मिलिंद गुणाजी यांनी किल्ल्यांची वर्णने देखील केलेली आहेत. त्यामुळे घरबसल्या सह्याद्रीची भ्रमंती करण्यासाठी हे पुस्तक एक उत्तम "आधार"
म्हणून बघता येईल!
 

 

Thursday, July 9, 2020

हिंदी भाषेत डब झालेला पहिला हॉलीवुड पट

हिंदी भाषेत डब झालेला पहिल्या हॉलीवुड पटाचे श्रेय बरेच जण "ज्यूरासिक पार्क" या चित्रपटाला देतात. बहुतांश जणांनी हाच पहिला चित्रपट हिंदीत पाहिला आहे. शिवाय गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला हेच उत्तर सापडेल. ज्यूरासिक पार्क हा चित्रपट १९९३ मध्ये तयार झाला होता. त्याच्या लोकप्रियतेमुळे तो जगभरात बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरित झाला होता. त्यानंतर हॉलिवूडचे गाजलेले बेबीज डे आऊट, द मास्क, स्पीड, जुमानजी यासारखे चित्रपट हिंदीत आले व चाललेले देखील. आज अशी परिस्थिती आहे की, आज हिंदीत मूळ हिंदी चित्रपटांपेक्षा डब झालेल्या चित्रपटाची सर्वात जास्त गर्दी दिसते. ज्यूरासिक पार्क जरी डब झालेल्या पहिला चित्रपट मानत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. मग तो पहिला चित्रपट कोणता?
१९६९ मध्ये जे. ली. थॉमसन यांनी दिग्दर्शित केलेला "मेकॅनाज गोल्ड" हा हिंदीत डब झालेला पहिला हॉलीवुडपट होय! "मस्तान का सोना" या नावाने तो हिंदीत भाषांतरीत झाला होता. एका हरवलेल्या सोन्याची थरारक कहाणी त्यात चित्रीत करण्यात आलेली होती. या चित्रपटानंतर १३-१४ वर्षांनी भारतात हॉलीवूड चित्रपट डब करण्याची परंपरा वेग घेऊ लागली. "मस्तान का सोना" हा चित्रपट आज कुठेही उपलब्ध नाही. गुगलवर तुम्ही शोधलं तरी सापडणार नाही. परंतु फ्लिपकार्टवर मात्र त्याची डीव्हीडी होती. पण, आता तीही आऊट ऑफ स्टॉक आहे!
 
 

Monday, July 6, 2020

विज्ञान भ्रमंती - निरंजन घाटे

ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांच्या विज्ञान बखरीमधलं हे बहुमूल्य पुस्तक होय. विज्ञान हा विषय किती अद्भुत व सखोल आहे, याची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. मंगळावरील पाण्यापासून माणसांच्या मासेमारी पर्यंत, भुताच्या जन्मापासून माकड आणि माणसांपर्यंत आणि आपल्या आदि पूर्वजांपासून गॅलापेगॉसच्या राक्षसी कासर्वांपर्यंत विस्तृत विज्ञान-ज्ञान देणारे पुस्तक म्हणजे "विज्ञान भ्रमंती" होय. विज्ञानात जितके खोलात जाऊ तितके ते अधिक गहन होत जातं. व ही खोलीच ज्ञानाची कवाडं उघडी करतात. याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यावर निश्चितच येते.
काही प्रश्नांचा आपण विज्ञानाच्या दृष्टीने अजूनही विचार केलेला नाही. डावे-उजवे का व कसे? लिओनार्दो दा विंची, मिडास राजाची कथा अशा विविध विषयांना लेखकाने या पुस्तकाच्या निमित्ताने संशोधनात्मक रूप दिले आहे.
मानववंशशास्त्र हा माझा आवडता विषय. डार्विनशिवाय हा विषय पूर्णच होऊ शकत नाही. यावरच आधारित "सजीवांची जीवघेणी स्पर्धा" हे सर्वात वाचनीय प्रकरण या पुस्तकात लेखकाने विस्तृत पद्धतीने मांडले आहे. त्यामुळे विज्ञानाच्या अमर्याद विश्वाची छोटीशी भ्रमंती ते निश्चितच करून आणते. याशिवाय विज्ञानाचे सोबती असणारे गणित व इतिहास या विषयांचे महत्त्वही जागोजागी ठळकपणे दिसून येते.

 

Friday, July 3, 2020

दूरदर्शी गॅलिलिओ

गतिशील पृथ्वीची संकल्पना कोपर्निकसच्या आधी ऍरिस्टार्कस वगैरे अनेक ग्रीक तत्त्वज्ञांनीही केली होती, तसेच त्याच्या भौतिक विज्ञानाविषयी शंका बाळगणारेही अनेक विद्वान गेली निदान २-३ शतके वावरतच होते.

