Monday, September 28, 2020

वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोणता? या प्रश्नाचे उत्तर जवळपास सर्वांनाच माहित आहे. परंतु, युट्युबवर जाऊन 175 एमपीएच या नावाने एकदा सर्च करून बघा. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मतिषा पथिराना याने मागील वर्षी कुमार विश्वचषकामध्ये भारताविरुद्ध 175 किलोमीटर प्रतितास वेगाचा चेंडूत टाकल्याचे व्हिडिओ तुम्हाला आढळून येतील. परंतु प्रत्यक्षात असे आहे का?
175 हा क्रिकेटमधला अविश्वसनीय वेग मानला जाईल. प्रत्यक्ष हा चेंडू पाहिला तर लक्षात येते की, काहीतरी गडबड आहे. खरं तर गडबड होतीच! त्यावेळी आयसीसीची स्पीडगन व्यवस्थित चालत नव्हती. त्यामुळे तिने 175 चा वेग दाखवला. अशी परिस्थिती सुमारे वीस वर्षापूर्वीही झाली होती. ज्यात पाकिस्तानच्या मोहम्मद सामी या गोलंदाजाचा वेग 163 इतका दाखवण्यात आला होता. याचेही व्हिडिओ युट्युबवर पाहता येतील. मोहम्मद सामीचा चेंडू सौरभ गांगुलीने सीमापार धाडला होता. तसा तो वेगवान होता. परंतु, 163 चा वेग गाठू शकेल, असे दिसत नाही. आयसीसीची स्पीडगन यापूर्वी बरेचदा अशीच बिघडलेली आहे. तरीही सर्वात वेगवान गोलंदाज कोणते? याचा खराखुरा आढावा आपण घेऊयात. मागच्या पंधरा वर्षांमध्ये शंभर मैलांचा अर्थात 160 किलोमीटर प्रतितास या वेगाचा पल्ला केवळ एकदाच एका गोलंदाजाने गाठलेला आहे. त्यापूर्वीची दहा वर्ष मात्र वेगवान गोलंदाजांनी क्रिकेट विश्वावर राज्य केले होते. त्यात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानी गोलंदाजांचा समावेश होता. वेगवान गोलंदाजांचे वेग हेच सर्वात मोठे अस्त्र होते. त्याचा वापरही उत्तमरित्या मैदानावर केला गेला. परंतू, आजची परिस्थिती पाहिली तर ध्यानात येते की, गोलंदाजांना 150 चा वेगही मोठ्या मेहनतीने पार करता येतो. 


शोएब अख्तर आजवरचा सर्वात वेगवान गोलंदाज. या पाकिस्तानी गोलंदाजाने सन 2003 च्या विश्वचषकामध्ये इंग्लंड विरुद्ध 161.3 kmph चा वेग गाठला होता. हाच  आजवरचा सर्वात वेगवान चेंडू होय. इतर वेळेसही शोएब अख्तरचे बहुतांश चेंडू 150 च्यावर वेग गाठत असत. ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली हा दुसरा वेगवान गोलंदाज होय. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना त्याने 161.1 चा वेग सन 2003 मध्येच गाठला होता. ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट या गोलंदाजानेही 161 चा वेग इंग्लंड विरुद्ध पार केलेला आहे. चौथ्या क्रमांकावरील जेफ थॉमसन याचा विक्रम सुमारे पंचवीस वर्ष अबाधित होता. वेस्ट इंडिज विरुद्ध 1975 मध्ये खेळताना त्याने 160.6 चा वेग गाठला होता. पाचव्या क्रमांकावरही ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा गोलंदाज येतो. 160 च्यावर गोलंदाजी केलेला तो पाचवा गोलंदाज होता. या पाच जणांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणीही आजवर 160 किलोमीटर प्रतितास किंवा 100 मैल प्रतितास टप्पा पार केलेला नाही!


Sunday, September 20, 2020

अशी ही बनवाबनवी आणि धुमधडाका

सचिन पिळगावकरचा "अशी ही बनवाबनवी" आणि महेश कोठारे यांचा "धुमधडाका" हे मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड ठरलेले चित्रपट होय. परंतु, दोन्ही चित्रपट विविध चित्रपटांचे रिमेक आहेत, याची खूप कमी जणांना माहिती असेल. धूमधडाका हा चित्रपटाच्या रिमेकच्या सिरीज मधला सर्वात शेवटचा चित्रपट होता. 1985 मध्ये तयार झालेला धुमधडाका हा मूळ तमिळ चित्रपट काढलिक्का नेरामिलाई या या चित्रपटाचा रिमेक होय. हा तमिळ पट 1964 मध्ये तयार झाला होता. त्याचा पहिला रिमेक तेलगु मध्ये 1965 मध्ये झाला. 1966 मध्ये तो हिंदीत "प्यार किये जा"  या नावाने तयार झाला होता. तर 1979 मध्ये या चित्रपटाचा कन्नडमध्ये रिमेक झाला आणि सर्वात शेवटी तो महेश कोठारे यांनी 1985 मध्ये मराठी मध्ये आणला!
सचिन पिळगावकर यांनीही हिंदीमधले अनेक चित्रपट मराठीमध्ये रिमेक केले आहेत. त्यातीलच "अशी ही बनवाबनवी" हाही एक चित्रपट होय. तो 1988 मध्ये रिलीज झाला होता. 1966 मधील ऋषिकेश मुखर्जी यांच्या "बिवी और मकान" या चित्रपटावर तो आधारित होता. त्याचा पुन्हा रिमेक 1991 मध्ये तेलगू भाषेत तर 2003 मध्ये कन्नड भाषेमध्ये करण्यात आला. 2009 मध्ये हिंदीत "पेयिंग गेस्ट" या नावाने, 2014 मध्ये पंजाबी मध्ये मिस्टर अँड मिसेस 420 तर 2017 मध्ये जिओ पगला या नावाने बंगालीत रिमेक झाला. अशा तऱ्हेने एक सुपर हिट स्टोरी भारताच्या विविध भाषांमध्ये पुन्हा पुन्हा तयार होत आलेली आहे.


 

Sunday, September 13, 2020

कोडिंग फॉर किड्स

आजच्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये प्रत्येकालाच संगणकाची माहिती असणे आवश्यक आहे. अनेक युरोपियन देशांमध्ये शालेय अभ्यासक्रमामध्येच विद्यार्थ्यांना संगणकीय प्रोग्रॅमिंगची माहिती होण्यासाठी संगणकीय भाषा शिकवल्या जातात. त्यामुळे संगणकाचा वापर कोडींग (coding) करण्यासाठी कसा करावा, हे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच समजते. भारत सरकारने देखील नवीन शिक्षण धोरणानुसार इयत्ता सहावी पासूनच शालेय अभ्यासक्रमामध्ये संगणकीय कोडींगचा समावेश केला आहे. ज्याद्वारे संगणकाचा वापर कसा करायचा असतो, हे विद्यार्थ्यांना अवगत होते. याकरिता वापरण्यात येणारी अत्याधुनिक संगणकीय भाषा म्हणजे *स्क्रॅच* (Scratch) होय. विद्यार्थ्यांना या संगणकीय भाषेद्वारे कोडिंग करता यावी, स्वतःचे संगणकीय प्रोग्रॅम लिहिता यावे, ॲनिमेशन तयार करता यावे तसेच विविध कॉम्प्युटर गेम बनवता यावे, याकरिता आम्ही *कोडींग फॉर किड्स* हा ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केला आहे. विविध बहुराष्ट्रीय व भारतीय कंपन्या पालकांकडून मोठ्या फी आकारणी करून चालवत आहेत. आम्ही तो केवळ 999 रुपयांमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून दिलेला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना संगणकीय कोडींगचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यास मदत होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क: 9960163010
वेबसाईट: https://mitu.co.in/coding-for-kids

Tuesday, September 1, 2020

शिलेदारांचे ईमान - अनंत तिबिले

मी सहसा ऐतिहासिक कादंबरी वाचत नाही. कादंबरीकार इतिहास अधिक रंजक पद्धतीने मांडत असल्याने तो चुकीचा मनात बसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी पुस्तके मी टाळतो. परंतु, काहीतरी वेगळं वाचावं यासाठी अनंत तिबिले यांची ही पहिलीच कादंबरी वाचून काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अज्ञात मावळ्याच्या शौर्यावर व त्याच्या तत्कालीन जीवनावर आधारित असणारी ही कादंबरी होय. त्याचे नाव केदार. नाव तसं तत्कालीन परिस्थिती पाहता वेगळं वाटत असलं, तरी ते फारसं जाणवून येत नाही. कादंबरीचा नायक अर्थात जो स्वराज्याचा शिलेदार आहे, तो अनाथ आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात तो दाखल होतो व प्रतापगडची मोहीम, विशाळगडचा वेढा तसेच मिरजेचा वेढा अशा विविध प्रसंगांमध्ये आपले शौर्य दाखवतो. अशी एकंदरीत कादंबरीची पार्श्वभूमी आहे. शिवाय तिला प्रेमकहाणीचाही स्पर्श झालेला आहे. अनंत तिबिले यांनी सर्व प्रसंग विविध प्रकरणांमध्ये मांडलेले आहेत. प्रसंग जरी निरनिराळे असले तरी कथा कुठेही तुटत नाही. तिची रंजकता टिकून राहते. शिवकालामध्ये खरोखरच कित्येक मावळ्यांच्या जीवनात असे प्रसंग आले असावेत, याची जाणीव ही कादंबरी निश्चितच करून देते.