डोक्यावर दुसरे छत निश्चित होईपर्यंत पहिले मोडकळीला आलेले घर सोडायला माणूस धजत नाही, तशी स्थिती या विद्वानांची झालेली होती. शिवाय धर्माची नाराजी ओढवून घेण्याची भीतीही त्यांच्या मनात होतीच. नवीन कल्पना मनात खेळवणे, नवीन अटकळी बांधणे, त्यांच्या शक्यता चोखाळणे इथपर्यंत धर्मसंस्थेकडून मुभा होती; परंतु त्यापुढे जाऊन प्रस्थापिताला हटवून त्याच्या जागी दुसरे ज्ञान आणण्याची मुभा त्यांना नव्हती.

गॅलिलिओ या क्रांतिवीराचे यश त्याच्या या शिकवणीत अधिक आहे. रुळलेल्या चाकोरीला चिकटून राहण्याच्या वृत्तीची जागा स्वतंत्र बुद्धीने घ्यावी, या संदेशाची ललकारीच जणू त्याने दिली. दुसरे म्हणजे अॅरिस्टॉटल पद्धतीच्या अभावी ज्यांना एकदम निराधार वाटले असते, अशा सर्वांसाठी ज्ञानार्जनाचे एक वेगळेच अतिशय प्रभावी असे साधन त्याने निर्माण केले; ते म्हणजे तर्कशास्वाशी पूर्णपणे सुसंगत अशा गणितावर आधारित वैज्ञानिक कार्यपद्धती! आधुनिक जगाला कुण्या एका माणसाने देऊ केलेली अशी ही फार मोठी देणगी आहे.

गॅलिलिओचा संपूर्ण बौद्धिक आवाका पाहता दुर्बिणीचा जनक, भव्यदिव्य शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ, आयुष्यातला वीस वर्षांचा महत्त्वाचा काळ कोपर्निकस वादाला स्वत:ला वाहून घेणारा कट्टर पुरस्कर्ता असे शिक्के त्याला अपुरे पडतात. या सर्व गोष्टी घडल्या त्या अपघातानेच! त्याचा पिंड चिंतकाचा व मौलिक संशोधकाचाच होता. नवीन विज्ञानाची फार स्पष्ट चाहूल त्याला लागली होती. त्या विज्ञानाचा मागोवा कसा घ्यायचा, हे सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांना समजून सांगण्याचा तळमळ त्याला लागली होती.

ईश्वराविषयी श्रद्धेची भावना बाळगणारा गॅलिलिओ ईश्वरनिर्मित जगाच्या मानवी व्यवहारात भावुक होता, जगाच्या भौतिक अभ्यासाची त्याला ओढ लागली होती. त्या अभ्यासाला आवश्यक अशी कार्यपद्धती त्याने शोधून काढली. ती कार्यपद्धती काटेकोरपणे अवलंबिली, तर मानव संशोधनाच्या एका अनंत मार्गावर चालत राहील आणि ईश्वर त्याला कधीही भरकटू देणार नाही, असा त्याला विश्वास होता.

आपल्याला सत्य गवसले आहे, असा दावा त्याने कधीच केला नाही, पण सत्याकडे नेणाऱ्या निरंतर मार्गाचे दरवाजे आपण उघडले आहेत आणि या यात्रेतील पथिकांचा मेळा नेहमी वाढतच जाणार, हे त्याला दिसले होते. सत्याचे स्वरूप नेहमी अधिकाधिक विशाल होत जाईल आणि क्षितिजाआडून ते मानवाला सतत खुणावत राहील, हे त्याला दिसले होते.

निसर्गाचा अविरत अभ्यास ही मानवाच्या पुढच्या पिढ्यांची महत्त्वाची कामगिरी होणार... त्याच्या स्वत:च्या पेक्षाही अधिक प्रखर व प्रगल्भ बुद्धीचे मानव, विज्ञानाचा त्याने घेतला त्यापेक्षा अधिक खोल वेध घेत राहणार... हे त्याला दिसले होते.

मानवाच्या चर्मचक्षु साठी दुर्बिणीचे साधन देऊन विश्वाचे भव्य रूप गॅलिलिओने त्याला दाखवले. नवीन विज्ञानाचा आविष्कार करून बौद्धिक वाटचालीतला दूरचा पल्ला त्याने मानवाला दाखवून दिला.

खरोखरच मानवतेच्या इतिहासातला तो एक दूरदर्शी महामानव होऊन गेला.